मेटी, घाटी, मराठी आणि गोंयकारपण

घाटी शब्द शिवीसारखाच वापरला जातो. कोणाला तसे वाटत असेल, तर त्यांनी आधी स्वतःला घाटी म्हणवून घ्यावे. परप्रांतीयांना हिणवण्यासाठी घाटी म्हटले जाते. बिगरगोमंतकीयांचा सर्वच क्षेत्रांत वाढलेला वावर हे त्यामागचे खरे कारण आहे. पण म्हणून कोणी बिगरगोमंतकीय आपले उपद्रवमूल्य दाखवू पहात असेल, तर ते गैर आहे. मराठीला होणारा विरोध हाही त्याच भावनेतून होत असल्याचे दिसून येते. पण या साठमारीत गोंयकारपण कसे टिकणार, याचा विचार करायला हवा!

Story: वर्तमान |
4 hours ago
मेटी, घाटी, मराठी आणि गोंयकारपण

घाटावरून आला तो घाटी’ असा लाडका युक्तिवाद हल्ली गोव्यात अनेक जण पुन्हा पुन्हा करू लागले आहेत. त्याच्या जोडीला ‘घाटी म्हणजे शिवी नव्हे, उलट ती एक पदवी’ अशी मखलाशीही केली जाते. याला कारण म्हणजे कन्नड नेते सिद्दण्णा मेटी यांनी कन्नडिगांना घाटी म्हणण्यास घेतलेला आक्षेप. हा आक्षेप घेण्याचे कारण आणि त्यावरचे पडसाद नंतर पाहू, त्याआधी घाटी शब्दाचा वापर का आणि कसा होतो ते पाहू.

‘हो घाटी मरें’, ‘ए घाटयां’, ‘घाटयांचो बाजार’,‘घाटयांच्या बापायचो फात’ अशा अनेक प्रकारे हा शब्द कानावर पडतो. कोणाही परप्रांतीयाला म्हणजेच बिगरगोमंतकीयाला हीन लेखण्यासाठीच घाटी या शब्दाचा सर्रास वापर केला जातो. ती पदवी असती तर ‘ओ घाटी महाशय’ ‘आदरणीय घाटी महोदयांनी मर्यादेत राहावे’ असे आदरयुक्त उल्लेख झाले असते. पण तसे होत नाही, यातच हा शब्द वापरणारे आणि त्या शब्दाची पाठराखण करणारे उघडे पडतात. आणखी एक गोष्ट म्हणजे, घाटावरून आले ते घाटी, असाच अर्थ काढायचा तर गोव्यात किमान दोन घाट आहेत. गोव्यातीलच अनेक गावे या घाटमाथ्याच्या क्षेत्रात येतात. मग हे लोकही घाटी ठरतात का? अजिबात नाही. कारण घाटी ही संज्ञाच शिवीसारखी बनविली गेली आहे. बिगरगोमंतकीयांविषयीची मनातली खदखद बाहेर काढण्यासाठी हा शब्द माध्यम बनला आहे. थोडक्यात ती शिवी बनली आहे. याला कारण म्हणजे गोव्यातील परप्रांतीयांची अवाढव्य वाढलेली संख्या आणि गोव्याच्या सांस्कृतिक वातावरणासह राजकीय पटलातही परप्रांतीयांचा वाढलेला हस्तक्षेप. एका अर्थाने ‘गोंयकारपणावर’ होत असलेले हे आक्रमणच. हल्लीच झालेल्या छठ पूजेच्या निमित्ताने हा बाहेरच्या लाेकांचा लोंढा कसा विस्तारत चालला आहे, याचे ओंगळवाणे ‘प्रदर्शन’ झाले. एकप्रकारे गोंयकारपणाच्या परिघाला अशा गोष्टींमुळे बाधा पाेहोचत आहे. त्यात सरकार फारसे काही करू शकत नाही. कारण राज्यघटनेने दिलेल्या हक्कानुसार देशभरात कोणीही कुठेही जाऊन राहू शकतो. मात्र तो ‘कसाही’ वागत असेल, तर स्थिती बिघडू शकते. आणि हे आव्हान थोपविण्याचे काम इथल्या प्रत्येक भूमिपुत्राला पेलावे लागेल. त्यासाठी परप्रांतीय नेमके का येतात, त्यांना कोण थारा देतो, त्यांची अर्थव्यवस्था कशावर आधारित आहे, त्यांच्या वास्तव्यामुळे, वावरामुळे गावांतील, शहरांतील एकजिनसीपणाला बाधा कशी पाेहोचत आहे, याचा अभ्यास करायला हवा. सगळा दोष परप्रांतीयांना देऊन चालणार ना​ही. कारण या स्थितीला आम्हीच कारणीभूत आहोत. आपले व्यवसाय बाहेरच्यांना चालवायला देणारे, गावोगावी घराघरात लहानलहान खोल्या, शहरी भागात फ्लॅट बिगरगोमंतकीयांना भाड्याने देणारे असे सगळेच यात सामील आहेत. स्थिती इतकी पुढे गेली आहे की, परतीचे दोर कधीच कापले गेले आहेत.

