महान कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर

इतिहासामध्ये अहिल्याबाई होळकर या एक खूप सोशीक आणि जनसामान्यांमध्ये आदर असलेल्या राणी होऊन गेल्या. खूप लोकप्रिय आणि आधारस्तंभ ठरलेल्या या राणीचा कार्यकाळ उल्लेखनीय आहे. ३१ मे रोजी त्यांच्या लोकाभिमुख राजवटीस ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त हा संक्षिप्त परिचय.

Story: विशेष |
26th May, 05:32 am
महान कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर

आपल्याला जन्म मिळतो आणि लगेचच जात-धर्म चिकटला जातो. आपल्या आईवडिलांची जात, त्यांचा धर्म आपल्याला कायमचा चिकटतो. हे जरी सत्य असले तरी पराक्रम, कर्तबगारी दाखविणे हे आपल्यावर अवलंबून असते, म्हणूनच शिवाजी महाराजांचे गोडवे गाताना त्यांच्या जातीकडे आपण दुर्लक्ष करतो. डॉ बाबासाहेब आंबेडकर कुठच्या जाती-धर्माचे हे त्यांच्या प्रज्ञेला सलाम ठोकून आपण दुर्लक्ष करतो व त्यांनी आपल्या देशाची घटना जन्माला आणली त्याचे कौतुक करतो. अगदी ह्याच न्यायाने इंदौरच्या अहिल्याबाई होळकर यांच्याकडे आपण पाहतो. त्या धनगर कुटुंबात (गडरिया) जन्माला आल्या याकडे आपण दुर्लक्षच करतो. ३१ मे १७२५ ते १३ ऑगस्ट १७९५ ही त्यांची कारकीर्द. आई सुशीला तर वडील माणकोजी शिंदे, यजमान खंडेराव होळकर आणि सासरे मल्हारराव होळकर ह्यांच्या नंतर राणीपद सांभाळणारी कर्तृत्ववान महिला, अतिशय दानशूर, धर्म पारायण व कार्यक्षम राज्यकर्ती व कमी शिकलेल्या आपल्या देशातील माळव्यातील तत्वज्ञानी महाराणी म्हणून त्या परिचित आहेत. अनेक महिलांना जर संधी व शिक्षण पदरात पाडता आले असते तर अहिल्यादेवीप्रमाणे त्यांचेही ह्या नावांत स्थान असणार असते. बॉम्बेचे मुंबई महाराष्ट्रात जोशी सरकार होते तेव्हा झाले होते, धाराशिवचे संभाजीनगर ही अलीकडे बदललेली नावे. त्यात आता आणखी एकाची भर पडली आहे. राज्यकर्ते नाव बदलू शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अहमदनगर हे नाव पूर्वीपासून आलेले. त्याचे नाव बदलून अहिल्यानगर शिंदे सरकारने केले आहे. ह्या निमित्ताने त्या महान सम्राज्ञीचे नाव आणि इतिहास नव्या पिढीला कळेल. असे धाडस गोव्यातही दाखविले पाहिजे. अनेक गावांची नावे ही पोर्तुगीज आहेत, कारण त्याकाळी त्यांचे राज्य होते.

महाराष्ट्रातील अहमदनगर (नवे नाव अहिल्यानगर) जिल्ह्यातील चौंडी (महलरपीठ ) येथे ३१ मे  ला त्यांचा जन्म  झाला. वडील माणकोजी शिंदे गावचे पाटील होते. त्याकाळी स्त्री शिक्षण प्रचलित नव्हते, तरीपण अहिल्याबाईंना लिहिण्यावाचण्यास त्यांनी शिकविले होते. एका आख्यायिकेनुसार त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी मल्हाररावांनी ह्या चुणचुणीत मुलीला एका देवळात पाहिले व त्यांच्याशी आपला पुत्र खंडेराव यांचा विवाह करून  सून म्हणून त्यांना आणण्याचा त्यांनी घाट बांधला. पुढे १७५४ मध्ये कुंहेरच्या लढाईत खंडेराव धारातीर्थी पडले, त्यांच्या मृत्युनंतर अहिल्याबाईना सती जाऊ न देता मल्हाररावांनी त्यांना माळवा प्रांताचा कारभार पाहायला सांगितले. विशेष म्हणजे त्यांच्या झालेल्या कारकिर्दीत त्यांनी स्वतः सैन्याचे नेतृत्व केले होते. पुढे सासरे मल्हाररावही मृत्यू पावले. तुकोजीराव होळकर ह्यांना त्यांनी सेनापती म्हणून नेमले. खंडेरावांची आई गौतमीबाई होत्या. मुलगा व अहिल्येचे पती खंडेराव हे शूरवीर पराक्रमी होते हे खरे, पण तामसी, व्यसनाधीन व छंदीफंदी स्वभावाचे होते. थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळापासून माळव्याची जबाबदारी होळकर घराण्याकडे होती. मल्हारराव हे त्यांचे विश्वासू सरदार होते. कर्तबगार सासरे व धार्मिक वृत्तीच्या  पण करारी गौतमी ह्यांच्या निरीक्षणाखाली अहिल्याबाई घडत गेल्या. भालेराव व मुक्ता अशी त्यांना दोन नातवंडेही झाली. खंडेरावांना दहा पत्नी होत्या. त्यातील एक म्हणजे अहिल्याबाई. त्यांचे पती गेले, तेव्हा त्यांना २८ वे वर्ष लागले होते. खरे तर पतीचे निधन म्हणजे पत्नीने सती जायचे ही रूढ परंपरा तेव्हा होती. त्याऐवजी त्या संत होऊ इच्छित होत्या, हे वृत्त सासऱ्यांना समजले, त्यांनी त्यांना रोखले व हुशार अहिल्येला राज्य चालवायला सांगितले व अहिल्येनेही सासऱ्याचा मान ठेवून जनहितार्थ राज्य कारभार चालविला.

