कुई कुई

Story: छान छान गोष्ट |
26th May, 04:36 am
कुई कुई

हिरवे शेत, हिरवे डाेंगर, निळं पाणी, निळं आकाश आणि आम्ही हाे, आम्ही सगळे काेल्हे. काेण्या एके काळी रानात आनंदात जगायचाे. धावड्यातील शेताला लागून असलेल्या जंगलात आमचं कुटुंब रहायचं. काेल्ह्यांची कुईकुई ऐकण्याची गावातील लाेकांना खूप सवय झाली हाेती. रात्री जंगलात आम्ही आवाज करु लागलाे की लहान मुलांच्या आया त्यांना घाबरवायच्या, “काेल्ह्याची कुई कुई ऐकू येतेय झाेपा आता.” जंगल आमचं घर हाेतं. आनंद देणारं आणि विसावा देणारं. उंदीर, घुशी, मासे, खेकडे, मेेलेली जनावरं, लहान पक्षी आणि काय नाही खाल्लं मी! रानकाेंबडा खायला मला खूप आवडायचा. 

लाडुल्या, ऐकताेस का रे माझ्या नातवा? त्या सुंदर गाेजिरवाण्या दिवसांची आठवण काढली की डाेळे पाणावतात. अरे माझ्या लाडुल्या, असा बेसावध हिंडून इकडे-तिकडे नाचू नकाेस. पूर्वीच्या गाेष्टी तुला सांगून शहाणं करुन साेडायचं आहे. आम्ही खूप चुकलाे. तू चुकू नकाेस. ह्या माणसांवर विश्वास ठेवू नकाेस. हुशारीने वाग.

काही वर्षांपूर्वीची घटना. शेतात छान पिवळ्या रंगाची कणसं आली हाेती. डुलणारी कणसं माेत्यांसारखी दिसायची. वारा आल्यावर साेनेरी घाेस डुलायचे. रात्रीच्या मिट्ट काळाेखात हे सौंदर्य आणखीन खुलायचे. आम्ही शेतात वाट काढत रात्रीचे शिकार शाेधत हिंडत असायचाे. आमची पाेटाची भूक वाढलेली हाेती. इतर कुटुंबातील सदस्यांचीही आमच्यावर जबाबदारी हाेती. भाेमातील भुईमुगाच्या शेंगांवर आमचा सतत डाेळा असायचा. या शेंगांवर आम्ही अधून-मधून तुटून पडायचो. माणसांना त्यामुळे आमचा खूप राग यायचा. 

एकदा ताे काळा दिवस उगवला. बांगड्यांच्या पाेटात विष घालून ते मासे संपूर्ण शेतात पसरवले गेले. जिथेतिथे विखुरलेले मासे आम्ही चवीने खाल्ले आणि आमची अख्खी पिढीच नष्ट झाली. गावागावात अशाच गाेष्टी घडत गेल्या. आमचे इतर सवंगडी दिसेनासे झाले. आम्ही गायब झालाे. मला तेव्हा उलट्या सुरु झाल्या. माेठ्या कष्टानं वाचलाे. माझं मरण मी माझ्याच डाेळ्यांनी पाहिलंय. पण मी जगलाे कारण मला तुझ्या वडलांना वाचवायचं हाेतं. त्याचे डाेळे सुद्धा उघडले नव्हते. तेव्हा रानात आमचंच कुटुंब राहिलं. त्यामुळे वेळीच शहाणा हाे बाळा. माणसापासून सावध रहा. 

एकदा मी तुला खेकडे कसे पडकतात हे शिकवीन बरं! गावात घनदाट लोकवस्ती आहे. तिथं ना रे लाडुल्या, आम्ही वायगणाच्या तळ्याजवळच्या शेतातील खेकडे पकडायला जायचो. आम्ही पाण्यात मोठ्या ऐटीत उतरायचो. खूप रुचकर लागतात बरं का खेकडे! त्यांची चव तुला सांगुनही कळणार नाही. हे सगळे अनुभव तुला तितकेसे नाही मिळाले. ज्या माणसांना आमची ‘कुई... कुई...’ भीतिदायक वाटायची, आज हीच माणसं आमची ‘कुई... कुई...’ ऐकण्यासाठी आतुरलेली असतात. हल्ली हल्ली काही माणसांना आमच्या अस्तित्वाचं महत्त्व पटू लागलंय. काही माणसं आमच्या रक्षणासाठी धडपडू लागलीत. झालेल्या चुका सुधारू लागलीत. पण तरीही आपण सावध राहिलेलं बरं माणूस नावाच्या प्राण्याचा काही भरवसा नाही.

दोन मोठ्या खडकांच्यामध्ये बिळात राहण्यात हुशारी असते बरं! भुईमुगाच्या शेतात बायका आमच्याबद्दलच बोलत असायच्या. आमच दिसणं हे माणसांसाठी चांगलं मानलं जायचं. चांदग्याची आई शेतात काम करताना म्हणायची, “काल बाये कोले आड्डत आसले, सदग्याची आवस बरी आसा ना? पालवांक ना मगो?” ह्या माणसांच बोलणं मजेशीर असायचं. यावर एखादं लहान मुल भुईमुग खाताखाता म्हणायचे, “तव्याचेर भाजलालां चुन खाल्ल्यावर तुज्या लग्नाक कोले आराडतले. अशी आवस म्हणत आसता आाणि माका भाजलाला चुन खावक दियना.” आमचं रात्रीचं ओरडणं हे लोकांसाठी भीतिदायक होतं. जंगलातून आम्ही गावाकडे खालच्या दिशेनं ओरडत गेलो तर ते वाईट मानलं जायचं. यावर दुसरी बाई म्हणायची, “ना गे कोले सकयल्यान वैर आड्डत गेले (खालून वर) गावातलो किल्लेस रानात हेलो.” आमची ‘कुई... कुई.. .’ ह्या माणसांच्या जीवनात वेगळीच जागा करून होती.


शितल नंदकुमार परब