चाळ नावाची प्रेमळ वस्ती

हल्लीच कानावर एक बातमी आली. मुंबईला राहणाऱ्या बहिणीला तिचं चाळीतलं घर खाली करायला सांगितलं कारण तिथे आता ते पाडून नवा उंच पंचवीस मजल्याचा टॉवर उभा राहणार आहे. इतकी वर्ष आज होणार उद्या होणार या आशेवर तिथे राहणाऱ्या लोकांनी घरे बदलली नव्हती. गेली पन्नास साठ वर्ष घालवली. त्या चाळीशी त्यांचं जीवन बांधलं गेलंय. हे आता ती जागा सोडताना त्यांना जाणवतंय.

Story: मनातलं |
15th June, 12:14 am
चाळ नावाची प्रेमळ वस्ती

मुंबईला चाळ तशी पूर्वी  पुण्याला वाड्याची सिस्टिम होती, माझं बालपण सारं त्या वाड्यात गेल्याने मलाही त्याची अपूर्वाई अजूनही वाटते. एकमेकांना खेटून, चिकटून असलेली घरे मधे फक्त एका भिंतीचा आडोसा, तो असला तरी सगळ्यांची मने मात्र एकत्र मिळालेली. तिथे कधीच कुणी एकटं पडत नव्हतं सगळ्यांना सामावून घेत त्यांना बरोबर घेऊन जाणं हे त्यांच्या अंगी भिनलेलं. एकमेकांना मदत करणं अडीअडचणीला धावून जाणं हा तर त्यांचा  स्थायीभावच बनलेला असतो. संपूर्ण चाळ म्हणजे एक कुटुंब असतं. कुणा एकाच्या घरचा समारंभ हा संपूर्ण चाळीचा सोहळा असल्यासारखे सगळे एकजुटीने कामाला लागतात. सण साजरे करावेत ते या चाळीनेच. दिवाळी असो की गणेशोत्सव, सगळ्यांच्या अंगात उत्साहाचे वारे शिरलेले असते. एकमेकांकडे फराळाची तयारी करायला जाणाऱ्या बायका, मुले आकाशकंदील बनवतायेत, किल्ल्याची आखणी करतायेत, रांगोळ्यांची, पणत्यांची  आरास, प्रत्येकाचे दार असे सजलेले. प्रत्येकाच्या मनात उत्साहाचे उधाण तिथे आनंदाला कसला तोटा, होळीला रंगांची उधळण माझ्या घरी की तुझ्या अंगणात असा भेदभाव नाही, गणपती सगळ्यांच्या घरात नसला तरी ज्यांच्या घरी असेल त्यांना मदत करणं, आरतीला गर्दी करणं ठरलेलं. चाळीचा सार्वजनिक गणपतीचा थाट तर बघायलाच नको. हा खरा सणाचा अर्थ. आनंदात, उत्साहात  एकत्र येऊन केलेली पूजा म्हणजे सण साजरे करणं, ही त्यांची व्याख्या. कुणाची मुलगी बाळंतपणाला आली की तिचे डोहाळे पुरवायला आजूबाजूच्या बायकांनाच भारी उत्साह, कुणाचा  साखरपुडा असो की मुंज सगळे मदतीला हजर, अशावेळी भांड्यांची, वस्तूंची, सामानाची देवघेव ही तर चालायचीच.  कुणाला काही मागताना मनातून संकोच वाटत नव्हता, कमीपणा तर अजिबात नाही.  सगळं  हक्कानं  समजून घेत केलं जायचं. कुणाच्या संकटकाळी ही चाळीतली मंडळीच आधी धावून यायची. नातेवाईक नंतर पोहचायचे. खरी गरज असते ती चांगल्या शेजाराची हे तेव्हाच मनातून उमगले होते. त्याची तशी सवयच झाली होती. माणुसकी जपलेली नाती तिथं बघायला मिळायची. काकूंनी नव्याने केलेल्या लोणच्याची वाटी शेजारीपाजारी पोहचायची, कुणाला कोलमीचं तिखट आवडतं हे लक्षात ठेवून त्या घरी नमूना म्हणून पोहचवलं जायचं, कुणाच्या गावाहून शेतातला आलेला वानवळा घरोघरी पोचता व्हायचा. एकट्याने खाण्यापेक्षा  वाटून खाण्यात मजा आहे ही त्यांची धारणा असायची, कुणाच्या दाराला कुलूप लावायची वेळ यायची नाही.  “मावशी जरा दळण घेऊन येते बाळ घरात झोपलंय लक्ष ठेवा” म्हणत बिनधास्त जायची, “भाजी आणायला चाललेय काकी तुम्हाला काही हवं आहे का?” मग काकी पण हक्काने “लिंबू टोमॅटो आण” म्हणून सांगायच्या. मुलीला बघायचा कार्यक्रम असला की साऱ्या चाळीला त्याच्या रिझल्टची उत्सुकता, कुणाच्या मुलाला बारावीत मार्क्स चांगले मिळाले की चाळभर पेढे वाटले जायचे. आनंद अशाने द्विगुणित व्हायचा. कुणाच्या मुलीचे कुणा बरोबर लफडे आहे हे त्यांच्या घरी कळण्याअगोदर चाळीच्या तीक्ष्ण नजरेने ते टिपलेले असायचे. माणसांना माणसांचे महत्त्व वाटत होते. वडिलधाऱ्यांचा धाक, हक्काने मिळणारा त्यांचा ओरडा, त्यांना प्रत्युत्तर करायचे नाही ही शिकवण चाळीतच मिळते. आहे त्यात समाधानाने कसे जगायचे आणि कसे वागायचे याचे धडे चाळीतच मिळू शकतात. प्रायव्हसी नावाची चीजच अस्तित्वात नव्हती. जे आहे ते सार्वजनिक व्हायचे, म्हणूनच माणसे आपल्या चारित्र्याला जपायची. चाळीत घराचा एरिया पाहता जागा जरी लहान असली तरी माणसांच्या मनात भरपूर जागा असे. चाळीत राहणारा माणूस स्वत:च्या घरात कमी शेजाऱ्याच्या घरातच जास्त सापडणार. माणसांना मनापासून जोडते ती चाळ असं म्हणता येईल. माणुसकी, आपुलकी जपणारी माणसे एकमेकांच्या सुखदुखात वाटेकरी होत जीवनाचा अविभाज्य भाग बनतात. माणसाच्या जीवनातला जिवंतपणा, रसरशीतपणा इथे अनुभवायला मिळतो. इथे राहणारी माणसे भले धनाने नसतील पण मनाने श्रीमंत असतात. घराचे खुले दरवाजे हे मनाची कवाडे उघडी ठेवायला मदत करतात. कुणीही कधीही यावे “आओ जाओ घर तुम्हारा” असं जरी चित्र असलं तरी एकमेकांविषयी मनात तेवढी ओढ, आपलेपण इथेच बघायला मिळायचे. इथे राहणाऱ्या प्रत्येकाचे मात्र एक स्वप्न असते आपण कधी मोठ्या घरात फ्लॅट मधे राहायला जाणार ? पण जेव्हा जायची वेळ येते तेव्हा होणारी वियोगाची भावना, “नको असं वेगळे व्हायला” असं सांगत असते. कारण फ्लॅट संस्कृति मधे चाळीतला ओलावा टिकून रहात नाही तिथे सगळे आपापली दारे बंद करून बसतात. स्वत:ची प्रायव्हसी जपतात. बंद दारात माणुसकी ही बंद होत जाते. शेजारधर्म विसरला जातो.

(क्रमशः)


प्रतिभा कारंजकर, फोंडा.