कार्तिक महिन्यात गोव्यात साजरा होणाऱ्या 'कातयो' या लोकनृत्याची ही ओळख. आकाशातील कृतिकापुंज नक्षत्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा उत्सव निसर्ग, संस्कृती आणि लोकमानसातील अनुबंधांचे प्रतीक आहे.

निरभ्र नितळ आकाश. नक्षत्रांची रांगोळी. झोंबणारी गुलाबी गार हवा. लुकुलुकू ताऱ्यांचे आकाशभर पसरलेले जाळे आणि त्यातच लक्ष वेधून घेणारे तारकामंडळ.
काही वर्षांपूर्वी हे असेच स्वच्छ वातावरण गावागावात कार्तिक महिन्यात दिसून यायचे. वर आकाशात नक्षत्रे स्वतेजाने चमकत, तर खाली भूतलावर लक्ष लक्ष दिव्यांचा उत्सव दिवाळीच्या सणात साजरा होत असे. हलते जिवंत दिवे पणत्यांच्या माध्यमातून सभोवताली वेढून राहिलेल्या अंधकाराला भेदून काढीत असत, तर नक्षत्रांचे तेज, प्रेरणेच्या ज्योती रंध्रारंध्राला रोमांचित करीत. अशा या निसर्गसंपन्न वातावरणाचा मानवी मनाला मोह पडला नाही, तर नवलच म्हणावे लागेल. सर्वसामान्य लोकमानसे आकाशात पोहोचू शकत नव्हती; मात्र आकाशातील नक्षत्रांना जमिनीवर आणून त्यांचा उत्सव साजरा करण्याची कल्पकता त्यांनी दाखवली. निसर्गाच्या कुशीत जीवन जगताना त्यांच्याविषयी कृतज्ञता त्यांनी नेहमीच कृतीतून व्यक्त केली. आकाशातील कृतिकापुंज त्यांच्यासाठी कौतुकाचा विषय ठरला. त्यांनी मग असाच तारकापुंज तांदळाच्या पिठापासून अंगणात, तुळशी वृंदावनासमोर रेखाटला. वर आकाशात चंद्र, नक्षत्रे, तर खाली त्यांचीच पिठापासूनची प्रतिकृती. एवढेच नाही, तर हातात हात गुंफून स्त्रिया तुळशी वृंदावनाभोवती गीर नृत्यासाठी सज्ज.
निसर्ग, अथांग अमर्याद असे आभाळ, तारकामंडळ याविषयीचे अनामिक कुतूहल मानवी मनाला होते. या सर्वांचे त्यांच्या जीवनातील स्थान अनन्यसाधारण असेच होते. जीवनप्रवासात मदत करणाऱ्यांविषयी मनात कायम सकारात्मक भाव बाळगणे, केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणे हे लोकमानसांनी आपले कर्तव्यच आहे असे मानले. ही परतफेड नाही, तर सेवेचा भाव तिथे असतो. कार्तिक महिन्यात त्रिपुरारी पौर्णिमेला 'कातयो' उत्सव धारबांदोडा तालुक्यातील 'उधळशे' गावात होतो. गणपत कालेकर व अमिता कालेकर या उभयतांचे यजमानपद या उत्सवाला आपुलकीचा गंध बहाल करते. मानवी मनाचे आकलन करणे ही कठीण बाब. आपल्या आवाक्यात न येणाऱ्या.. आपल्यापासून कोसो मैल दूर असलेल्या तरीही आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक असलेल्या घटना, प्रसंग, याविषयीची त्याची ओढ ही पूर्वपारची.
पूर्वी अश्विन-कार्तिकातील दिवस हे सोनसळी भातशेतीचे, भुरभुरणाऱ्या वाऱ्याचे, कोवळ्या सोनेरी उन्हाचे, चांदण्यांचा लख्ख प्रकाश देणाऱ्या कोजागिरी, त्रिपुरारी पौर्णिमांचे होते. याच दिवसांत कधी कधी कापलेल्या भाताला, पिकून वाऱ्यावर डोलणाऱ्या शेताला, गवताला अचानक आग लागायची. ती नक्षत्रांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे असे लोकमनाला वाटायचे. त्यामुळेच की काय त्यांनी या नक्षत्रांप्रती कृतज्ञता कृतज्ञता म्हणून उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू केली असावी? सभोवताली आनंदाची, उत्साहाची पेरणी होते, तेव्हा त्या आनंदाची अनुभूती मानवी मनातही जाणवते.
सुर्ला सत्तरीचे गीतिगायन, कातयो, सांगे, केपे, काणकोणचा आदिवासी वेळीप समाजातील मुली, महिलांचा धील्लोत्सव, धारबांदोडा, फोंडा तालुक्यातील कातयो उत्सव हे या नितळ, निर्मळ आनंदाचे, सुख-समृद्धीचेच तर प्रतीक आहे. तारामंडळ, त्यातील तारकापुंज, गावठी सुरय तांदळाच्या पिठापासून तुळशी वृंदावनासमोर रेखाटले जातात. ती रांगोळी, तिलाच तारकामंडळ म्हणतात. बाहेरचा गोल हे प्रतीक असते अथांग आकाशाचे. आत सात ठिपके हा तारकांचा पुंजका, सप्तर्षी असेही म्हणतात. त्याच्या बाजूलाच जरा वरच्या स्थानी चंद्र, सोबत एक ठिपका-तो सूर्य असतो. आकाशमंडळ रात्रीचे असल्याने तिथे सूर्याचे अस्तित्व ठिपक्याएवढेच दाखविले जाते. तो आहे, त्याच्याचमुळे तर ही पृथ्वी चराचरात चैतन्य प्रसवते याची जाणीव लोकमनाला आहे. रांगोळीरूपी कातयो रेखाटताना, बाहेरचा आकाशरूपी गोल पुरुषाने काढायचा व आतील कृतीकपुंजाचे ठिपके त्याच्या अर्धांगिनीने काढायचे असतात, ही परंपरा आजही गणपत कालेकर यांनी प्रवाहित ठेवलेली आहे. खाली रेखाटन चालू असते आणि नेमकं त्याच वेळी हा तारकापुंज तुळशीसमोर सजीव होतो. त्यालाही नमस्कार केला जातो.
