सोनापूर गावात मनू नावाची एक लहान मुलगी राहायची. लहानपणापासूनच तिला वाचनाची फार आवड होती. जवळच्या वाचनालयात जावून ती तासनतास गोष्टी वाचत बसायची. ‘गोड गोड गोष्टी’, ‘सिंदबादच्या सात सफरी’, ‘परीकथा’, ‘शूरांच्या गोष्टी’, ‘धाडसी चंदू’, ‘धिटुकली’, ‘भूतबंगला’, ‘अरेबियन नाईट्स’ यासारखी विविध प्रकारची पुस्तकं तिनं वाचली होती. पण त्यातल्या त्यात तिला आवडायची ती ‘अरेबियन नाईट्स’मधली दिव्याची गोष्ट...
तिलाही वाटायचं कधीतरी आपल्यालाही मिळेल एखादी जादूची वस्तू... मग काय गंमत! ती शोधायलाच सुरु करायची. तासनतास मातीत बसलेली असायची खेळत. माती खोदत बसायची. आपल्याला काही तरी मिळेलच असे तिला नेहमी वाटायचे.
आई ओरडायची, “अगं घरात चल!” मनू म्हणायची कशी, “आई गं... मी जादूची वस्तू शोधतेय... थोडा वेळ थांब ना गं... अजून कुठेतरी खणून पाहते मी…” आईही कंटाळायची तिच्या ह्या वागण्याला आणि आपल्या कामाला जायची. एक दिवस गावात एक फकीरबाबा आले. गावातले सारेजण आशीर्वाद घ्यायला त्यांच्याकडे जाऊ लागले. तेही एकेकाला प्रसाद देऊन आशीर्वाद देत होते. अडीअडचणींवर उपाय सांगत होते.
मनूची आईही तिला घेऊन दर्शनाला गेली. तिने फकीरबाबांना नमस्कार केला आणि म्हणाली, “बाबा आमच्या मनूला जादूचं फार वेड आहे. या वेडापायी गोष्टी वाचणं व जादूची वस्तू शोधणं यातच ती दंग असते.”
फकीरबाबांनी थोडा विचार केला आणि आपल्या झोळीतून काही वस्तू काढल्या. अरे हे काय. त्यांच्या हातात वेगवेगळ्या आकाराचे, निरनिराळ्या रंगांचे आरसे होते. त्यातला तांबड्या रंगाचा, मूठ असलेला आरसा त्यांनी मनूला दिला व म्हणाले, “मनू हा आरसा तुझ्याजवळ सांभाळून ठेव. बोलका आरसा म्हणतात याला. यात तू तुझा चेहरा रात्री झोपण्यापूर्वी बघ. मग तुला खरी गंमत कळेल.” मनू आनंदाने आरसा घेऊन घरी आली.
आजी दारातच उभी होती. तिने गुडघ्यावर हात ठेवून वाकून विचारले. “मन्या हा आरसा कुठनं आणलास गो.?”
“अगं आज्जी, हा आरसा मला फकीरबाबांनी दिलाय. साधासुधा आरसा नाही काय तो. जादूचा आरसा आहे, जादूचा…” मनूने गुढघ्यावर हात ठेवून कंबरेत वाकत आजीची नक्कल करत उत्तर दिले.
मनूने खोलीच्या मधोमध तो आरसा लावला व रोजच्याप्रमाणे ती आपल्याच नादात मातीत खेळायला निघून गेली. आई सांगत होती, “मातीत नको खेळू मनू.” “असं गं काय करतेस आई? खेळू दे ना मला…” असं म्हणून ती तिथून निघून गेली. “मनू बाळा... गृहपाठ तरी पूर्ण कर तुझा. मग जा खेळायला.” आई आपली एकटीच बोलत होती. पण मनूचे तिकडे लक्षही नव्हते. ती आपली मातीत किल्ला करत बसली होती. इतक्यात तिला एक सुंदर सोनेरी कडा असलेले एक निळे फुलपाखरू दिसले. मनूने अलगद जाऊन ते फुलपाखरू पकडले. शेजारची श्वेताही तिच्याबरोबर खेळायला आली होती. तिने घरात पळत जाऊन एक दोर आणला आणि त्या दोराने फुलपाखराचे पाय बांधले.
आजी ओसरीवर बसली होती. “अगो... त्या नाजुकश्या जीवाला मारून का टाकणार आहात? नको गो मनू, सोड त्याला…”
“अगं आज्जीऽऽऽ ... आम्ही फक्त खेळतोय. दुसरं काही नाही. आम्ही कशाला मारू त्याला! नाही का गं श्वेता?”
“तुझा खेळ होतोय पण त्या मुक्या प्राण्याचा जीव जातोय गो.” आजी एकटीच बडबडत होती. मनूचे तिकडे लक्षही नव्हते. तिचे लक्ष होते फक्त आकाशाकडे. दोर बांधलेले ते फुलपाखरू या झाडावरून त्या झाडावर उडत होते. मध्येच आकाशात झेप घेण्याचा प्रयत्न करीत होते. दिवसभर फुलपाखराला घेऊन मनू आणि श्वेता पतंगासारखे खेळवत होत्या. त्याच्या मागून धावत होत्या.
