पाऊस, मी आणि छत्री

Story: सय अंगणाची |
15th June, 12:45 am
पाऊस, मी आणि छत्री

तो तसाच आहे फक्त माझं जग बदललंय. आता जरी पावसाने अंधार पसरवला तरी चार भिंतीआड विजेचा प्रकाश निर्माण होई. कौलारू घरात राहत असताना अंधार म्हणजे जणू सोबतीच असायचा. ढगांचा गडगडाट, विजांचं चमकणं सुरू झालं की एखाद्या कोपऱ्यात कानांवर दोन्ही हात ठेवून अंगाभोवती उबेसाठी गोधडी पांघरून "देवा घडघड्याला घेऊन जा रं ' हे वाक्य सहजपणे मुखातून येत असे. आई कामावरून येईपर्यंत मनाला स्थिरता मात्र प्राप्त होत नसे. जणू चमकणारी वीज त्या बांबूच्या तडकीतून (दार) आत शिरेल याच भीतिने त्या चमकणाऱ्या विजेला पाहण्याचं धाडस ही एखादेवेळी होत नसे. केरोसीनचा दिवा पेटवला तरी बेभान पावसात तो पुन्हा पुन्हा मालवला जायचा. मग त्या पावसात अवतीभोवती अंधारच. ढगांचा गडगडाट कमी झाला की चटई अंधरुन मी अभ्यासाला बसायचे. जोरदार पावसात तर घरात अंधारच दिसायचा. मग चटई समोर दिवा आणि बाजूला गोधडी हे मात्र सोबतच असायचे. अचानक ढगांचा गडगडाट सुरू झाला तर क्षणाचा विलंब न करता गोधडी डोक्यावरून घ्यायची आणि तसचं गोधडीआड डोळे मिटून राहायचे. पुन्हा मग गोधडी काढून अभ्यासाला सुरुवात व्हायची. कधीतरी पावसाचा थेंब नकळत वहीवर लिहिलेल्या अक्षरांवर पडायचा आणि मग एकप्रकारची चीड निर्माण व्हायची. कितीतरीवेळा त्या टपकणाऱ्या थेंबांनी माझ्या वही-पुस्तकांवर छाप उमटवलेली असायची. शाळेत जाताना तर दप्तरचं ओझचं एवढं असायचं की छत्री पेटवली तरी दप्तर मात्र पूर्णपणे भिजलेले. महागडे दप्तर वापरणं शक्य नव्हते त्यामुळे वापरात असलेल्या दप्तरात हमखासपणे पाणी शिरायचे. दुपारी घरी आल्यावर नारळाची सोडणं, सुपारीची सालं वापरून चुलीत आग पेटवायचे. नंतर दप्तरातील वह्या-पुस्तके भानोशीवर सुकत घालायचे. पाऊस तुफान सुरू झाला की आई प्लास्टिक पिशवीत वह्या पुस्तके घालून ती पिशवी दप्तरात घालायची. पण वर्गात वह्या पुस्तके काढताना त्या पिशवीच्या आवाजाने सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळवायचा. कधी दप्तर तर कधी गणवेश पावसाच्या पाण्याने चिंब भिजलेलाच असायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तो सुकलेला असेल याची शाश्वती देणे मात्र कठीण ठरायचे. सकाळी सकाळी तो ओलसर असलेला गणवेश परिधान करताना अंगावर शहारे यायचे. मग कधी चुलीतील आगीच्या वरती त्याला उलट सुलट फिरवून गरम वाफ तयार केल्यावर तो परिधान केला जायचा. बाबांनी दिलेली छत्री दोन वर्ष तरी सांभाळावीच लागायची. जोरदार पावसात कितीतरी थेंब छत्रीतून झिरपायचे. ज्या परिस्थितीचा सामना करावा लागत होता त्यामुळे नवीन छत्रीचा आग्रह कधी करता आला नाही. असाच एक सुरुवातीच्या पावसातील प्रसंग आठवतो. इयत्ता पाचवीत असताना कधी कुणी शाळेत सोडायला आले नाही मग तो शाळेचा पहिला दिवस असला तरीही. सकाळी ७.२० च्या दिपसंदेश बसने मी शाळेत जायचे. पुन्हा दुपारी दिपसंदेश बसने घरी. शाळेसमोर बसला आम्ही थांबायचो. पण त्या दिवशी मैत्रिणींच्या आग्रहामुळे मी  वाळपईच्या बाजारात गेले बससाठी. दुपारी  १.१५ कामधेनू बस स्टॉपवर आली आणि प्रत्येकजण आपले दप्तर बसच्या खिडकीतून आत सीटवर फेकू लागले. बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून. मला ही राहवलं नाही आणि त्याच जोशात हातातील छत्री मी मागून तिसऱ्या सीटवर खिडकीतून ठेवली. आता सीट मिळाल्याचं समाधान होतं त्यामुळे आपण शेवटी चढायचं या उद्देशाने मी मागे राहिले. लोक बसमध्ये चढल्यानंतर मी त्या गर्दीतून आत शिरेल खरी. माझ्या सीटवर वेगळचं कुणी तरी बसलेलं. मी मागचा पुढचा विचार न करता त्याला रागात माझी छत्री विचारली आपल्याला माहीत नाही म्हणून त्यांनी आपली नजर खिडकीच्या दिशेने