गिरिधामच्या 'मायामहाल' वाड्यात एक रहस्यमय आरसा होता. इतिहास संशोधक आन्या नाईक तिथे पोहोचली आणि तिचा भूतकाळातील राजकन्या लावण्याशी संबंध उघड झाला. एका अपूर्ण प्रेमाची ही थरारक गोष्ट!

पश्चिम घाटाच्या दरीत वसलेले, धुक्याने झाकलेले एक शांत गाव ‘गिरिधाम’. त्या गावाच्या शेवटच्या टोकावर एक जुना, जीर्ण वाडा उभा होता, ‘मायामहाल’.
वाड्याच्या भोवती नेहमी गारवारा वाहत असे आणि रात्रीच्या वेळी तिथं काहीतरी कुजबुज ऐकू येत असल्याचं गावकरी सांगत. लोक म्हणायचे, “त्या वाड्यात आरशात कोणीतरी जिवंत राहतं... आणि त्याचा चेहरा अपुराच दिसतो.”
काही वर्षांनी तिथं एक शिक्षिका आणि इतिहास संशोधक आन्या नाईक आली. तिचं संशोधन प्राचीन वास्तू आणि त्यामागची लोककथा यावर होतं. गिरिधामच्या ‘मायामहाल’ वाड्याबद्दल ऐकून ती लगेचच तिथं जाण्याचं ठरवते.
वाड्यात प्रवेश करताच तिच्या शरीरावर काटा आला. मोठा दरवाजा किर्रर्र आवाज करत उघडला आणि आत धुळीच्या थरांखाली भूतकाळ झोपला होता. भिंतींवर काळसर पडलेले फ्रेम्स, तुटलेली झुंबरे, आणि कोपऱ्यात एक मोठा आरसा. जो अर्धा तुटलेला, पण इतका स्वच्छ की जणू काळही त्यात अडकला होता. आरशाच्या भोवती एक वेगळंच ओलसर थंड वातावरण होतं. आन्याने हलक्याने आरशात पाहिलं. तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं, पण डोळ्यांत कुणीतरी दुसरी स्त्री दिसत होती.
ती अनोळखी स्त्री तिच्याकडे एक मंद (शांत) हास्याने पाहत होती, आणि त्या क्षणी आरशातून एक गूढ आवाज उमटला....“लावण्या...” आन्या घाबरली, पण तिची जिज्ञासा तिला थांबू देईल कशी? तिला वाटलं कदाचित हा तिचा भास आहे. त्या रात्री ती वाड्यातील जुन्या फाईलमधील कागदपत्रांमध्ये शोध घेऊ लागली. धुळीने झाकलेली एक लाल रंगाची वही तिला सापडली. त्यात लिहिलं होतं, ‘मी लावण्या. या वाड्याची राजकन्या. कित्येक वर्षांपूर्वी माझं प्रेम या भिंतींनी कैद केलं आणि माझा आत्मा या आरशात अडकला.’
त्या शब्दांबरोबरच वहीत एक सुकलेलं गुलाबाचं फूल होतं. जे तिला तिच्या प्रियकराने पहिल्या भेटीच्या वेळी दिलेलं. आन्याला थरकाप झाला. “लावण्या...” हेच नाव आरशातून ऐकू आलं होतं! ती पुन्हा आरशासमोर उभी राहिली. थंड हवा वाहू लागली, आणि आरशात तिचं प्रतिबिंब धूसर होऊ लागलं.
हळूहळू आरशात लावण्याचा चेहरा दिसू लागला. सुंदर, निष्पाप पण उदास. ती हळू आवाजात म्हणाली, “माझं प्रेम अपूर्णच राहिलं... माझं जीवन इथेच संपलं. पण मी अजूनही जिवंत आहे या काचेच्या आत.” आन्याचे डोळे पाणावले. तिला जाणवलं की तीच लावण्याचा पुनर्जन्म आहे. तिच्या आत्म्यात तीच वेदना, तीच अपूर्णता होती. लावण्याचा आवाज पुन्हा ऐकू आला, “तू मला मुक्त करू शकतेस, पण त्यासाठी तुला स्वतःला हरवावं लागेल.” क्षणभर हवेलीतील सगळं थरथरलं. वारा जोरात वाहू लागला, आरशातून प्रकाश झळकला, आणि दोघींचे प्रतिबिंब एकमेकांत मिसळले. क्षणभर सर्व काही थांबलं आणि मग वाड्यात शांतता पसरली.
पुढच्या सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं... ‘मायामहाल’ वाड्याच्या खिडकीतून आरसा तुटलेला होता, पण आतून मंद प्रकाश येत होता. आरशाच्या तळाशी काही शब्द कोरलेले होते... “प्रतिबिंबं हरवतात, पण आत्मा कधीच मरत नाही.” त्या दिवसानंतर वाड्यात कधीच विचित्र आवाज ऐकू आले नाहीत. फक्त काही वेळा सकाळच्या धुक्यात आरशाच्या तुकड्यात एक हसरा चेहरा चमकत असे. तो लावण्याचा होता की आन्याचा, हे कोणालाच ठाऊक नव्हतं.

-पल्लवी उल्हास घाडी