टीम इंडियाने पाकिस्तानची पुन्हा एकदा जिरवली

सहा धावांनी थरारक विजय : पंत, बुमराह विजयाचे शिल्पकार

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
11th June, 12:11 am
टीम इंडियाने पाकिस्तानची पुन्हा एकदा जिरवली

न्यूयॉर्क : ड्रॉप इन पिच, न्यूयॉर्कचे बेसबॉलचे मैदान, सूर्य आणि पावसाचा लपंडाव या सगळ्यात पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान मोडीत काढत भारतीय संघाने ट्वेन्टी २० वर्ल्डकप स्पर्धेत ६ धावांनी अफलातून विजय नोंदवला. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री ८ वाजता सुरू झालेला हा सामना मध्यरात्र उलटल्यानंतरच संपला. 

ऋषभ पंतने साकारलेली ४२ धावांची खेळी, तीन भन्नाट झेल आणि जसप्रीत बुमराहने शिस्तबद्ध माऱ्यासह पटकावलेले ३ बळी या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. पाकिस्तानविरूद्धच्या या विजयासह भारताचे २ सामन्यात ४ गुण झाले आहेत. सुपर ८ साठी ते आगेकूच करत आहेत. मात्र पाकिस्तानसाठी हा पराभव स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणणारा ठरू शकतो.      

भारतीय गोलंदाजांच्या अखेरच्या षटकांतील भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने रोमहर्षक विजय मिळवला आहे. टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारत-पाकिस्तानच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताच्या उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळाले. न्यूयॉर्कमधील फलंदाजीसाठी अवघड असलेल्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर तगडी फलंदाजी फळी असलेला भारतीय संघ ११९ धावांवर ऑल आऊट झाला. मात्र अवघ्या ११९ धावांच्या लक्ष्याचा बचाव करत भारतीय संघाने पाकिस्तानविरूद्ध चित्तथरारक विजय मिळवला आहे. अखेरच्या ६ षटकांत पाकिस्तानला ४० धावांची गरज होती, पण भारताच्या गोलंदाजांनी इतकी भेदक गोलंदाजी केली की कोणीही समोर टिकू शकले नाही.      

भारताने दिलेल्या या १२० धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा संघ ११३ धावा करू शकला. यादरम्यान भारताच्या सर्व गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. जसप्रीत बुमराह संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात १४ धावा देत ३ विकेट घेतले. भारताला पहिली विकेटही बुमराहने मिळवून दिली. तर हार्दिक पांड्याने २ फलंदाजांची विकेट मिळवली. दुसरीकडे अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांच्या खात्यात प्रत्येकी १ विकेट आली. तर मोहम्मद सिराजला एकही विकेट मिळाली नसली तरी त्याने ४ षटकांत १९ धावा देत चांगली गोलंदाजी केली.      

पाकिस्तानची सुरूवात लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली झाली, पण भारताच्या गोलंदाजीसमोर खेळाडू मोठी धावसंख्या करू शकले नाहीत. बाबर आझम, उस्मान खान, फखर जमान हे तिन्ही फलंदाज प्रत्येकी १३ धावा करत बाद झाले. तर इमाद वसीम १५ धावा करून बाद झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिजवानने ४४ चेंडूत १ चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा केल्या, पण तोही १५ व्या षटकात बुमराहकडून क्लीन बोल्ड झाला. याशिवाय पाकिस्तानचे इतर खेळाडू स्वस्तात बाद झाले. पाकिस्तानचा संघ १५ षटकांनंतर एकही चौकार षटकार लगावू शकला नाही. अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर एक चौकार लागला पण तोपर्यंत सामना हातातून निघून गेला होता. या सामन्यात भारतीय संघ फक्त १९ षटके खेळत ११९ धावांवर ऑल आऊट झाला. 

टीम इंडियाचा विश्वविक्रम

भारताने पाकिस्तानविरुद्ध टी-२० मधील सातवा विजय नोंदवला. या विजयासोबतच भारतीय संघाने एक नवा विश्वविक्रम रचला. भारतीय संघाने टी-२० विश्वचषकात कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विश्वविक्रम केला. याआधी टी-२० विश्वचषकात कोणत्याही संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम पाकिस्तानच्याच नावावर होता. टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध सहा वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर श्रीलंकेनेही वेस्ट इंडिजचा सहा वेळा पराभव केला आहे. पाकिस्तानला हरवून भारताने पाकिस्तानचा विक्रम मोडला आहे.