स्वतंत्र अस्तित्वाची दर्पोक्ती

हल्लीच सिद्दण्णा मेटींनी आम्हाला घाटी म्हणू नका, असे म्हणून जाणीवपूर्वक ठिणगी टाकली. एका दृष्टीने त्यांचे विधान योग्यच. कारण काेणी घाटी म्हणावे इतका अपराध परप्रांतीयांनी निश्चितच केलेला नाही. इथली श्रमाची कामे आणि घाम गाळण्याच्या व्यवसायातील मनुष्यबळाची कसर त्यांनी भरून काढली. त्यांना स्वाभिमानाने जगण्याचा हक्क आहे. परंतु, ‘आम्ही राजकारणात उतरणार, आमची वोटबँक आहे, आमचे लोकप्रतिनिधी​​ निवडून आणू,’ अशा गर्जना करणे मेटीसारख्या प्रवृत्तींनी तत्काळ थांबवायला हवे. अशा मूठभर ‘मेटीं’मुळे खंडीभर परप्रांतीयांना घाटी म्हणून हिणवले जाते, याचा विचार त्यांनी करायला हवा. कुठल्याही भूमिपुत्रास अशा भाषेमुळे वेदना होतील आणि त्याचे पडसादही प्रखरपणे उमटतील. (केवळ रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाने याबाबत आवाज उठवला, इतर पक्षांचे नेते का गप्प आहेत, याचीही चिकित्सा लोकांनी करायला हवी.) मेटींचा हा अतिशहाणपणा कदाचित त्यांना त्रासदायक ठरणार नाही, परंतु अन्य परप्रांतीयांना त्या पडसादाच्या डागण्या डसू शकतात. आपण सर्वांनीच एक ध्यानात घ्यायला हवे की, आजच्या स्थितीत ‘घाटयां’शिवाय गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा विचारही करणे शक्य नाही. कारण जवळपास प्रत्येक क्षेत्रात परप्रांतीयांनी लक्षणीय शिरकाव केला आहे. एका बाजूला आपल्या लोकांनी पैसा मिळविण्याच्या उद्देशाने विदेशात जाण्याचा सपाटा लावलेला आहे. त्यामुळे या मनुष्यबळाची कसर भरून काढण्यासाठी अन्य रा​ज्यांतीलच माणसे गोव्यात येतील, हा सोपा व्यावहारिक मुद्दा सर्वांनी ध्यानात घ्यायला हवा. त्यासाठी सरसकट सर्वांनाच घाटी​ संबोधून वेठीस धरणे चुकीचे आहे. त्याचबरोबर परप्रांतीय लोकांनीही​ इथल्या मातीशी​ इमान राखण्यातच आपले भले आहे, हे ध्यानात घ्यायला हवे. इथल्या सांस्कृतिक बंधांना आपल्या उपस्थितीने आणखी मजबूत करायला हवे. अलिप्तपणा राखाल, तर तुम्ही ‘घाटी’च राहाल!

अकारण हिणवणे गैर

आपण घाटी म्हणतो काेणाला, तर सर्वसामान्य परप्रांतीयाला. धनदांडगे, तथाकथित उच्चभ्रू, प्रसिद्ध हस्ती अशा गोव्याबाहेरील लोकांना आपण कुर्निसात करायचे बाकी असतो. इतका या लोकांचा रुबाब आणि धाक असतो. फाडफाड इंग्लिश बोलणाऱ्या एखाद्या ‘घाटया’शी कधी बाका प्रसंग आलाच तर आपण फारशी घासाघीस करत नाही, किंबहुना अशा परिस्थितीत आपल्याला आपले स्टेटस, मॅनर्स वगैरे आठवतात. आपण चक्क माघार घेतो. पण त्याच्या जागी जर एखादा श्रमिक, गरीब घाटी असला, तर आपल्याला स्फुरण चढते, बाहु फुरफुरतात आणि त्याला ‘घाटयांजली’ वाहून होईपर्यंत आपले समाधान होत नाही. कारण आपल्याला माहीत आहे, हा दुसऱ्या श्रेणीतील दुर्बळ घाटी कसल्याच कायदेशीर बाबींतून किंवा शारीरिक बळाच्या माध्यमातून आपल्याला आव्हान देणार नाही. त्याने तसा प्रयत्न केला, तरी आपण त्याला पुरून उरू शकतो, याची पुरेपूर जाणीव आपल्याला असते. मात्र ध​नाढ्य परप्रांतीयांसमोर आमचे ‘म्यांव म्यांव’ होते. हा दोन स्तरांतील घाटयांशी वागण्याचा आपला दृष्टीकोन आहे.

