समाधानाचं वरदान

Story: मनातलं |
08th June, 12:06 am
समाधानाचं वरदान

माणूस म्हटला की त्याचे मन हे आलेच, मग मनाशी निगडित भावभावनाही त्या पाठोपाठ आल्याच. आनंद, दु:ख, उदासीनता, गंभीरपणा, द्वेष, आकस साऱ्याच भावना महत्त्वाच्या. आनंद किंवा दु:ख ही जर भावना म्हटली, तर समाधान ही वृत्ती म्हटली पाहिजे. कारण भावना ह्या तात्कालिक असतात कधी बदलतील सांगता येत नाही. पण वृत्ती मात्र कायम स्वरूपी मनात ठाण मांडून बसलेली असते. ती माणसाच्या स्वभाव गुणधर्माशी निगडित असते. कुणाची कंजूस वृत्ती असते कुणाला काही द्यायचे म्हटले की त्यांच्या अंगावर काटा येतो, कुणाची दुष्ट वृत्ती असते कुणाचे चांगले झालेले बघवतच नाही, कुणाची स्वार्थी वृत्ती असते स्वत:च्या स्वार्था पलीकडे त्यांना काहीच दिसत नाही. तसेच एखाद्या व्यक्तीची असमाधानी वृत्ती असते म्हणजे जे आपल्याकडे आहे ते पुरेसे नाही त्यापेक्षा अजून काहीतरी हवे आहे असे सतत वाटत राहणे म्हणजे तो माणूस असमाधानी वृत्तीचा आहे असे म्हणता येईल. ही ‘अजून पाहिजे’ ची भावना त्याला स्वस्थ बसू देत नाही आणि त्यामुळे ती व्यक्ती कधीच सुखी होत नाही. देशात राहणाऱ्यांना परदेशाची अपूर्वाई वाटत असते तिकडे गेल्यावर जास्त पैसा, जास्त सुख मिळेल मग आपल्याला कधी जायला मिळेल या आशेने त्यांच्या मनातली समाधानाची भावना नाहीशी होत जाते. 


जीवनात प्रत्येकालाच सुख दुःखाचा सामना करावा लागतो. हे एव्हढं आताचं दु:ख सरलं की लगेच सुख किंवा आनंद येईलच आपल्या जीवनात, असे वाटत असले तरी तसे होतेच असे नाही अशा वेळी माणसाची समाधानी वृत्ती असणे गरजेचे असते. कितीही वाईट गोष्टींचा सामना करायला लागला तरी मनाची समाधानी वृत्ती ढळू द्यायची नाही मग दुःखाची तीव्रता कमी होते आपला मूड ठीक होतो. समाधानाची वृत्ती म्हणजे एखादी गोष्ट मिळाली की जो मनापासून आनंद होतो ती मनस्थिती. त्यामुळे  आपल्याला सुखदायी वाटते. आपल्याला हवे होते ते मिळाले अशा पूर्ततेतून मनात उठणारे आनंद तरंग. तृप्त होण्याची स्थिती म्हणजे समाधान. पूर्तीचा पाठलाग करणे हा खरे तर यशाचा योग्य मार्ग आहे. यश मिळाले की समाधान होते सतत प्रयत्न करत राहिले तर आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचायला वेळ लागत नाही. आपल्या मनात जर दुसऱ्यांची प्रगती खूपत असेल त्याची भरभराट तुमच्या असमाधानाला करणीभूत ठरत असेल तर सर्वात आधी दुसऱ्या व्यक्तीशी तुलना करणे बंद केले पाहिजे. त्यामुळे सतत मनात अतृप्तता किंवा कमीपणाची भावना मनाला त्रास देत राहते आणि मनाचे समाधान कधीच होत नाही. नोकरी करणाऱ्या मित्राला वाटते आपला व्यवसाय करणारा मित्र अधिक सुखी, पैसेवाला आपण नेहमीच गरीब राहणार. 

आपल्या रोजच्या जीवनात कितीतरी प्रसंग घडत असतात. तेव्हा आपल्याला राग येतो, चिडचिड होते, वाईट वाटतं, पश्चात्ताप होतो अशा अनेक भावनाचा कल्लोळ मनात चाललेला असतो पण अशा वेळी मन थाऱ्यावर आणायचे काम आपली समाधानी वृत्ती करत असते. मुलगी झाली तर वाटते मुलगा व्हायला हवा होता मुलगा झाला की मुलगी हवी होती ती माया करते असे वाटत राहते पण समाधानी वृत्तीचा माणूस हा वाईट प्रसंगातही मनाला धीर देत खंबीरपणे उभा राहतो. मुलगा असो की मुलगी कुणा कुणाला मुलेच नसतात त्यापेक्षा मी सुखी आहे. हे समाधानकारक आहे. 

