पॅकेज्ड फूड : आकर्षक जाहिरात की आरोग्यासाठी धोका?

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
2 hours ago
पॅकेज्ड फूड : आकर्षक जाहिरात की आरोग्यासाठी धोका?

सध्या आपण सगळे इतके व्यस्त असतो की भूक लागली असता बरेच जण कुरकुरीत कुरकुरे, चटपटीत चिप्स, चॉकलेटी क्रीम - स्ट्रॉबेरी क्रीम वाली बिस्किटे, टू मिनिट्स नूडल्स, पनीर, मशरूम, अंडा पफ्स, रोल्स, पेस्ट्री असे पदार्थ विकत घेऊन खात असतात. आणि तहान लागली तर सॉफ्ट ड्रिंक्स एनर्जी ड्रिंक्सच्या बाटल्या विकत घेतो. पण हे पॅकेज्ड फूड सहज आणि स्वस्त मिळत असलं तरी आरोग्यासाठी चांगले असते का? किंवा असे पदार्थ खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते का? या गोष्टींचा विचार केला जात नाही. आज आपण याविषयी थोडी माहिती घेऊया.

पॅकेज्ड फूड म्हणजे काय?

जे अन्न तयार करून त्यात आकर्षक रंग घालून, चव वाढवण्यासाठी आणि पदार्थ जास्त दिवस टिकवण्यासाठी रसायने घालून पॅकेटमध्ये भरले जाते, त्याला पॅकेज्ड फूड म्हणतात. हे अन्न पदार्थ सहज उपलब्ध असल्यामुळे आणि यांच्या जाहिराती आकर्षक असल्यामुळे आपण हे पदार्थ विकत घेतो.

पॅकेज्ड पदार्थ कधी खाल्ले जातात?

 बऱ्याचदा वेळ नाही म्हणून, घराबाहेर असताना भूक लागल्यावर किंवा शाळा सुटली की गाडीची वाट पाहत असताना तुमच्यासारखी काही मुलं ही चकचकीत पाकिटे घेऊन त्यातील पदार्थ खाताना दिसतात. 

 कधी कधी आपण नातेवाईकांना, मित्र मैत्रिणींना भेटायला जाताना असे पदार्थ भेट म्हणून नेतो. 

 सहलीला जाताना किंवा लांबचा प्रवास असला की हीपाकिटे आपल्या बॅगेत असतात. 

 आणि या पदार्थांबरोबर रंगीत प्लॅस्टिकच्या बाटलीतली वेगवेगळी पेये म्हणजेच सॉफ्ट ड्रिंक्स , एनर्जी ड्रिंक्स असतातच.

या पाकिटांमधील बिस्किटं, चिप्स, केक, कोल्ड्रिंक, नूडल्स, चॉकलेट्स, शेव, फरसाण, ब्रेकफास्ट सिरियल्स वगैरे या वस्तू दिसायला आणि खायला छान वाटतात, पण अशा पॅकेज्ड फूडचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम कधी व कसा होतो हे मात्र खाणाऱ्यांनासमजतच नाही.

तुम्हाला माहित आहे का हे पदार्थ वारंवार खाल्ले असता आपल्याला काय काय त्रास होऊ शकतात? नाही ना....तर पुढे वाचा.

१. पचनशक्ती बिघडते – हे पदार्थ ताजे नसल्यामुळे पोट बिघडते, अजीर्ण होते, पोटात गॅस भरतो, पोट दुखायला लागतं. कधी कधी तर उलट्या आणि जुलाब सुद्धा होतात. तर कधी कधी पोट साफ होत नाही, मळाचे घट्ट खडे होतात. आणि शी होत नाही. पोट साफ रोज सकाळी झाले नाही तर अनेक आजार होऊ शकतात .

२. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते – अजीर्ण झालं की शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. आणि ही शक्ती कमी झाली तर वेगवेगळे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता वाढते. म्हणजेच ताप, खोकला, सर्दी, त्वचारोग, अॅलर्जी असे आजार सुरू होतात.

३. मन अस्वस्थ होतं, केस पिकतात – या पदार्थांमध्ये जास्त मीठ, साखर आणि कमी दर्जाचे तेल असते त्यामुळे हे घटक मन चंचल करतात, अभ्यासात लक्ष लागत नाही. मीठ जास्त प्रमाणात पोटात गेल्यामुळे केस लवकर पिकतात म्हणजेच चंदेरी रंगाचे होतात. आणि डोळ्यांची क्षमता सुद्धा कमी होते.