मराठीचा दुस्वास कशासाठी?

आता वस्तुस्थितीकडे थोडे आणखी ​चिकित्सकपणे पाहू. केवळ घाटावरून आलेले लोकच घाटी या शिवीला ‘पात्र’ ठरतात असे नव्हे, तर अलीकडच्या काळात गोव्याच्या सीमेपल्याडचा प्रत्येक माणूस घाटी समजला जातो. इतकेच नव्हे, तर मराठी बोलणारेही काही कूपमंडुकांच्या लेखी म्हणे घाटी आहेत. राज्य सरकारने मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी​ एकीकडे पुन्हा जोर धरत असतानाच सरकारी नोकऱ्यांत कोकणी सक्ती करून या मोहिमेला सरकारने मोठा हादरा दिला. त्यामुळे मराठीजन खवळले आहेत, तर कोकणीचे पाठीराखे खूश झाले आहेत. मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे, असा युक्तिवाद करून अनेक जण कोकणीच्या अस्तित्वासाठी मराठीचा बळी देण्याची​ भाषा करतात. त्यांना गोव्यातील मराठीचा इतिहास आणि सांस्कृतिक क्षेत्रात खोलवर पसरलेली मराठीची पाळेमुळे ठावूक नाहीत अशातला भाग मुळीच नाही. महाराष्ट्रातून गोव्यात येऊन मराठीच्या आधारे सरकारी नोकऱ्या मिळविल्या जातील, हा तर शुद्ध फसवा युक्तिवाद आहे. जे चालले आहे, ते मराठीसाठी घातक आहेच, पण गोव्याला सांस्कृतिकदृष्ट्याही पार रसातळाला नेणारे आहे, हे समजण्यास काही दशके जावी लागतील. पोर्तुगीजांनाही पुरून उरलेल्या मराठीचे इथून पूर्णपणे उच्चाटन होणार नाही. पण कोकणीलाही​ त्या तुलनेत अच्छे दिन येतील असेही छातीठोकपणे सांगता येणार नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात उत्तर भारतीय प्रभावातून त्रिभाषा सूत्राच्या आधारे हिंदी लादण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तूर्त विरोधामुळे हा प्रयत्न बारगळला आहे. पण आज ना उद्या राज्यकर्ते त्यांना हवे ते घडवून आणतीलच. त्याच धर्तीवर गोव्यातही त्रिभाषासूत्र लागू करून नजिकच्या काही वर्षांत हिंदी लादली जाणार नाही, याची हमी कोणीच देऊ शकणार नाही. आधीच गोंयकारपणाला इंग्रजाळलेपणाचा विटाळ झालाच आहे. त्यात हिंदीभाषकांची वाढती संख्या पाहता, ‘माय जगो, पण मावशी मरो’च्या नादात इंग्रजीसोबतच हिंदीही घरात कशी घुसली आणि उरावर बसली हे कळणारही नाही. नीज (अस्सल) गोमंतकीयांची शेकडो कुटुंबे घरात मराठीतून संवाद साधतात, मुलांना मराठीतून प्राथमिक शिक्षण देतात, मराठीतील उत्तमोत्तम ग्रंथ, साहित्य वाचनाची गोडी लावतात, मराठीच्या पान्ह्यावर इथला हिंदू समाज धष्टपुष्ट झाला आहे. पण आता मराठीला डावलले जात असल्यामुळे मराठी शाळांचे माध्यम कोकणी करण्यासाठी काही शाळांवर पालक दबाव टाकू लागले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे गोमंतकीयांच्या पिढ्यानपिढ्या ज्या भाषेने पोसल्या, त्या मराठी​मायचे हे धारोष्ण दूध नाकारण्याचा करंटेपणा कोणी करू नये. मायभाषेच्या प्रेमापोटी आज मराठीला लाथाडले, तर भविष्यात कधी ना कधी संस्कृती संकटात सापडेलच. आणि संस्कृती लोपली, तर गोंयकारपणाचे माेल काय राहिल, याचा विचार कोणी करणार आहे  की नाही?


- सचिन खुटवळकर 

(लेखक दै. गोवन वार्ताचे वृत्तसंपादक आहेत.)