फाजील अट्टाहास कशासाठी ?

मुलांना लहानपणी काही कळत नसते आणि आई-वडील म्हणून आपणच त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे असते मात्र मार्गदर्शन आणि अट्टहास यात खूप फरक असतो. आपले मार्गदर्शन नसून कित्येकदा तो अट्टहासच असतो. हा अट्टहास अजिबात नसावा.

Story: पालकत्व |
15th June, 12:39 am
फाजील अट्टाहास कशासाठी ?

१. इच्छा मुलांवर लादणे - पूर्वापार चालत आलेली घोडचूक म्हणजे आईवडील म्हणून आणि अगदीच स्पष्ट सांगायचे तर वडील म्हणून आपल्या इच्छा आपण मुलांवर चक्क लादत असतो. मुलाने कोणता खेळ खेळावा, शिकताना कोणत्या माध्यमात शिकावे, मुलांनी कोणत्या इतर ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यावा की नाही, दहावी पास झाल्यानंतर विज्ञान घ्यावे की कसे, बारावीनंतर मेडिकलला जायचे की इंजिनियरिंगला अशा अनादी अनंत गोष्टी आपण मुलांवर त्यांच्या आवडीनिवडी लक्षात न घेता चक्क लादत असतो. बरेचदा मुलांचा कल वेगळ्याच गोष्टीकडे असतो आणि आपली इच्छा नेमकी त्या विपरीत असल्याने आपण आपलीच इच्छा बरोबर असल्याचे मुलांवर बिंबवतो. 

२. स्वातंत्र्य - अलीकडे आधुनिकीकरणाच्या नावाखाली मुलांना अतिरेकी स्वातंत्र्य दिले जाते. पूर्वी संध्याकाळी सातच्या आत घरात हा नियम होता. आता मुलं सात नंतर बाहेर पडतात व रात्री अपरात्री घरी येतात.

३. अभ्यास एके अभ्यास - काही ठिकाणी मुलांचे काम फक्त अभ्यासच करायचा हेच असते जणू हा अलिखित नियमच असतो. ही मुलं कदाचित अभ्यासात प्रावीण्य मिळवतील सुद्धा. पण अशी मुले factory made बनलेली असतात. बाहेरच्या जगाशी त्यांचा काहीही संबंध नसतो व त्यामुळे त्यांना जगरहाटी समजणे जवळजवळ अशक्यप्राय होऊन बसते. परिणामी अशा मुलांना ज्ञान भरपूर असेलही पण त्यांना ते लोकांपर्यत पोहचवता येत नाही,  किंवा त्याचे implementation करता येत नाही.

४. फाजील लाड - आज बहुतांश घरांत हम दो हमारे दो ही परिस्थिती आहे, त्यातही दोघेही नवरा बायको नोकरीला असल्याने एकतर दिवसभर घरी नसतात, आणि संध्याकाळी घरी आल्यावर इतर घरकामामुळे मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, त्यामुळे मुलांनी त्रास देऊ नये किंवा अति प्रेमापोटी किंवा मुलांच्या नशिबाने आपल्याकडे देण्यासाठी आहे हा विचार पुढे येतो व मुलांचे नसते फाजील लाड पुरवले जातात.

५. खानपान - दिवसेंदिवस ही समस्या तीव्र होत चालली आहे आणि त्याचे दुष्परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. फास्ट फूडचे प्रमाण प्रचंड वाढले आहे त्यामुळे मुलांना जरी पोट भरले असे वाटत असले तरीही प्रत्यक्षात मात्र ते कुपोषण ठरते.

६. पैशाने काहीही खरेदी करता येते व सुख मिळते हा समज - अलीकडे पैशाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. पैसा फेकला की, अशक्य काम सुद्धा शक्य होते,  हे आताच्या लहान मुलांना सांगावे लागत नाही, परिणामी हीच सवय अंगिकारली जाऊन भौतिक सुख हेच खरे सुख असल्याचे मुले समजतात.

७. जीवनाचे ध्येय - लहानपणापासूनच फक्त डॉक्टर, इंजिनियरिंगची स्वप्नं दाखवून पुढे जाऊन भरपूर पैसा कमवायचा आहे, इतकेच ध्येय मुले बाळगतात.

८. घरकाम न शिकवणे - आर्थिक सुबत्तेमुळे आज घरी प्रत्येक कामासाठी गडी ठेवलेले असतात. त्यामुळे प्रत्यक्षात घरकामात मुलांची तशी गरजच पडत नाही. कुणावर ही वेळ कशी येईल हे सांगता येत नाही आणि म्हणून मुलांना आईवडिलांनी घरकाम नेमून देऊन व ते करवून घेतले पाहिजे. मग कामाची लाज वाटत नाही, कमीपणा वाटत नाही. आणि स्वतःची कामे स्वतः करायची सवय लागते.

९. मुलगा मुलगी भेद - अजूनही शिकलेल्या घरातसुद्धा हा भेदभाव पाहायला मिळतो. मुलांसाठी वेगळे नियम आणि मुलींसाठी वेगळे नियम घालून दिले जातात. मुलीने विशिष्ट कपडे घालावेत हा नियम तिच्या भावासाठी नसतो, तर भावाला देत असलेली प्रत्येक कामातील ढील त्याच्या बहिणीला मात्र मिळत नाही.

अशा अनेकविध पैलूविषयी विचार करून एकूणच संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यासाठी आई वडिलांनी प्रयत्नरत राहणे आवश्यक आहे.


साधना पांडुरंग आरोंदेकर, डिचोली.