ओंकार हत्तीला फटाके, सुतळी बॉम्ब टाकून पळवून लावतानाचा व्हिडीओ या आठवडा अखेरीस व्हायरल झाला. आपण त्याच्या सहनशक्तीचा अंत तर पाहत नाही आहोत ना?

परवा एका मैत्रिणीचा संदेश आला. “अगो आज मी बांद्याला गेले होते. जाताना पाहते तर पुलावर ही गर्दी. काय झालंय काही समजेना, इतकी गर्दी.” “ काय गं? काय झालेलं? अपघात झाला होता का? ह्या दिवसांत अपघातांचं सत्र काही संपता संपत नाही बाई.” मी म्हटलं. “नाही गं. आम्हाला पण अगोदर तसंच वाटलेलं. अपघात- बिपघात झाला असेल म्हणून. चौकशी केल्यावर समजलं की पुलाखाली ओंकार आहे. त्याला पाहण्यासाठी गर्दी.” आश्चर्यचकित होऊन मी हसण्याचे स्मायली पाठवले. पुढचं तर ऐक, ती म्हणाली, “संध्याकाळी अगो गोव्याला परतताना पुलावर परत गर्दी. संध्याकाळ होईपर्यंत हत्ती नदी ओलांडून पलीकडच्या शेतात गेलेला; बघते तर काय? काही बायका त्याचे फोटो टिपण्यासाठी, पोरा-बाळांना घेऊन थेट शेतात!” “अय्यो... काय पोरकटपणा आहे! आणि त्याने एखाद्याला काही इजा केली असती म्हणजे? जबाबदार त्या बिचाऱ्या मुक्या वन्य-प्राण्यालाच धरलं असतं, नाही का?” माझ्या संतापाची तीव्रता कदाचित तिलाही जाणवली. “बघ ना. त्या बिचाऱ्याचा काय दोष?” मुर्खपणा आहे नुसता. 'मांजराचा खेळ उंदराचा जीव!
हत्ती हा जगातील सर्वांत मोठा स्थलचर प्राणी. ह्या प्राण्याला फक्त बलाढ्यच म्हणून नव्हे, तर अत्यंत बुद्धिमान आणि शांत स्वभावाचा प्राणी म्हणून ओळखला जातो. भलेमोठे शरीर, गोंडस डोळे, विशाल कान, इवलुशी शेपूट, लांब सोंड आणि टोकाचे सुळे अशी त्याची देहरचना. फांद्या, पाने, गवत, फळे, वृक्षांच्या साली यांसारखे शाकाहारी अन्न ग्रहण करून हा आपला उदरनिर्वाह करतो. गणेशरूपी गजराजाला शक्ती, वैभव, प्रतिष्ठा, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. हिंदू धर्मात हत्तीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान आहे. गजराज हा विशेषतः भगवान गणेशाशी संबंधित असल्यामुळे भारतातील कित्येक राज्यांमध्ये त्याची पूजा केली जाते. महाराष्ट्र राज्यात धार्मिक दृष्टिकोनातून हत्तीचे दर्शन शुभ मानले जाते. उत्तर-पूर्व आणि दक्षिण भारतात हत्तीला धार्मिक- सांस्कृतिक प्रतीक म्हणून पूजले जाते.
वन संतुलन व पर्यावरणीय स्थिरता राखण्यासाठी हत्ती अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो. हत्ती सतत जंगलात फिरून मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या, फळे, पाने खात असल्याने झाडांच्या फांद्या विरळ होतात, त्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचतो. यामुळे गवत, झुडपे, वनस्पती वाढू शकतात व इतर प्राण्यांना अन्न मिळते. हत्ती झाडे तोडून नवीन झाडांना वाढण्याची संधी देतो. हत्ती घ्राणेंद्रियाच्या मदतीने जंगलातील पाण्याचा स्रोत शोधून काढू शकतो.
जंगलतोड, मानवी वसाहतींचा विस्तार आणि रस्ते-रेल्वेमार्ग-विमानतळ यांसारख्या प्रकल्पांमुळे आज हत्तींचा अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळे मानव-हत्ती संघर्ष वाढला आहे. हत्तींची रेलचेल असलेल्या मार्गांवर रस्ते आणि वसाहती उभ्या राहिल्यामुळे त्यांच्या हालचालीचा नैसर्गिक मार्ग तुटला आहे. शेतांचे संरक्षण करण्यासाठी टाकलेल्या विद्युत तारा आणि कुंपणामुळे अनेक हत्तींचा मृत्यू होतो. काही ठिकाणी हत्तींच्या सुळ्यांपासून बनणाऱ्या वस्तूंच्या व्यापारासाठी त्यांची बेकायदेशीर शिकार केली जाते. जंगलात ग्रीन कॉरिडॉर नसल्याने/क्रॉसिंग मार्गाच्या अभावी रेल्वे/कंटेनर सारख्या मानवनिर्मित साधन सुविधांच्या धडकेनेही वर्षाकाठी कितीतरी प्राण्यांना अपघाती मृत्यूला सामोरे जावे लागते. जंगले कमी झाल्याने हत्ती अन्नाच्या शोधार्थ गाव गाठू लागले आहेत. अन्नासाठी पिकांची नासाडी करू लागले आहेत. यामुळे शेतकरीवर्ग हत्तीला आपला शत्रू मानू लागले
आहेत.
पण खरंच. त्या बिचाऱ्यांचा काय दोष? गेल्या एप्रिल महिन्यापासून कोकण, सावंतवाडी, मोपा, दोडामार्ग भागात ओंकार हत्तीचा वावर दिसून येत आहे. शेतकरी संतप्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी तो कोकण भागात नदीपात्रात मनसोक्त आंघोळ करताना दिसून आलेला. सप्टेंबरमध्ये नेतर्डे परिसरात केळी-बागायतींची नासधूस करत धुमाकूळ घातल्यानंतर मुख्य वनसंरक्षकांनी हत्ती पकड मोहीम हाती घेतली आहे. त्याला पकडण्याची, बंदी बनवण्याची योजना आखत आहे. जो तो त्याच्या मागावर आहे. कधी ट्रेकर, कधी ड्रोन, कधी हिडन कॅमेरा तर कधी २४ तास पाळतीवर असलेले वनरक्षक. ओंकारला हाकलण्यासाठी, त्याला दूर घालवण्यासाठी उपाय करताना आपण कधी स्वतःला हे प्रश्न विचारलेत का की ओंकार जंगल सोडून इतक्या दूर भरवस्तीत का आला? गावात घुसून शेती-बागायती-पिकांचे नुकसान करण्यामागचे कारण काय? ह्यामागचे मूळ कारण शोधून काढण्याचा विचार का नाही होत? आपण त्याच्या सहनशक्तीचा अंत तर पाहत नाही आहोत ना? पकड मोहीम राबवत वन्य प्राण्यांना कृत्रिम ठिकाणी स्थलांतरित करण्यापेक्षा त्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित करण्यावर भर देणे जास्त गरजेचे नाही का?

- स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या
प्राध्यापिका आहेत.)