अपयश आणि ध्रुवीकरण

दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दाखवण्यापेक्षा आपल्या डोळ्यातील मुसळ भाजपने पहावे. आपल्या नको त्या विधानांमुळे राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते, याचेही भान ठेवावे. हिंदू- ख्रिस्ती यांच्यातील दरी वाढवण्यापेक्षा ती मिटवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी परिपक्वता दाखवावी.

Story: संपादकीय |
14th June, 12:40 am
अपयश आणि ध्रुवीकरण

आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यांवर फोडणे म्हणजे पराभवाचे विश्लेषण किंवा आत्मपरीक्षण नव्हे. सध्या भाजप दक्षिण गोव्यातील पराभव ख्रिस्ती धर्मगुरूंनी केलेल्या मतांच्या ध्रुवीकरणामुळे झाल्याचे म्हणत आहे. दक्षिणेतला पराभव इतका जिव्हारी लागला आहे की, भाजपने ख्रिस्ती आमदार आणि मतदारांना कितीही जवळ करण्याचा प्रयत्न केला तरीही ख्रिस्ती मतदार भाजपसोबत राहत नाहीत असा त्यांचा समज झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपने ख्रिस्ती मतदारांना खुश करण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले. ख्रिस्ती आमदारांना मंत्रिपदे देण्यापासून ते ख्रिस्ती आमदारांना पक्षांतराच्या माध्यमातून भाजपात ओढण्यापर्यंत जे शक्य ते आहे तेवढे प्रयत्न भाजपने केले. अनेकांना काँग्रेसमधून सन्मानाने भाजपात आणून भाजपने मंत्रिपदे दिली. राज्यातील इतर ठिकाणी ख्रिस्ती आमदार भाजपसोबत राहतो, भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवतो पण सासष्टीतला मुरलेला ख्रिस्ती राजकारणी भाजपकडून सर्व फायदे मिळवतो आणि शेवटी निवडणूक लढायच्यावेळी भाजप सोडून तो अपक्ष किंवा अन्य पक्षांच्या उमेदवारीला प्राधान्य देतो. भाजपच्या उमेदवारीवर लढल्यास मतदार स्वीकारणार नाहीत, हे या ख्रिस्ती राजकारण्यांनाही माहीत आहे. या कामात सासष्टीतील ख्रिस्ती राजकारणी एका पद्धतीचे राजकारण अनुभवतात आणि राज्यातील इतर भागांतील ख्रिस्ती राजकारणी दुसऱ्या पद्धतीचे राजकारण अनुभवतात. गोव्यातील ख्रिस्ती राजकारण्यांचे असे दोन प्रकार आहेत.

सासष्टी वगळता इतर ठिकाणी ख्रिस्ती राजकीय नेता हा ख्रिस्ती मतदार मोठ्या प्रमाणात असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढतो आणि बहुतांशवेळा जिंकूनही येतो. जेव्हा सासष्टीचा विषय येतो त्यावेळी ख्रिस्ती राजकीय नेत्यांना तिथे भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढणे म्हणजे राजकीय कारकीर्द पणाला लावल्यासारखे वाटते. इतर तालुक्यांपेक्षा सासष्टीत ख्रिस्ती लोकसंख्या व ख्रिस्ती मतदार जास्त असल्यामुळे तिथले ख्रिस्ती राजकारणी हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्याचा विचार सोडून देतात. भाजपचा पाठिंबा आहे असे जरी स्पष्ट झाले तरीही ख्रिस्ती नेत्यांना तिथे मतदारांचे पाठबळ मिळत नाही. गेल्या आठ दहा वर्षांतच भाजपसोबत असलेल्या अनेक राजकीय नेत्यांना तिथल्या मतदारांनी घरी बसवले आहे. आपला पक्ष धर्मनिरपेक्ष आहे आणि ख्रिस्ती धर्मीयही आपल्याला तेवढेच प्रिय आहेत जेवढे हिंदू धर्मीय आहेत, हे भाजपने ख्रिस्ती धर्मियांना पटवून द्यावे लागेल. एका बाजूने कट्टर हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणे आणि दुसऱ्या बाजूने अल्पसंख्याकांसाठी मगरीचे अश्रू ढाळणे असे धोरण असेल तर त्याला मतदार आपणहून उत्तर देतील. त्यासाठी मतदारांना कोणी धर्मगुरूंनी मार्गदर्शन केले किंवा मतदारांना धर्मनिरपेक्ष, संविधानाचे संरक्षण करणाऱ्यांना, रामराज्य आणणाऱ्या मतदान करा असे आवाहन केले तर धर्मगुरूंचे यात काही चुकले असे म्हणता येणार नाही. शेवटी जागृती करणे हाच धर्मगुरूंचा खरा धर्म असतो. भाजपने ख्रिस्ती धर्मगुरूंवर खापर फोडण्यापेक्षा पक्ष म्हणून आपण कुठे कमी पडलो याचे निरीक्षण करावे. ज्यावेळी आपल्याला कुठला धोका नाही असे जेव्हा ख्रिस्ती किंवा अन्य अल्पसंख्याकांना वाटेल तेव्हाच ते पूर्णपणे भाजपसोबत राहतील. त्यांना सुरक्षित वातावरण रहावे यासाठी प्रयत्न करावे लागतील. सर्वांना सोबत घेऊन पुढे जावे लागेल. एकमेकाला जाती धर्मांवरून कोसणे आणि ख्रिस्ती धर्मगुरूंनी मतांचे ध्रुवीकरण केले असे म्हणणे हे अत्यंत चुकीचे आहे. दक्षिण गोव्यात बहुजन समाज व कार्यकर्त्यांनी भाजपला नाकारल्याचे वास्तव लपवण्यासाठी भाजपचे नेते चर्चच्या धर्मगुरूंना जबाबदार धरतात असा आरोप काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी केला, त्यातही तथ्य असावे.

सरकार पक्षातील मंत्री सुदिन ढवळीकर यांनीही दक्षिणेतला पराभव हा आमच्याच कार्यकर्त्यांनी काम न केल्यामुळे झाला आहे. ज्या अकरा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवाराला आघाडी मिळाली, तिथे प्रत्येक ठिकाणी अजून दोन हजार मतांची आघाडी मिळाली असती तर हा प्रश्न उद्भवला नसता असे म्हणून भाजपला ढवळीकर यांनी आरसा दाखवला आहे. एक परिपक्व राजकारणी म्हणून सुदिन ढवळीकरांचे हे म्हणणे सर्वांनीच मान्य करायला हवे. ढवळीकरांनी आपल्या मतदारसंघात भाजप उमेदवाराला मतांची मोठी आघाडी दिली होती. इतर मतदारसंघांत तेवढी मते मिळाली नाहीत. मडकई वगळता भाजपच्या अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मते मिळाली. दक्षिण गोव्यात भाजपचे पंधरा आमदार असतानाही भाजपचा उमेदवार पराभूत होतो याचा अर्थ भाजपचे आमदार, मंत्री, पदाधिकारी हे अपयशी ठरले आहेत. त्यांच्या अपयशाचे खापर ख्रिस्ती धर्मगुरू किंवा ख्रिस्ती मतदारांवर फोडल्यामुळे स्थिती बदलणार नाही. दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दाखवण्यापेक्षा आपल्या डोळ्यातील मुसळ भाजपने पहावे. आपल्या नको त्या विधानांमुळे राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते, याचेही भान ठेवावे. हिंदू- ख्रिस्ती यांच्यातील दरी वाढवण्यापेक्षा ती मिटवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी परिपक्वता दाखवावी.