खरा आनंद

Story: छान छान गोष्ट |
02nd June, 04:42 am
खरा आनंद

उन्हाळी सुट्टी संपून शाळा सुरू झाली होती. मुलं सुद्धा शाळेत नियमित यायला लागली होती. वर्गात आपल्या आवडत्या मित्राशेजारी बसायची चढाओढ मुलांमध्ये लागलेली. चौथीच्या वर्गातल्या अरुणला सुद्धा आपला आवडता मित्र सोहमच्या शेजारी बसायचे होते, परंतु गेले चार दिवस सोहम शाळेलाच आला नव्हता आणि त्याच्या न येण्याचे कारणही कुणाला माहीत नव्हते.

सोहम हा परप्रांतीय कामगाराचा मुलगा. त्याचे वडील रोजंदारीवर कामाला होते, तर आई शेजारच्या वाडीत घरकाम करायची. सोहम एकुलता एक मुलगा. घरात अभ्यासाचे वातावरण नसतानाही सोहम स्वतःहून अभ्यास करायचा. वर्गात जरी पहिला वगैरे येत नसला तरी अत्यंत नम्र, दिलेला अभ्यास वेळेवर करणारा, सुबक, सुंदर अक्षर आणि महत्त्वाचे म्हणजे अरूणचा जिवाभावाचा मित्र. 

सोहमच्या घरच्या जेमतेम परिस्थितीमुळे आपला गणवेश, वह्या पुस्तके, पाटी सगळेच काळजीपूर्वक वापरायचा. गणवेश एकच असल्याने आणि सतत धुतल्यामुळे ठिकठिकाणी फाटला होता. असे असले तरी नियमित स्वच्छ धुवूनच वापरायचा. 

शाळा सुरू होऊन आठवडा होत आला तरी सोहम शाळेत येत नाही म्हणून वर्गशिक्षकांनी इतर विद्यार्थ्यांकडे चौकशी केली परंतु कुणालाच त्याच्या न येण्याचे कारण माहीत नव्हते. काही मुलांनी तर सांगितले की मागचे आठ दिवस तो कुठे बाहेर खेळतानाही दिसला नव्हता. 

अरूण अस्वस्थ होता. त्याचं घर सोहमच्या खोलीपासून लांब होते. त्यामुळे सुट्टीत त्यांची भेटही झाली नव्हती. आठवडा सरला. सोमवार उजाडला. सोहम आजही आला नव्हता. अरुण शिक्षकांकडे गेला आणि त्याने सोहमच्या घरी जाऊन यायचा विचार मांडला. शिक्षकांनाही ते पटले. अरूणने सोबत यायची इच्छा व्यक्त केली. शिक्षकांनी होकार दिला. त्यांनी लागलीच गाडी काढली.

बाहेर आभाळ दाटून आले होते. शिक्षक आणि अरुण निघाले. तर वाटेतच सोहमची आई त्यांना भेटली. शिक्षकांनी गाडी थांबवून सोहमची चौकशी केली. तसे तिने वस्तुस्थिती सांगितली. 

सोहम शाळेत न यायचे कारण, त्याच्याजवळ शाळेचा गणवेश नव्हता. गेल्या वर्षी जो वापरायचा तो वापरण्या योग्य नव्हता. त्याचा शाळेचा बटवासुद्धा फाटला होता आणि अशा परिस्थितीत शाळेला यायला सोहमला लाज वाटत होती. मुलं आपल्यावर हसतील, आपली टर उडवतील असे वाटून त्याने शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला होता. सोहमच्या निर्णयाने त्याचे आई वडिलही अस्वस्थ होते. पैशांची जमवाजमव होत नसल्याने कपडे शिवायचे राहून गेलेले शिवाय इतर साहित्यही आणायचे होते. आज ना उद्या हातात पैसे येतील आणि सोहमच्या शाळेची व्यवस्था होईल या आशेवर ते होते.

शिक्षकांनी सर्व ऐकून घेतले आणि सोहमच्या कपड्यांची आणि इतर शालेय साहित्याची आजच तजवीज होईल असे सांगून आश्वस्त केले आणि आपल्याला संध्याकाळी भेटा असे सांगून शाळेत आले. वाटेत अरूणने शिक्षकांना विचारले, “गुरुजी तुम्ही सोहमसाठी कपडे, बटवा आणि इतर साहित्य कसे आणणार?”

त्यावर गुरुजींनी सांगितले की ते स्वतःच्या पैशातून ते आणणार आहे. त्यावर अरुण म्हणाला, “गुरुजी माझ्याजवळ साठवलेले थोडे पैसे आहेत. तसा सोहम माझा खूप जवळचा मित्र आहे. माझ्याकडून थोडी मदत घ्या ना! नाही म्हणू नका.” 

गुरुजींना ते पटत नव्हते. परंतु अरूणचा हट्ट आणि त्याचे मन राखण्यासाठी गुरुजींनी मान्य केले. शिवाय त्यातून अरुणच्या मनात जी संवेदना जागी झाली होती ती महत्त्वाची होती. 

ठरल्याप्रमाणे गुरुजींनी स्वतः बाजारात जाऊन सोहमसाठी शाळेचा तयार गणवेश आणि इतर साहित्य आणले आणि संध्याकाळी सोहमच्या आईला गाठून ते सर्व तिच्या हवाली केले. मात्र हे सर्व आपण आणि अरूणने आपल्या खर्चातून आणले हे सोहमला कळू देऊ नका असे तिला सांगितले. गुरुजींनी दिलेले साहित्य घेताना तिलाही संकोचल्यासारखे होत होते. परंतु गुरुजींनी तिची समजूत घातली आणि उद्यापासून सोहमला शाळेला पाठवायला सांगून निघून गेले.

दुसर्‍या दिवशी वेळेत सोहम शाळेत आला. अरूणने आपल्या शेजारची जागा त्याच्यासाठी राखून ठेवली होती. सोहम वर्गात आलेला पाहून अरूणला खूप आनंद झाला. वर्गात गुरुजी आले. हजेरी घेतली. सोहमचे नाव वाचले. सोहमने हजर गुरुजी म्हणून हजेरी दिली.

 एकामागून एक तास संपले. शाळा सुटली. परंतु गुरूजी किंवा अरूणने आपण केलेल्या कार्याची वाच्यताही केली नाही, की चेहर्‍यावर तसा आवही आणला नाही. त्यावर्षी चौथीची मुले प्रज्ञाशोध परीक्षेला बसली. सोहमही बसलेला आणि उत्तम गुण घेऊन त्याने शिष्यवृत्तीसुद्धा पटकावली. त्याचा सगळ्यात जास्त आनंद गुरुजींना आणि अरूणला झाला.


चंद्रशेखर शंकर गावस, केरी - सत्तरी.