वळवली. आजबाजूला सगळी शाळकरी मुलेच होती. माझी नवीन छत्री हरवणे शक्यच नव्हतं. अक्षरशः घामाघूम झालेले मी. त्यवेळी माझी सिनियर मैत्रीण बाजूलाच उभी होती तिने मला रडू वगैरे नको आपण कंडक्टर काकांना सांगूया ते देतील छत्री शोधून. या तिच्या शब्दांवर मला विश्वास वाटला. त्या गर्दीत छत्री शोधणे मला शक्य नव्हते. सीटच्या वरती सगळी दप्तरं कोंबलेली ती काढून छत्री शोधणं तर कठीणच. पाच मिनिटांनी बस सुरू झाली. कंडक्टर काका तिकीट काढत मागे आले. माझे पाणावलेले डोळे पाहताच काय झाले हे मला विचारण्या अगोदरच बाजूच्या सर्वांनी घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी अब्दुल काकांनी मला रडू नकोस कोपार्डेला बस खाली होणार त्यावेळी आपण वरच्या कप्यात छत्री शोधू असे सांगून ते तिकीट काढून पुढे निघाले. बाहेर पाऊस जोरात सुरू होता जणू ते थेंब त्याक्षणी माझ्या ही डोळ्यांतून पाझरत होते. तो जणू क्रोधाने बरसत असावा आणि मी दु:खाने. कोपार्डे स्टाॅप निघून गेल्यावर आमचा स्टाॅप जवळ आलेला.परंतु बसमधील गर्दी कमी झालेली नव्हती. मी पोहचण्या अगोदरच हातात दप्तर न घेता ते पाठीला लावून रागाने सगळ्यांना ढकलत पुढे आले आणि अब्दुल काकांना छत्री लवकर शोधून देण्यास सांगितली. काका मागे गेली छत्री शोधेपर्यंत माझा स्टॉप आलेला. काकांनी मला छत्री शोधून  ठेवतो आणि बस परतून येताना‌ तुला देतो आता घरी जा अशी विनवणी केली. परंतु माझ्या भरलेल्या डोळ्यांनी मी नुसती मान हलवून नाही बोलले. बसचा ड्रायव्हर माझ्या स्टाॅपवरून पुढे गेला आणि बस गावात थांबली. बाहेर पाऊस चालूच होता. माझ्यावर बसचे ड्रायव्हर ओरडले मला खाली उतरून घरी जायला बोलू लागले. मी छत्री सापडल्याशिवाय उतरणार नाही असे त्यांना सांगितले. वयाने लहान असल्यामुळे  त्यावेळी ते मला पुढच्या स्टाॅपवर घेऊन जाणारच नव्हते. अब्दुल काकांनी सगळी दप्तरं खाली उतरवली. आणि शोधाशोध सुरू केली. अखेर कोपऱ्यात पडलेली माझी छत्री सापडली. केसरी रंगाची मुगो असे शब्द काकांच्या मुखातून पडता क्षणी मी बाहेर उतरुन छत्री खिडकीतून घेण्याऐवजी पुन्हा त्याच गर्दीतून मागच्या सीटकडे गेले. अब्दुल काका सांगत होते. राव बाय हाव येता मुकार तू थयच राव. पण मला राहवलं असतं तर खरं. मी अखेरीस मागे गेले. आणि छत्री हातात घेऊन त्या सेंकदाला काय डोक्यात विचार आला हे लक्षात येण्याअगोदरच मी हातातील छत्री माझ्या सीटवर बसलेल्या त्या मुलावर जोरात मारली आणि त्या गर्दीतून खाली उतरले. सगळ्यांच्या नजरा मला पाहत होत्या. मी छत्री पेटवली आणि घरी जाण्यास निघाले. छत्रीचा एक काटा तुटलेला होता. त्यादिवसापासून आजपर्यंत कधीही बसमध्ये सीट अडवण्यासाठी कुठलीही गोष्ट मी खिडकीतून आत फेकली नाही की कधी सीटसाठी धावले नाही. पाऊस सुरू झाला की ही आठवण हमखास आठवू लागते. आजही कामधेनू बस बघितली की तो प्रसंग तसाच दिसू लागतो.आणि अब्दुल काका आता तर वयाने थकलेले परंतु कुठे ही भेटले की ‘छत्री आसा मुगो’म्हणत मिश्किलपणे हसतात. ज्याच्यावर छत्री मारली त्याला आजही पाहिले की राग अनावर होतो. कारण आई-बाबांनी दिलेली प्रत्येक गोष्ट कितीतरी वर्षे मी जपून ठेवलेल्या मग तो शाळेतील गणवेश का असेना.आजही तसाच टापटीप माझ्या कपाटात असलेला. पावसा सोबतचं नातं वेगळंच आहे. एखादवेळी रडावसं वाटलं की पावसात भिजत रडायचं म्हणजे आपण रडतो की पावसाचे थेंब डोळ्यांवर पडतात हे सहसा कुणाच्या लक्षात येत नसायचे. पाऊस, अंधार, विजेवीना असलेलं माझं कौलारू घर आणि पावसात जिची जास्त काळजी घेते ती माझी छत्री, माझी पावसाळ्यातील खरी साथ होती.असंख्य असह्य वेदना देणारे प्रसंग आयुष्यात घडले. ते सहन करत गेलो येणाऱ्या बेभान पावसासारखे...


ओनिता रामा वरक, पाल-ठाणे‌, सत्तरी.