मेहंदीने चित्रे रेखाटणारी अदिक्षा

चित्रकला हा सर्वांचाच आवडता विषय. जलरंग, तैलरंग अशा नानाविध रंगात चित्रे रंगवली जातात. परंतु मेहंदी, जी आपण हातावर रेखाटतो, त्या मेहंदीतून चित्रे रेखाटणे हा ही नवीन असा सुंदर प्रकार प्रचलित होत असून या कलेत आपले कौशल्य दाखविणारी अदिक्षा वायंगणकर ही कलाकार.

Story: तू चाल पुढं |
15th June, 12:36 am
मेहंदीने चित्रे रेखाटणारी अदिक्षा

मेहंदी हातावर रेखाटताना अगदी नाजुकपणाने रेखाटावी लागते. तशीच कागदावर मेहंदीतून चित्रे रेखाटताना ती ही अगदी नाजुकपणाने व सावधगिरीने रेखाटावी लागतात. नार्वे येथील अदिक्षा वायंगणकर या कलाकार तरुणीने  या कलेची साधना करताना अनेक सुंदर सुंदर चित्रे मेहंदीतून रेखाटली असून एक नवीन प्रकारचा अनुभव तिने आपल्या या कलेतून दिला आहे.


पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर अदिक्षाने नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण निराश न होता तिने आपल्या या कलेतच प्रगती करण्याचे ठरवले. रांगोळी घालणे, विविध प्रकारची चित्रे रंगवणे, नववधूच्या हातावर मेहंदी घालणे, थर्माकोलपासून विविध वस्तू बनवणे यात रुचि असलेल्या अदिक्षाच्या  कल्पनाशक्तीने एक वेगळा विचार केला आणि मेहंदी हातावर घालून सुंदर नक्षी तर काढतोच पण यापासून चित्र बनवले तर ? हा विचार मनात येताच तिने कागदावर देवी लईराईचे पहिलेच चित्र हे मेहंदीने काढले. आणि मग एकापाठोपाठ एक चित्रे काढण्याचा तिने सपाटा लावला.

हातावर मेहंदी घालताना जर काही चूक झाली तर लगेच ती चूक दुरुस्त करताना पुसून ती सुधारता येते. पण कागदावर मेहंदीने चित्र काढताना हे काम अवघड होऊन बसते. कारण कागदावर मेहंदीने चित्र रेखाटताना चूक झाली, तर तिथे तो डाग कायम उरतो आणि मग चित्र बिघडते. त्यामुळे कागदावर मेहंदीने चित्र रेखाटताना अतिशय काळजीपूर्वक चित्र रेखाटावे लागते, कारण अगदी बारीकशी जरी चूक झाली तर संपूर्ण चित्र बिघडून जाते. त्यामुळे मेहंदीने चित्र रेखाटताना अतिशय सावधानता बाळगावी लागते. त्यासाठी एकाग्रता ही महत्त्वाची आहे असे अदिक्षा सांगते. एकदा चित्र काढण्यास सुरुवात केली की, ते चित्र संपूर्ण झाल्याशिवाय अदिक्षा आपल्या हातातील मेहंदीचा कोन खाली ठेवत नाही. त्यामुळे मेहंदीच्या कोनाने एक चित्र रेखाटताना जिद्द, चिकाटी याची ही आवश्यकता भासतेच.

ज्या मेहंदीच्या कोनाने आपण हातावर मेहंदी रेखाटतो, त्याच कोनाने अदिक्षा कागदावर चित्र रेखाटते. ही मेहंदी सुकल्यावर जर ती काढली, तर त्याला मेहंदीचा सुंदर असा आकर्षक रंग ही येतो त्यामुळे अशी चित्रे उठावदार होतात. कधी कधी ही चित्रे तशीच ठेवली, तर त्याची काळी आऊटलाईन ही उठावदार दिसते.

सुरुवातीलाच मेहंदीच्या कोनाने देवी लईराईचे चित्र काढून अदिक्षाने देवीचा आशीर्वाद घेतला आणि मग एकापाठोपाठ एक सुंदर चित्रे काढण्याचा सपाटा तिने लावला. ही सर्व चित्रे तिने आपल्या कल्पनाशक्तीतून रेखाटली आहेत. त्यासाठी तिने कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. तसेच आपण हातावर मेहंदी घालण्यासाठी जो मेहंदीचा कोन वापरतो, त्याच मेहंदीच्या कोनाने तिने ही चित्रे साकारली आहेत. अयोध्येचे श्री राम मंदिर, देव बोडगेश्वर, श्री स्वामी समर्थ, शिवाजी महाराज,  प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांची कलात्मक चित्रे तिने साकारली आहेत. जेव्हा एखादे व्यक्तीचित्र मेहंदीच्या कोनातून  रेखाटले जाते, त्या व्यक्तीरेखेचे डोळ्यातले भाव रेखाटणे हे अतिशय कलात्मकतेचे ठरते. आणि ही कला अदिक्षाने अतिशय सुरेख रीतीने आत्मसात केली आहे. आणि तिची ही कला अनेकांच्या पसंतीस उतरत असून तिच्या या चित्रांना चांगली मागणी आहे. आणि तिच्या कलेला यातून उत्तेजनही मिळत आहे.

मनासारखी नोकरी मिळाली नाही तरी निराश न होता अदिक्षाने आपल्या अंगी असलेल्या कलेला आपल्या उपजीविकेचे साधन बनवले आहे. या क्षेत्रात अदिक्षाला खूप मोठे नाव कामवायचे आहे. अदिक्षा, तू चाल पुढं !....


कविता प्रणीत आमोणकर, रावणफोंड, मडगाव