लहान मुलांनाही आज मोबाईलचे जणू व्यसन लागलेले आहे. सुरुवातीला जेव्हा मूल मोबाईल वापरू लागते तेव्हा आई वडील मुलाचं तोंडभरून कौतुक करतात. पण जेव्हा हाच मोबाईल राक्षस होऊन डोक्यावरच बसतो तेव्हा मात्र पालक हादरतात. मुलांच्या परीक्षेसंदर्भात जर पाहिलं तर “सर्वांगीण विकासासाठी शिक्षण” हा शिक्षणाचा मूळ उद्देश. पण तसे होत नाही.
परीक्षेच्या काळात मुलं आणि पालक या दोघांमध्ये जणू असंतोष घुमसत असतो. मग समंजस संवादाऐवजी चिडचिड, अबोला तर कधी आरडाओरड. वाद, प्रतिवाद जास्त. एक तर संवादच नाही आणि झालाच तर आरोपांच्या फैरी. मुलांनी अभ्यास करावा, त्याने परीक्षेत चांगले गुण मिळवावेत या आई-वडिलांच्या अपेक्षा रास्त आहेत. पण एखाद्या विषयात ७० ते ७५ टक्के गुण मिळविणाऱ्या मुलांनाही पालक सांगतात, “तुला यावेळी पेपरमध्ये ९५ टक्केपेक्षा जास्त गुण मिळाले पाहिजेत.”
हा संवाद साधा वाटत असला तरी त्यामुळे मुलांच्या मनावर ताण येतो. मग काही मुलांना डोके दुखणे, चिडचिड होणे, झोप न लागणे, अभ्यास करूनही न आठवणे यासारख्या समस्या निर्माण होतात. स्वतःच्या मर्जीप्रमाणे, इच्छेनुसार काही करायला मिळाले तर मुलं खुलतात, व्यक्त होतात, स्वतःचं अवकाश स्वतः शोधतात. म्हणून पालकांनी वेळोवेळी मुलांशी समंजसपणे संवाद साधणे गरजेचे आहे.

साधना पांडुरंग आरोंदेकर, डिचोली.


