ऑनलाईन ड्रग्ज तस्करीचा संशय; रशियन व्यक्तीवर कारवाई

आयफोन, दोन लॅपटाॅप व इतर वस्तू जप्त; अटकपूर्व जामिनासाठी धाव


17th June, 05:59 am
ऑनलाईन ड्रग्ज तस्करीचा संशय; रशियन व्यक्तीवर कारवाई


प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : ‘डार्क नेट’द्वारे ऑनलाईन ड्रग्जची तस्करी रशियन नागरिक करत असल्याची माहिती गुन्हा शाखेला मिळाली होती. त्यानुसार त्याच्या शिवोली येथील खोलीवर छापा टाकून गुन्हा शाखेच्या पथकाने आयफोन, दोन लॅपटाॅप व इतर इलेक्ट्रॅानिक वस्तू जप्त केल्या. या कारवाईनंतर ओलेगा नाझारोव (४१) या संशयित रशियन नागरिकाने उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. पुढील सुनावणी १९ जून रोजी होणार आहे.
वाडी-शिवोली येथे भाड्याच्या खोलीत राहणारा ओलेगा नाझारोव ‘डार्क नेट’द्वारे ऑनलाईन ड्रग्जची तस्करी आणि क्रिप्टो करन्सीचा बेकायदेशीर व्यवहार करत असल्याची माहिती गुन्हा शाखेला मिळाली होती. त्यानुसार, गुन्हा शाखेचे उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर यांच्या नेतृत्वाखाली सायबर विभाग आणि गुन्हा शाखेच्या कर्मचाऱ्यांनी १० जून रोजी दुपारी २ वा. वरील ठिकाणी छापा टाकला. खोलीची झडती घेतली आणि नाझारोव याचा आयफोन, दोन लॅपटाॅप व इतर इलेक्ट्रॅानिक वस्तू जप्त केल्या. रायबंदर येथील गुन्हा शाखेत रात्री ८ ते ११ दरम्यान त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्याची नोकरी, वैयक्तिक, तसेच बँक खात्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांची माहिती जाणून घेतली. रात्री ११ वा. त्याला खोलीवर सोडले. गुन्हा शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्या हालचालीवर पाळत ठेवली होती. संशयित ओलेगा याने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ रोजी होणार आहे.
दरम्यान, गुन्हा शाखेने जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू कुर्टी-फोंडा येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठात तपासणीसाठी पाठविल्या आहेत. याबाबतचे कागदोपत्री पुरावे दै. ‘गोवन वार्ता’कडे आहेत.
गुन्हा दाखल न करताच पहिलीच कारवाई
गुन्हा शाखेने गुन्हा दाखल न करता तसेच संशयाच्या बळावर नाझारोव याच्या खोलीवर छापा टाकला. त्यासाठी गुन्हा शाखेने कुठल्याही प्रकारचे वाॅरन्ट घेतले नव्हते. गुन्हा शाखेने त्याच्या खोलीवर तसेच वैयक्तिक त्याच्यावर पाळत ठेवली. अशा प्रकारची कारवाई गुन्हा शाखेने प्रथमच केली आहे. तो एक वर्षापासून शेरा या रशियन कंपनीसाठी वेब डेव्हलपर म्हणून काम करत आहे, असा दावा नाझारोवने अटकपूर्व जामीन अर्जात केला आहे.
जप्त केलेल्या इलेक्ट्रॅानिक वस्तू
आयफोन
एचपी कंपनीचा लॅपटाॅप
एक चदेरी रंगाचा लॅपटाॅप
पोर्टेबल एक टीबीची एसएसडी स्कॅन डिस्क
पोर्टेबल ५०० जीबी हार्ड डिस्क
सॅमसंगचे इंटर्नल लॅपटाॅप हार्ड डिस्क
युएसबी-एसएसडी इनक्लोझर
६४ जीबी मेमरी कार्ड