४. लठ्ठपणा आणि त्वचारोग – नियमित पॅकेज्ड फूड खाल्ल्याने चरबी वाढते, पिंपल्स येतात, त्वचा तेलकट होते, निस्तेज होते. म्हणजेच चेहरा काळवंडतो.

५. झोप आणि एकाग्रतेचा त्रास – हे पदार्थ बऱ्याचदा वातूळ म्हणजेच शरीरातील वात दोष वाढवणारे असतात. वातदोष वाढला की झोप लवकर व शांत लागत नाही. मन चंचल होतं आणि एका विषयावर लक्ष केंद्रित करणे कठीण होतं. कंटाळा येतो. अभ्यास पूर्ण होत नाही.

६. जंत होतात - गोड क्रीम असलेली बिस्किटे, गोड ज्यूसेस, चॉकलेट्स, केक हे सतत खाल्ल्याने पोटात जंत होतात. जंत खूप झाले की खाल्लेल्या अन्नावर पोटातील जंत ताव मारतात त्यामुळे शरीराचे पोषण व योग्य वाढ होत नाही. आम्हाला आमची आजी दर बुधवारी व रविवारी कडू किरायते द्यायची त्यामुळे जंत होण्याचे प्रमाण खूप कमी असायचे. आता असे कडू औषध किंवा कडू पदार्थ घरी केले जात नाहीत त्यामुळे गोड पदार्थ खाल्ल्याने अनेक त्रास होत आहेत.

अरे बापरे! इतके दुष्परिणाम होऊ शकतात ...तरीसुद्धा हे पदार्थ आपण खातोच. तुम्ही जर हुशार आणि समजूतदार मुलं असाल तर तुम्ही आज पासून हे पाकिटातले पदार्थ खाणं बंद कराल. कधीतरी सहा महिन्यातून एकदा व कमी प्रमाणात खाल्लं तर ठीक आहे. मग या पदार्थांना पर्याय म्हणून काही पदार्थ आपण खाऊ शकतो. जे पुढीलप्रमाणे आहेत.

१. नूडल्स ऐवजी शेवया छान फोडणी देऊन, कांदा, गाजर, बीट किसून घालून तेलावर परतून त्या खाऊ शकतो.

२. बटाट्याचे, केळ्याचे, फणसाचे चिप्स घरी करून घेऊन खाऊ शकता.

३. चुरमुऱ्यांचा, लाह्यांचा, मखान्याचा, पोह्यांचा चिवडा घरी केलेला खाऊ शकता.

४. तिखट शंकरपाळे, मेथीच्या तिखट पुऱ्या इ. चटपटीत पदार्थ सुद्धा घरी केलेले खाऊ शकता.

५. वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ, पराठा, दशम्या, घावन हे पदार्थ चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा असतात. आईला किंवा आजीला हे पदार्थ करायला सांगा.

६. घरी पदार्थ करणे शक्य नसेल तर चांगले तेल वापरून आपल्या आजूबाजूला घरगुती पदार्थ बनवणाऱ्यांकडून त्यात घातल्या जाणाऱ्या घटकांची खात्री करून घेऊन ते पदार्थ विकत आणून खाऊ शकता.

७. आपल्या बॅगेत एक छोटासा डबा ठेवायचा. त्यात कधी भूक लाडू ( खजूर, शेंगदाणा लाडू), चुरमुऱ्यांचा लाडू, राजगिरा लाडू इ. तर कधी मनुका, शेंगदाणे + गूळ, खजूर, बदाम, काजूगर, डाळिंबाचे दाणे, तूप + साखर लावलेले चपातीचे रोल्स इ घालून नेहमी हा डबा सोबत घेऊन जावा. भूक लागली की हे पौष्टिक पदार्थ खावे.

८. आपल्या बॅगेत नेहमी एक छोटी पाण्याची बाटली सुद्धा ठेवावी. तहान लागली की केमिकल्स असलेली सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याऐवजी पाणी प्यावे. उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू सरबत, कोकम सरबत, वाळा सरबत बाटलीत भरून न्यावे. या आधी मी तुम्हाला वेगवेगळी सरबतं कशी करायची याची सुद्धा माहिती दिली आहे. त्याप्रमाणे आपल्या आवडीनुसार घरगुती पदार्थ सोबत घ्यावे.

ही बाजारातल्या खाऊची पाकिटे आकर्षक जरी असली तरी त्यातील पदार्थ हे आरोग्यासाठी हानिकारक आहेत. जितक्या लवकर तुम्ही हे पदार्थ खाणे बंद कराल तितक्या लवकर तुमचं आयुष्य निरोगी आणि आनंदी होईल.


- वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य