साल्वादोर-द-मुंद ते चोडण पुलासाठी त्वरित भूसंपादन सुरू करा! मुख्यमंत्र्यांचा आदेश

भूसंपादन पूर्ण करून दर महिन्याला कामाचा अहवाल देण्याची सूचना

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th May, 04:22 pm
साल्वादोर-द-मुंद ते चोडण पुलासाठी त्वरित भूसंपादन सुरू करा! मुख्यमंत्र्यांचा आदेश

पणजी : चोडण ते साल्वादोर द मुंद या २०० मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे. भूसंपादनाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून इतर औपचारिकता पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. पुलाच्या कामाचा मासिक अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिले आहेत.

चोडण-साल्वादोर द मुंद पुलासाठी २५० कोटी रुपये खर्च येणार आहे. गेल्या वर्षीच्या (२०२३-२४) अर्थसंकल्पात या पुलासाठी २५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. पुलासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भूसंपादन प्रक्रियेनंतर निविदा काढण्यात येणार असल्याचे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. चोडण, मये, नार्वे यांसह डिचोली भागातील नागरिकांसाठीही हा पूल पूरक ठरणार आहे. पुलाशिवाय चोडण, मये आणि नार्वे येथील नागरिकांना फेरीबोटीवर अवलंबून राहावे लागते. फेरीमुळे चोडण आणि मये येथील लोकांना पणजीला पोहोचण्यास उशीर होतो. त्यामुळे या पुलाला मयेचे आमदार प्रेमेंद शेट यांनीही पाठिंबा दिला आहे.

नियोजित चोडण पुलाच्या कामाला गती देण्यासाठी आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठक घेतली. यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद शेट, पर्यटन मंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे, पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीन मालकांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने १२.५ कोटी रुपये ईडीसीकडे जमा केले आहेत. यातून जमीन मालकांना कायद्यानुसार मोबदला देण्यात येणार आहे.

साल्वादोर द मुंद परिसरातील रस्तेही अरुंद आहेत. पुलाला जोडणाऱ्या रस्त्यासह लगतच्या रस्त्यांचे रुंदीकरण करावे लागणार आहे. पुलाचे काम जीएसआयडीसीमार्फत केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

चोडण पुलाशी संबंधित कामाची जबाबदारी अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जीएसआयडीसी प्रकल्प आराखडा तयार करेल. पुलाचे काम जीएसआयडीसी करणार असून रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार आहे. - रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

हेही वाचा