लहानपणीची लाकूडतोड्याची गोष्ट आठवा, त्यात त्याची कुऱ्हाड पाण्यात पडते म्हणून तो देवाचा धावा करतो देव त्याला सोन्याची, चांदीची कुऱ्हाड देऊ पाहतो पण त्याला त्याची साधी कुऱ्हाड हवी असते त्यातच तो समाधानी असतो. त्याची समाधानी वृत्ती त्याला प्रामाणिक रहायला शिकवते. हे हल्लीच्या जगात बघायला मिळत नाही. जो तो जास्त पैसे मिळवण्याच्या नादात नको ते करून बसतो, लाच घेणे, पैसे खाणे ह्या सगळ्या गोष्टी घडायच्या मुळाशी, त्या व्यक्तीची असमाधानी वृत्तीच कारणीभूत ठरते. आणखी एका गोष्टीत एका गरीब भिकाऱ्याला देव प्रसन्न होतो आणि त्याच्या झोळीत तो सोन्याच्या मोहरा ओतत राहतो त्या भिकाऱ्याच्या असमाधानीपणामुळे तो पुरे म्हणत नाही आणि जीर्ण झालेली झोळी वजनाने फाटून सगळ्या मोहरा मातीत पडून मातीमोल होतात. तो समाधानी नसल्याने परिणाम त्याला भोगावा लागतो. 

जीवनात खूप काही माणूस कमावतो पण कुठे थांबायचे हे कळले पाहिजे. नाहीतर समाधान न झाल्याने अजून हवे अजून हवे च्या नादात आहे ते पण गमवावे लागते. पण समाधानी राहणे म्हणजे ‘ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान’ असेही राहून चालत नाही. ते संतांच्या बाबतीत योग्य ठरत असले तरी सामान्य माणसाला लागू पडत नाही. संतांची मूळ वृत्तीच समाधानी असते. त्यांना कसलाच हव्यास नसतो. तुकाराम महाराज म्हणतात तसे सोने, चांदी, पैसा, अडका त्यांना मृत्तिके समान भासत असल्याने त्यांचे थोडक्यातच आहे त्यातच समाधान होत असते, पण सामान्य माणसाला आपले प्रयत्न वाढवून जर काही जास्त साध्य होत असेल तर ते मिळवता आले पाहिजे. ते त्याच्या प्रगतीसाठी गरजेचे असते. एखाद्याने नोकरीत आहे त्याच पोझिशनवर समाधान मानून गरजेपुरते काम करत राहिले तर त्याचे प्रमोशन कधीच होणार नाही. पुढच्या अपेक्षेने प्रयत्नांची दिशा ठरवली तर त्याचा उपयोग होतो. 

आजच्या काळात प्रत्येकाला भौतिक सुख हवे असते आणि त्यासाठी हातात भरपूर पैसा खेळता असावा लागतो. मग ते आहे त्यात समाधानी राहत नाहीत. सतत कसली ना कसली अपेक्षा ठेवून जगत राहतात. त्याच्या मागे धावण्यात जन्म घालवतात आणि मुख्य सुखाला परखे होतात. मनाचे समाधान हे अपेक्षांवर अवलंबून असते. तुमची अपेक्षाच पूर्ण होत नसेल ‘दिल मांगे मोर’ हीच मनाची स्थिती असेल तर खऱ्या समाधानापासून तुम्ही दूर जाता. आयुष्यातला खरा आनंद उपभोगायचा राहूनच जातो. उगाच दमछाक करत उरफोड करत आयुष्य वाया घालवण्यासारखे होते. थोडक्यात समाधान मानायची वृत्ती असेल तर सुखाची ठराविक पातळी तुम्ही गाठू शकता. हल्लीचे जीवन हे अनेक बाबींनी तणावपूर्ण बनले आहे. बारा बारा तास काम करूनही पुरेसा पैसा मिळतोच असे नाही. कुठे तरी कमतरता असतेच. मनावर एक प्रचंड तणाव घेऊन काम करत पैसा कमावणे यात मनाची शांती, समाधान हरवून बसतो. म्हणून अजून काही मिळवायचे आहे की, आहे त्यात समाधान शोधायचे आहे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. 

आपल्या अपेक्षा आणि भावना यांची सांगड घालत मनाला समाधानाची दीक्षा देणे गरजेचे आहे. आपल्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवून समाधानी राहता आले तर जीवनात दुःखाला जागाच राहणार नाही. मनातल्या अपेक्षा आणि भावनांची साखळी गुंफायची म्हणजे समाधान मिळवणे. जेव्हा मनातल्या विचारांची पूर्तता होत नाही तेव्हा माणसाला समाधानी असल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे चिडणे, रागवणे, त्रास करून घेणे या गोष्टी मनाची शांती भंग करतात. अपेक्षांचे ओझे वाहत वाहत जगण्यापेक्षा त्यांना झुगारून देऊन समाधानाची कास धरून जागता आले पाहिजे. त्यासाठी देवाकडे निदान समाधानाचे वरदान दे इतके तरी मागू शकतो.


प्रतिभा कारंजकर, फोंडा.