तापाला करूया छू मंतर

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
16th June, 04:09 am
तापाला करूया छू मंतर

पावसाळा सुरू झाला, शाळा पण सुरू झाली आहे. मस्त पावसाळा एन्जॉय करत आहात ना? या पावसाळ्यात रोग जंतूशी सुद्धा लढण्याची तयारी आयुर्वेदाची ढाल घेऊन आपण करणार आहोत. कितीही काळजी घेतली तरी मोठा पाऊस आला की रेनकोट, छत्री वापरली तरी कधी कधी आपण भिजतो, ओलेचिंब होतो. मग सर्दी होते आणि तापही येतो.

हा ताप म्हणजे असा आजार ज्यात आपलं शरीर खूप गरम होतं. जिभेची चव जाते, काही खावंसं पण वाटत नाही, अंग दुखतं, डोळे चुरचुरतात, लाल होतात. अश्यावेळी काही करावंसं वाटत नाही, शाळा बुडते, अभ्यास चुकतो. 

हा ताप लवकर पळून जावा म्हणून आपण काही गोष्टी केल्या पाहिजे. सर्वात आधी जाड पांघरूण, आजीच्या किंवा आईच्या साडीची ऊब असलेली गोधडी घेऊन झोपावं. असं केल्याने घाम येऊन ताप उतरायला मदत होते आणि शरीराला विश्रांतीसुद्धा मिळते. 

*ताप लवकर कमी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं* - भूक लागल्याशिवाय काहीही खाऊ नये. तापात उपाशी राहिल्यामुळे काहीही त्रास होत नाही उलट ताप लवकर कमी व्हायला मदत होते. काही खावंसं वाटलं किंवा भूक लागली तर गरम गरम घरी बनवलेलं सूप प्यावं. किंवा निवळात/पातळ पेजेत चवीसाठी थोडंसं मेतकूट किंवा जिरेपूड आणि सैंधव घालून प्यावं. 

भाताच्या किंवा ज्वारीच्या लाह्या, राजगिरा लाडू असे पदार्थ सुद्धा ताप असताना खाऊ शकता. ताप उतरण्यासाठी धणे पाण्यात शिजवून, गाळून त्यात खडीसाखर घालून प्यावे. 

❌ताप असताना फळं, ज्युसेस, बिस्किट्स, अंडं, ब्रेड असे पदार्थ मात्र खायचे नाहीत हां. तोंडाला चव नसते म्हणजेच आपलं पोट आपल्याला कोणतेही जड पदार्थ खाऊ नका असं सांगतं. पोटाचं जर आपण ऐकलं तर नको असताना आपण खाणार नाही, मग अजीर्णही होणार नाही, अजीर्ण झालं नाही तर कोणताही आजार लवकर बरा होतो. 

ताप उतरत नसेल तर तापाची औषधं घ्यायला आयुर्वेद वैद्याकडे जावं. औषधं नीट घ्यावी. आराम करावा. ताप पूर्ण उतरला की जीभेला चव येते तेव्हा मऊ भात, मूग डाळीचे वरण, लिंबाचे गोड लोणचे किंवा मूग डाळ तांदळाची साधी मऊ खिचडी असा आहार घ्यावा. 

एवढ्या गोष्टी केल्या तर नक्कीच ताप कुठल्या कुठे छू मंतर होईल आणि आपल्याला त्याचा पत्ता सुद्धा लागणार नाही. लवकरात लवकर तापाला छू मंतर करण्याचं सिक्रेट तुमच्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा सांगा.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य