पश्चिम बंगालात भाजप-तृणमूल यांच्यातच थेट लढत

Story: राज्यरंग |
23rd May, 10:47 pm
पश्चिम बंगालात भाजप-तृणमूल यांच्यातच थेट लढत

लोकसभेच्या जागांच्या दृष्टीने पश्चिम बंगालचा देशात तिसरा क्रमांक आहे. या राज्यात लोकसभेच्या ४२ जागा आहेत. एकेकाळी हे डाव्यांच्या वर्चस्वातील राज्य होते. आता ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून या पक्षाच्या एकहाती वर्चस्वाला भाजपने आव्हान दिले आहे. २०१९ची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर दोन वर्षांनी झालेली विधानसभा निवडणूक अशा दोन निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येते. राज्यात लोकसभेसाठी सर्व सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

राज्यात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांत म्हणजे १९ आणि २६ एप्रिल रोजी प्रत्येकी तीन मतदारसंघांत, ७ मे रोजी चार, १३ मे रोजी आठ, तर २० मे रोजी ७ मतदारसंघांत मतदान पार पडले. आता २५ मे रोजी ८, तर १ जून रोजी उर्वरित ९ मतदारसंघांत मतदान होणार आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत आसनसोल मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बाबूल सुप्रियो विजयी झाले होते. त्यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर २०२२ मध्ये येथे पोटनिवडणूक झाली. त्यावेळी तृणमूलचे शत्रुघ्न सिन्हा विजयी झाले. आता पुन्हा तृणमूलकडून शत्रुघ्न सिन्हाच रिंगणात आहेत. त्यांचा सामना एस. एस. अहलुवालिया यांच्याशी होणार आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपने या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यामुळे आता या मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बर्धमान-दुर्गापूर मतदारसंघात मागील निवडणुकीत भाजपच्या अहलुवालिया यांनी विजय नोंदवला होता. यावेळी या मतदारसंघातून भाजपकडून दिलीप घोष, तर तृणमूलकडून माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद मैदानात आहेत. या दोन्ही मतदारसंघांत ५ मे रोजी मतदान होणार आहे. बशीरहट लोकसभा मतदारसंघातच संदेशखाली गाव येते. येथे भाजपने संदेशखाली पीडित महिलांचा आवाज बनलेल्या रेखा पात्रा यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ आणि २०१७ च्या निवडणुकीत येथून तृणमूलने मोठा विजय संपादन केला होता. येथे १ जून रोजी मतदान होणार आहे. बहरामपू मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळी येथे काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा सामना तृणमूल काँग्रेसच्या माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांच्याशी होत आहे. येथे १३ मे रोजी मतदान पार पडले.

पहिली २५ वर्षे काँग्रेस, नंतरची ३४ वर्षे डावी आघाडी, त्यानंतरची १२ वर्षे तृणमूल काँग्रेस असा राजकीय प्रवास केलेले हे पूर्व भारतातील सर्वांत मोठे राज्य आहे. ममतांच्या पुढाकाराने भाजपच्या पराभवासाठी विरोधकांनी आघाडी स्थापन केली. काँग्रेसने अधिक जागा मागितल्याने ममतांनी पश्चिम बंगालपुरती ही आघाडी तुटल्याची आणि सर्व जागा तृणमूलच लढणार असल्याची घोषणा केली. आता भाजप आणि तृणमूल अशीच थेट लढत आहे. काँग्रेस आणि डावी आघाडी यांची युती प्रचारात फारशी दिसत नाही. भ्रष्टाचार, शारदा चिटफंड, खनिज संपत्तीची अवैध विक्री, ममतांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी, संदेशखाली प्रकरण, गुंतवणुकीची वानवा, सामाजिक ताणतणाव इत्यादी मुद्दे सरकारविरोधात महत्त्वाचे आहेत. मतदान शेवटच्या टप्प्यापर्यंत चालणार असल्याने शेवटपर्यंत दम धरणाऱ्या पक्षाला अधिक यश मिळण्याची शक्यता आहे.


प्रदीप जोशी, 

(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उप वृत्तसंपादक आहेत)