धुळापी-खोर्ली येथे वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th June, 12:09 am
धुळापी-खोर्ली येथे वाहनाच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू

पणजी : धुळापी - खोर्ली येथे मंगळवार, दि. ४ जून रोजी रात्री राष्ट्रीय महामार्गावर अफताब अमजद खान (३५) या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने ठोकर दिल्यामुळे मृत्यू झाला. याप्रकरणी जुने गोवा पोलिसांनी ‘हिट अॅन्ड रन’ अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलीस हवालदार समीर नाईक यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, ४ जून रोजी रात्री ८.३० वा. धुळापी - खोर्ली येथील राष्ट्रीय महामार्गावर एका हाॅटेलजवळ अफताब अमझद खान रस्ता ओलांडत होता. त्यावेळी एका चारचाकी वाहनाने त्याला धडक देत पलायन केले. सदर चारचाकी बाणस्तरीहून जुने गोव्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. त्यानंतर जखमी खान याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना अफताब अमजद खान याचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच जुने गोवा पोलीस निरीक्षक राघोबा कामत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतीक प्रभू भट, हवालदार समीर नाईक व इतरांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघाताचा पंचनामा हवालदार समीर नाईक यांनी केला. तर, पोलीस उपनिरीक्षक प्रतीक प्रभू भट यांनी अज्ञात चारचाकी चालकाविरोधात हिट अॅन्ड रन प्रकरणी भादंसंच्या कलम २७९, ३०४ ए आणि मोटर वाहन कायद्याचे कलम १३४ (ए)(बी) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याप्रकरणी जुने गोवा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. 

हेही वाचा