कातयो बाये कातयो,
आकाशी उदाल्यो,
चंद्रिमा उदाल्यो कातयो
कातयो उदाल्यो अकाशील्यो..
दिला दिला आरुषी चेडवाक परघरी...
तिन्हीसांज झालेली असते. तुळस जरी विवाहादरम्यान एका रात्रीची सौभाग्यवती असली, तरी इथे कातयो उत्सवात ती पाच दिवस नवी नवरीच भासते. घरात पै-पाहुण्यांची गर्दी जमलेली. एकेक करून वाड्यावरील सर्वजणी मांडावर हजर होतात. तुळशीला मध्यभागी ठेवून हातात हात गुंफले जातात... आणि मग सुरू होतो, नृत्य, गीत गायनाचा आविष्कार. फुगडीत टाळ्या, धालोत एकमेकी पातीला आमनेसामने उभ्या राहात, हातात हात धरतात, तर कातयोत हातांच्या बोटांची गुंफण करून पाऊले पुढे मागे तर करतातच, त्याशिवाय खाली वाकून पुन्हा वर आकाशाकडे पाहात पाहात गीत आणि नृत्य सुरू होते. संथ गतीत गायन-नृत्याचे लयबद्ध सादरीकरण अनुभवताना त्या तशा चांदण्या रात्रीत आनंदाच्या असंख्य लहरी शरीर मनात निर्माण करतात. प्रत्येक वर्षी या नृत्याचा अनुभव प्रत्यक्षात घेण्याचा मोह आवरत नाही.
आता ऋतू बदललेत. पावसाळ्यात हिवाळा, हिवाळ्यात उन्हाळा असे असले तरीही कातयोची वेळ आणि परंपरा बदलली नाही. आजही कातयो सुरूच आहेत. या वर्षी तर ढगांनी झाकोळलेले आभाळ, दाट धुके मध्यरात्रीच अंगणात उतरलेले, वातावरणात हलकीशी थंडी भरून राहिली होती. त्याचा परिणाम शरीरावर झाला, पण मने ताजीतवानी होती. पावलात तीच जिद्द आणि लवचिकता जाणवली. 'काळो केस काळो घोडो काळी कणसा खाय गे..’ अशी भाषिक चमत्कृती असलेली, कानाला वेगळीच अनुभूती देणारी गीते ही तर या नृत्याचा आत्माच म्हणावा लागेल. या उत्सवात सामाजिक अनुबंधांची पक्की वीण गुंफलेली आहे.
प्रत्येक गीतात व्यक्तींची, आजूबाजूच्या गावांची, नातेवाईकांची, निसर्ग, त्याचे घटक, प्राणी या सर्वांची नावे इतक्या काव्यात्मक भाववृत्तीने गायिली जातात की ऐकणाऱ्याची भावतंद्री लागावी. प्रासादिक रचना, शब्दमाधुर्य, लालित्य, अनुप्रास यांनी भरलेल्या या गीतांना जेव्हा नृत्याची जोड लाभते, तेव्हा त्यातील काव्याची उंची वाढते. रात्र मंतरलेली होते. अशीच एक मंतरलेली रात्र उधळशेच्या कातयो उत्सवात अनुभवली. रेमको हा नृत्याचा प्रकार घालून नृत्याची समाप्ती करताना, मांडावर शेण शिताडो, झाडू मारली जाते. मांडाची मानकरीण केळीच्या पानावर मांसाहारी जेवण जेवून आपला उपवास सोडते. केळीच्या शिरोतीवर पोळे, काटेकणगे, यांचा प्रसाद ठेवला जातो. हे सर्व पदार्थ, पानावरचे मांसाहारी जेवण सर्वच अळणी असते. तुळशी वृंदावनासमोर हेच पदार्थ ठेवलेले असतात. दिंड्या म्हणजेच कुमारवयीन मुलांची फौज चादरी डोक्यावरून घेत रेमको प्रकार घालताना स्वतःही गोल गोल वेगाने फिरतात.. गोल भेदून आत जातात.. तुळशीसमोर ठेवलेले प्रसाद रुपी पदार्थ घेऊन धूम ठोकतात... या इथेच कातयो संपन्न होतात. लोकनृत्ये बरीच आहेत. त्यात वेदना, समस्या यांना शब्द देऊन त्यांचे गाणे केलेले असते. इथे तर सर्वच आकाशासारखे नितळ, निरभ्र, स्वच्छ आहे. शांत, संयत, आनंददायी... हा असा उत्सव अनुभवताना नकळतपणे आभाळाच्या उंचीची साधीसुधी जीवनपद्धती, त्यातील कल्पकता, काव्य पाहून थक्क व्हायला होते.

- पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)