पणजी : स्मार्ट सिटीतील नागरिकांना सायंकाळच्या वेळी एकत्रित येण्यासाठी तसेच त्यांच्या विरंगुळ्यासाठी वेगवेगळ्या भागांत स्वच्छ स्ट्रिट फूड आणि मनोरंजन झोन स्थापन करण्याचा निर्णय आज महानगरपालिकेच्या बैठकीत घेण्यात आला. ही माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली.
पणजीत कुठेही स्ट्रिट फूड मिळत नाही. शिवाय सायंकाळनंतर पणजीकरांना मनोरंजनाची, विरंगुळ्याची कसलीच सोय नाही. हीच बाब लक्षात घेऊन मनपाने वरील निर्णय घेतल्याचे महापौर मोन्सेरात यांनी म्हटले आहे. यासाठी जागा निश्चित केल्या जाणार आहेत. काही विक्रेत्यांनी नॅशनल थिएटर, जॉगर पार्क आदी जागा सुचवल्या आहेत. पण, जिल्हाधिकाऱ्यांकडून निश्चित झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतले जातील, असेही महापौर मोन्सेरात यावेळी म्हणाले.
पणजीच व्यावसायिक मनोरंजनाचे कार्यक्रम असतात. पण, सामान्य नागरिकांसाठी सहज त्यांचा आस्वाद घेता येत नाही. म्हणूनच वेगवेगळ्या भागांत मनोरंजन झोन स्थापन केले जाणार आहेत. या ठिकाणी निवांत बसण्यासाठी, संगीत, चटपटीत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी चांगली सोय केली जाईल. या झोनमुळे पार्किंगची समस्या उद्भवणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल, असेही ते म्हणाले.
पणजीत सध्या ९२ अधिकृत खाद्यपदार्थांचे गाडे आहेत. याशिवाय अन्य गाडेेही चालवले जात आहेत. त्यांना एका छत्राखाली आणि एका नियमांखाली आणणे गरजेचे आहे. त्यांनाही याचा लाभ होईल. शिवाय पणजीकरांनाही याचा लाभ होईल. मनोरंजन झोनमध्ये पणजीतील तसेच गोव्यातील कलाकारांनाही स्वतःतील कलागुण दाखवण्याची संधी मिळेल, असे महापौर रोहित मोन्सेरात यांनी म्हटले आहे.