रात्र होत आली. मनू घरात आली. हातपाय धुवून ती जेवायला बसली. आई पानात गरमगरम वरणभात वाढत होती. त्यावर तूप घालायच्या आतच तिने भात कालवून घास घ्यायला सुरुवात केली. “अगं सावकाश जेव गो…” आजी सांगत होती. पण मनूच्या डोक्यात आरशाचे विचार चालू होते. आपल्याच नादात तिने भरभर जेवण संपवले. जेवून झाल्यावर ती आरशाकडे गेली.
मनूने आरशात आपला चेहरा बघितला. इतक्यात तिला हाक ऐकू आली. “मनू… ए मनू…” तिला कोणीतरी हाका मारत असल्यारखे वाटले. ती मोठ्या उत्सुकतेने इकडेतिकडे बघू लागली.
“कोण? कोण बोललं?” ती आजूबाजूला पाहत विचारत होती. खोलीत तर कुणीच दिसत नव्हते. कोणी दिसत नाही हे पाहून ती गडबडली, गोंधळल्यागत झाली.
“मनू, मी बोलतोय... बोलका आरसा!” आवाज ऐकू येताच तिने आरशाच्या दिशेने आपली मान वळवली. होय! तो बोलका आरसाच बोलत होता. आता काही तरी जादू पाहायला मिळणार असे वाटून मनूला खूप आनंद झाला.
“मनू आज तू काय काय केलेस ते पहा माझ्या या आरशात डोकावून.” बोलका आरसा म्हणाला. तिने आरशात डोकावले तर तिला आपला गृहपाठ करायचा राहायला आहे असे दिसले. “मनू तू आज गृहपाठ केला नाहीस वेळेवर. उद्या तुला बाई मारतील.” आरसा हसतच म्हणाला.
“तू खोटं बोलतोयस!” मनू चटकन म्हणाली.
“असं म्हणतेस काय? मग हे बघ.” तिने आरशात बघितले, तर काय? बाई तिला जोरजोराने छडीने मारीत होत्या. तिची तर घाबरगुंडीच उडाली ते पाहून.
तिने पुढे काय दिसणार या विचारात पुन्हा एकदा आरशात डोकावले. आपण साधूबाबांकडून घरी आल्यावर आजीची केलेली नक्कल त्या आरशात दिसत होती. “तू आज आजीची नक्कल केलीस, खरं ना? देवबाप्पा शिक्षा करतो मग. बाळ मनू, म्हाताऱ्या माणसांची अशी नक्कल करू नये आणि आपल्या आईचंही ऐकावं. कळलं का मनू?” मनूच्या गोल काळ्याभोर डोळ्यातून पाणी येत होते. तिला आपली चूक समजली होती. तिने डोळे पुसतच पुन्हा एकदा आरशात काय दिसणार हे पाहण्याकरिता त्यात डोकावले. फुलपाखराला पकडतानाचे दृश्य तिला आरशात पाहायला मिळत होते.
“हे गं काय मनू राणी? फुलपाखरांना घट्ट दोरांनी बांधून त्याला उडवू नये असं पतंगासारखं!”
“का रे आरसोबा? मी तर फक्त खेळत होते. मी कुठं काय केलं त्या फुलपाखराला?”
“अगं, तू दोर नाही का बांधलास त्याला गच्च आवळून? त्याला किती दुःख झालं असेल, वेदना झाल्या असतील.” आरसा बोलत चालला होता... मनू एकाग्रपणे ऐकत होती.
आता मनू दिवस संपला की रोज रात्री आरशात डोकावून आपण केलेल्या दिवसभराच्या दृश्यांना पाहत होती. आरसा तर रोज मनूला सतावू लागला होता. चुका दाखवून! रोजची आरशाची बडबड ऐकून, उपदेश ऐकून मनू चुका सुधारण्याचा प्रयत्न करत चालली होती.
असं होता होता बरेच दिवस निघून गेले. दिवस संपून रात्र कधी होत होती हे मनूच्या लक्षातही येत नव्हती. ती आपल्या चुकांना सुधारण्याचा खूप प्रयत्न करत असायची. आपल्या आईशी, आजीशी चांगले वागत चालली होती. आणि ती एके दिवशी अशीच अचानक आईकडे धावत आली नि म्हणाली, “आई मी पुन्हा कध्धी कध्धी नाही चुकणार... मग त्या आरशात काही दिसणार नाही ना? बोल ना गं आई.”
आई मनूला जवळ घेत म्हणाली, “बाळ मनू, तू ज्या दिवशी चुका करणार नाहीस, शहाण्या मुलीसारखी वागशील, गरिबांना, गरजू माणसांना मदत करशील तेव्हा तेही दाखवेल तो आरसा.”
“आई खरंच?” मनू आनंदून जात म्हणाली. आईने मानेनेच हसून होकार देताच मनू आईच्या कुशीत शिरली. आई तिला थोपटत होती. मनूला झोप लागली होती. पण झोपेतही तिची बडबड चालूच होती. “मी खूप खूप चांगली वागेन. सर्वांना मदत करेन. मोठ्या माणसांची नक्कल करणार नाही. कुण्णा कुण्णाला दुखावणार नाही. मग तरी आरसोबा मला शहाणी म्हणेल ना!”
गौरी भालचंद्र, मालपे - पेडणे