१७६६ रोजी सासरे मल्हारराव एका मोहिमेत गुंतलेले असताना जग सोडून गेले  पेशव्यांनी तातडीने पुत्र भालेराव ह्यांना सुभेदाराची वस्त्रे दिली, पण दुर्दैवाने त्यांचा लगेच मृत्यू झाला. खरे तर राज्यातील हितशत्रूंनी त्यांचा खून केला होता. हा मानसिक धक्का अहिल्यादेवी यांनी पचविला  त्यातूनच इतिहास घडविला. इंदौरहून राजधानीचे केंद्र नर्मदा तीरावरील महेश्वरला नेले. अनेक वास्तू बांधल्या. प्रशस्त देवघरही बांधले, जे आजही बघायला मिळते. नदीला घाट बांधले.

अनेक मंदिरांचा जीर्णोद्वार केला. त्यांना मंदिर प्रवर्तक मानले जाते कारण श्रीनगर, हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, प्रयाग, वाराणसी, पुरी, सोमनाथ, नाशिक, औंकारेश्वर, महाबळेश्वर, पुणे, उडीपी, गोकर्ण, काठमांडू अशा विविध ठिकाणी देशभरात त्यांनी मंदिरे बांधली किंवा त्याचे पुनर्बांधकाम केले. ही सारी धर्मस्थळे मुघल राज्यकर्त्यांनी नष्ट केली होती. ते काम त्यांनी प्राधान्याने हाती घेतले, त्याचबरोबर पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. अन्नछत्र उघडले. जागोजागी विहिरी खोदल्या. चिरेबंदी बांधून ठेवल्या. ठिकठिकाणी पाणपोई व धर्मशाळा बांधल्या. राज्यात हकीम, वैद्य नेमले. स्त्रियांना कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओवऱ्या ठेवल्या. थंडीत गरजूंना त्या घोंगडी वाटत. अशा अनेक राज्यहिताच्या गोष्टी त्यांनी केल्या. अहिल्याबाई जरी कमी शिकलेल्या होत्या तरी त्या चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. आहिल्यादेवी यांच्या वडिलांचे कौतुक केलेच पाहिजे. सर्वसामान्य परिस्थिती असूनही ते विद्वान व दूरदृष्टी असलेले गृहस्थ होते. शिक्षणाची साधने नव्हती, स्त्री शिक्षणाला कोणी मदत करत नव्हते, अशा वेळी आपल्या कन्येला अहिल्येला घरीच शिकविले. त्यातून तिचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. पतीचे निधन झाल्यानंतर खरेतर त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्यांना सती जायला हवे होते, पण त्यांनी ते नाकारले व पुरोगामित्व  दाखविले. ह्याला असामान्य मनोधैर्य लागते. त्यांनी जीवनात धर्म, रूढी, परंपरा या पलीकडे कर्तव्य महत्त्वाचे मानून प्रजेच्या हिताचे काम केले. कल्याणकारी योजना राबविल्या. आपले राज्य धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय ह्या तत्वांवर चालविले. आंधळेपणाने त्यांनी धर्मातील रूढी स्वीकारल्या नाहीत. स्वतःचा खर्च मर्यादित करून लोककल्याणासाठी निधी वापरला. आज इंदौर शहर स्वछतेसाठी वाखाणले जाते. या शहरात अहिल्याबाईंचे निधन झाले. मृत्युंनतर तुकोजीराव होळकरांनी राज्यकारभार सांभाळला. राणी अहिल्याबाईंवर चांगली पुस्तके मराठी तसेच इंग्रजीतही उपलब्ध आहेत उदाहरणार्थ कर्मयोगिनी, अहिल्यादेवींचे लोककल्याणकारी कार्य,  स्त्री अहिल्या आदी. ती जरूर वाचावी. प्रेरणा नक्की मिळेल.  भाद्रपद कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला अहिल्योत्सव साजरा केला जातो. अशा ह्या महान स्त्रीला दंडवत. 


प्रा. रामदास केळकर