परमात्म्याच्या सान्निध्यात कोण पोचतात?

अंत:करण-शुध्दी- प्रक्रियेच्या योग्य अशा सरळ मार्गावर पसरलेल्या तीक्ष्ण काट्यांचा फोलपणा ओळखून जे मतिभ्रष्ट न होता व निषिद्ध कर्मांच्या आडमार्गावरून न जाता विकल्पांची टोके मोडत एकनिष्ठा रुपी पावले टाकत महापातकांच्या निबिड अरण्यात न हरवता सत्कर्मांच्या पुण्यमार्गावरून माझ्याकडे धाव घेतात, ते वाटमारेपणा करणाऱ्यांच्या तावडीत न सापडता सुखरूप माझ्या सान्निध्यात येऊन पोचतात.

Story: विचारचक्र |
17th June, 12:12 am
परमात्म्याच्या सान्निध्यात कोण पोचतात?

गेल्या लेखात आपण श्रीमद्भगवद्गीतेच्या ७ व्या अध्यायातील २५ व्या श्लोकापर्यंत आलो होतो. "हे सगळे दृश्यादृश्य जे वस्तुजात आहे त्या सगळ्यात मीच एक सर्वार्थाने भरून राहिलो आहे, ही खूण लक्षात ठेव." - हे भगवंतांचे अर्जुनाप्रति प्रतिपादन होते. आता त्यापुढील श्लोकांकडे वळू.

वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन।

भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ।।२६।।

सरळ अर्थ : हे अर्जुना, पूर्वी होऊन गेलेली व वर्तमानकाळी असलेली तसेच पुढे भविष्यकाळी होणारी अशा सर्व भूतांना म्हणजे प्राणिमात्रांना मी जाणतो. पण मला कोणीही श्रध्दाभक्तिरहित पुरुष जाणत नाही.

विस्तृत विवेचन : अर्जुना, तसे बघायला गेले तर जगात आजपर्यंत जे जे प्राणी होऊन गेलेत ते सगळे न चुकता माझ्याच स्वरूपात येऊन मिळाले. जे जे विद्यमान हयात आहेत तेही सगळे माझेच स्वरूप आहेत. आणि जे जे यापुढे होणार आहेत, तेही माझ्याहून वेगळे नाहीतच!

असा मी प्रत्यक्षात नित्य अखंड असतानाही या जीवांना संसारच सत्य वाटतो! त्याचे कारण वेगळेच आहे! प्रसंगच आला आहे म्हणून ते आता सांगतो तुला. ऐक.

इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत।

सर्वभूतानि संमोहं सर्गे यान्ति परन्तप ।।२७।।

सरळ अर्थ : कारण हे भरतवंशी अर्जुना, सृष्टीत इच्छा व द्वेष यांच्यापासून निर्माण झालेल्या सूखदु:खाला द्वंद्व रूप मोहाने सर्व प्राणी अती अज्ञानतेला प्राप्त होत असतात.

विस्तृत विवेचन : धनंजया, कसे झाले बघ. काया आणि अहंकार परस्पर प्रेमरंगात येऊन प्रणयी रमले. त्यांच्यापासून इच्छा नावाचे एक कन्यारत्न जन्माला आले. ते वयात आल्यावर द्वेष नावाच्या मुलाशी त्या रत्नाचे लग्न झाले. त्या जोडप्याला यथावकाश द्वंद्वमोह नावाचे एक पुत्ररत्न प्राप्त झाले! (द्वैत म्हणजे अनेकपणा. हा अनेकपणा वस्तुत: सत्य नसतो. आपल्याला जे द्वैत जाणवते ते भासमान असते. मी पाहणारा आणि बाकी सर्व 'जे पहायचे ते' इथपासून आरंभ करून सुख-दु:ख, बरे-वाईट, पाप-पुण्य, प्रकृती-पुरुष, योग्य-अयोग्य, खरे-खोटे अशा अनेकानेक परस्पर विरुध्द द्वंद्वांनी - म्हणजे जोड्यांनी - ही सृष्टी भरलेली आहे. आपल्या सत्य स्वरूपाचे विस्मरण झाल्यामुळे जीवात्मा आपल्याला विशिष्ट - देहाच्या - मर्यादेत कोंडून घेतो व द्रष्टा आणि दृश्य - पाहणारा आणि 'जे पहायचे ते' - असे पहिले द्वंद्व उत्पन्न होते आणि या द्वंद्वातून बाकी सर्व द्वंद्वांची विशेषत: सुख-दु:खांची उत्पत्ती होते. जीव या द्वद्वांकडे स्वाभाविकत: आकर्षित होऊन त्यांच्याशी बांधला जातो. म्हणून द्वंद्व हे बंधन आहे. या आकर्षणाला द्वंद्वबंध वा द्वंद्वमोह असे म्हणतात). त्या द्वंद्वमोहाला अहंकाराने म्हणजे त्याच्या आजोबाने व्यवस्थित पोसला. हा द्वंद्वमोह नेहमीच धैर्याला प्रतिकूल असतो. तो आशारूपी रसाने पुष्ट होऊन उन्मत्त होतो. इतका, की मन व इंद्रिये यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची शिकस्त करणाऱ्या निग्रहालाही तो आवरता येत नाही! आणि मग धनुर्धरा, तो द्वंद्वमोह असंतोषरूपी मदिरेने माजून विषयांच्या शय्यागृहात विकारांच्या संगतीत अहोरात्र रममाण होतो. अशा प्रकारे अहंकाराने पोसलेल्या द्वंद्वमोहाने अंत:करण शुध्द करण्याच्या प्रक्रियेच्या मार्गावर विकल्पाचे काटे पसरले आणि मग निषिद्ध कर्मांचे आडमार्ग काढून ते हवे तसे रूढ केले! त्यामुळे जीव भांबावून गेले आणि संसाररूपी गहन अरण्यात येऊन पडले. त्याबरोबर महादु:खाचे आघात त्यांना शोधत तिथे आले!

येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणाम्।

ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः ।।२८।।

सरळ अर्थ : परंतु निष्काम भावाने श्रेष्ठ कर्मांचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे, ते रागद्वेषादी द्वंद्वमोहापासून मुक्त झालेले व दृढनिश्चयी पुरुष मला सर्व प्रकारे भजतात.

विस्तृत विवेचन : किंबहुना, अंत:करण-शुध्दी- प्रक्रियेच्या योग्य अशा सरळ मार्गावर पसरलेल्या तीक्ष्ण काट्यांचा फोलपणा ओळखून जे मतिभ्रष्ट न होता व निषिद्ध कर्मांच्या आडमार्गावरून न जाता विकल्पांची टोके मोडत एकनिष्ठारूपी पावले टाकत महापातकांच्या निबिड अरण्यात न हरवता सत्कर्मांच्या पुण्यमार्गावरून माझ्याकडे धाव घेतात ते वाटमारेपणा करणाऱ्यांच्या तावडीत न सापडता सुखरूप माझ्या सान्निध्यात येऊन पोचतात.

जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये।

ते ब्रह्म तद्विदु: कृत्स्नमध्यात्मं कर्मचाखिलम् ।।२९।।

सरळ अर्थ : आणि जे मला शरण येऊन जरा व मरण यापासून सुटण्याकरिता यत्न करतात, ते पुरुष त्या ब्रह्माला तसेच संपूर्ण अध्यात्माला आणि संपूर्ण कर्माला जाणतात.

विस्तृत विवेचन : हे अर्जुना, या माझ्या सान्निध्यात येऊन पोचण्याचे जे साधन आहे ते जन्ममरणाचा प्रश्नच शिल्लक ठेवत नाही! दैवयोगाने ज्यांची ज्यांची त्या साधनाच्या ठायी आस्था उपजते त्यांना तेच साधन संपूर्ण परब्रह्म स्वरूप फळांच्या प्राप्तीने फलद्रूप होते! ती फळे पिकली की त्यातून पूर्णतेचा असा रस गळतो की मग त्यावेळी कृतकृत्यतेने सगळे जग भरून जाते! ब्रह्मस्थितीचे ते स्वाभाविक रूप बघून तिच्याबद्दलचे अज्ञान मावळून 

जाते. त्यायोगे शेवटी ज्याच्या सिध्दीसाठी जन्म 

प्राप्त झालेला असतो, तो कर्म-हेतूच संपून जातो! आणि जीवाला निरंतर मन:शांती 

लाभते!

ज्याच्या जीवनाच्या व्यापार-उदिमाचे भांडवल स्वतः मीच, म्हणजे परब्रह्म परमात्माच असतो त्याला अध्यात्माचा असा लाभ होतो की त्याचे द्वैतरुपी दारिद्र्य नाहीसे होते. त्याच्या साम्यबुध्दीचा उत्कर्ष होतो आणि त्या साधकाची ऐक्य रूपाने, अद्वैतानंदाने भरभराट होते.


मिलिंद कारखानीस

(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल 

असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)

मो. ९४२३८८९७६३