गिर्दोली येथे घरावर वीज पडून लाखोंचे नुकसान

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24th May, 04:43 pm
गिर्दोली येथे घरावर वीज पडून लाखोंचे नुकसान

मडगाव : गिर्दोली चांदर येथील घरावर तसेच घराबाजूच्या झाडांवर वीज कोसळली. यात लेस्ली बार्बोझा यांच्या घराचे सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. मडगावसह सासष्टी भागात गुरुवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. यावेळी वादळी वार्‍यासह आलेल्या पावसामुळे मडगावात ओल्ड मार्केटमध्ये व इतर ठिकाणी अशी चार ठिकाणी झाडे पडली. रस्त्यावर पडलेली झाडे मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी बाजूला काढत वाहतूक सुरळीत केली. 

याशिवाय सासष्टीतील कोवटे गिर्दोली याठिकाणी लेस्ली बार्बोझा यांच्या घरावर वीज कोसळण्याची घटना घडली. सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास लेस्ली बार्बोझा हे कामावरुन आलेले असताना आंघोळ करावयास गेले असता मोठा आवाज झाला व विजेचा लोट घर‍ातून गेला. त्यावेळी वीज खंडित झालेली असल्याने त्यांना काय झाले असावे याचा अंदाज आला नाही. पण थोड्यावेळाने घराची कौले फुटलेली व विद्युत वाहिन्या तुटल्याचे दिसून आले. 

घरावर वीज कोसळल्याने कौले, वासे, फरशी यासह घरातील वायरिंगही जळून गेली. विजेचा मीटर जळाला. याशिवाय घराशेजारील सागवानाची दोन झाडे वीज पडल्याने मोडलेली आहेत. वीज कोसळल्याने साधारणतः घराचे १० ते १५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज घरातील व्यक्तींकडून व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा