पर्यावरण व आरोग्य

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
02nd June 2024, 11:44 pm
पर्यावरण व आरोग्य

उन्हाळी सुट्टी तुम्ही सर्वांनी छान एन्जॉय केली ना? आणि आता सुट्टीची मजा घेऊन मस्तपैकी फ्रेश होऊन शाळेत जायला तयार आहात ना? तुम्हाला शाळा सुरू होण्याआधी एक खास सेलिब्रेशन करण्याची संधी आहे. आणि हे सेलिब्रेशन आहे आपल्या पर्यावरणाचे. पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालच्या परिसरात येणारे सर्व सजीव व निर्जीव घटक. प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव, वनस्पती, माती, सूर्यप्रकाश, पाणी, हवामान इत्यादि सर्व मिळून पर्यावरण तयार होते. आणि हे सगळे घटक मानवी जीवनासाठी खूप महत्त्वाचे आहेत हं… त्यामुळे निसर्गातील या घटकांचा समतोल राखणे, संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठीच दर वर्षी ५ जून रोजी 'जागतिक पर्यावरण दिन' साजरा केला जातो. 

विशेष म्हणजे यात आपण सर्वजण सहभागी होऊन पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लावू शकतो. पर्यावरणाचा संबंध आपल्या आरोग्याशी आहे, आपले आरोग्य उत्तम रहावे यासाठी आपण आपल्या पर्यावरणाची सुद्धा काळजी घेतलीच पाहिजे. यासाठी आपण येत्या ५ जूनपासून छोटेछोटे बदल करुया. 


१. पाणी जपून वापरु, पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवू

स्वच्छ पाणी आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. भारतात बऱ्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. आपल्याला इथे भरपूर पाणी उपलब्ध आहे तरी आपण ते जपून वापरले पाहिजे. 

 ब्रश करताना नळ सुरूच असतो, तो बंद करून पाहिजे तेव्हाच सुरू करावा. 

 पाण्यात खेळायला किंवा बराच वेळ शॉवरच्या पाण्याखाली रहायला मस्त वाटत असले तरी आंघोळ करताना शक्यतो शॉवरचा वापर टाळावा व बादलीत पाणी घेऊन आंघोळ करावी. शॉवर सुरू केला की बरेच पाणी वाया जाते. 

 आपल्याकडे जमा झालेला कचरा किंवा देवाला वाहिलेली फुले बऱ्याचदा समुद्रात, तळ्यात, नदीत टाकली जातात. या गोष्टी आवर्जून टाळूया. पाण्यात कचरा टाकल्याने जलचर प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो तसेच पाणी दूषित होते.


२. प्लास्टिकचा वापर युक्तीने कमी करू 

प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्याने ते आपल्या पृथ्वीवर साठून आपल्यासाठी तसेच अन्य प्राण्यांसाठी घातक ठरत आहे. 

बाहेर जाताना नेहमी आपल्यासोबत रिकामी कापडी पिशवी ठेवावी म्हणजे प्रत्येक वेळी काही विकत घेतले तर प्लास्टिक पिशवी घेतली जाणार नाही. 

एकदाच वापरता येतील अश्या प्लॅस्टिकच्या वस्तू वापरणे टाळूया. उदा. डिस्पोजेबल चमचा, कप, प्लेट, स्ट्रॉ इ. 

बाहेर जाताना नेहमी आपली पाण्याची बाटली बरोबर न्या, म्हणजे मिनरल वॉटरची बाटली घ्यावी लागणार नाही आणि प्लॅस्टिक प्रदूषणात हातभार लागणार नाही.

लवकर खराब होणारे प्लॅस्टिक टॉयज्, वॉटर बॉटल, टिफीन विकत घेणे टाळा. 

३. कागद जपून वापरा 

पूर्वी वह्या वापरून शिल्लक राहिलेली पानं काढून त्यापासून नवीन वही आम्ही बाईंड करून घेत होतो. एकही कोरा कागद वाया जात नसे. कागद/ टिशू पेपर झाडांपासून बनतो व त्यासाठी वृक्षतोड होते. 

एक वही पूर्ण संपायच्या आधीच दुसरी वही वापरायला घेऊ नका. गरज नसताना कागद, वहीची पाने फाडू नका. 

आपली पुस्तके नीट वापरा, आपण पुढच्या इयत्तेत गेलो की आधीची पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना द्या. 

हॉटेलमध्ये काहीही खाल्ले की आपल्याला सारखे टिशू पेपर वापरण्याची सवय असते. शक्य तेवढा टिशू पेपरचा वापर कमी करा. 

४. हवा प्रदूषण टाळूया 

वेगवेगळे कार्यक्रम, सण-उत्सव असले की आपण फटाके वाजवतो. मोठ्या सण-उत्सवाला अगदी कमी प्रमाणात फटाके वाजवायला हरकत नाही. पण खूप धूर होईल, मोठ्ठा आवाज येईल असे फटाके टाळावे. कारण फटाक्यांच्या धुरामुळे हवा प्रदूषित होते व त्याचा परिणाम आपल्या श्वसन संस्थेवर होऊ शकतो, मोठ्ठा आवाज हा पक्षी, प्राणी तसेच तान्हे बाळ, आजी-आजोबा यांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. 

५. वाढदिवसाला रोपं लावा, रोपं भेट द्या. 

वृक्षतोड हल्ली मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी आपल्या वाढदिवसाला एक रोपटं लावायचा संकल्प करा. इतरांनाही रोपटी भेट द्या. जेणेकरून आपल्या आजूबाजूला वातावरण थंड राहील, पक्ष्यांना रहायला जागा मिळेल, माती वाहून जाणार नाही, मोठे वृक्ष आजूबाजूला असतील तर सावली मिळेल. फुले, फळे तर मिळतीलंच, त्याचबरोबर या झाडांचे औषधी फायदेसुद्धा करून घेता येतील. 

येत्या ५ जूनला वरील गोष्टी आचरणात आणू आणि पर्यावरण दिन साजरा करू.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य