कैरीचा मुरांबा

Story: उदरभरण |
21st April, 05:13 pm
कैरीचा मुरांबा

एप्रिल-मे महिना म्हणजे कैरी, आंब्यांचा मोसम. पूर्वी हिरव्यागार कैर्‍या बाजारात भरपूर येतात तेव्हा कैरीचा मुरांबा करून तो साठवला जायचा आणि वर्षभर त्याचा जेवणात उपयोग केला जायचा. आंबट गोड अशा चवीचा हा मुरांबा चपातीसोबत अथवा पावासोबत खाताना मुले आनंदित होत असत.

आता बाजारात कितीही रेडिमेड मुरांब्याच्या बाटल्या विक्रीस असल्या तरी घरी आईने बनवलेल्या या कैरीच्या मुरांब्याची चव काही वेगळीच! कारण घरी बनवलेल्या या कैरीच्या मुरांब्यात प्रिझर्वेटिव्ह अजिबात वापरले जात नाहीत. चला तर मग आज करूया कैरीचा मुरांबा!


साहित्य  

दोन मोठ्या हिरव्यागार कैऱ्या, ५०० ग्राम साखर, चवीपुरते मीठ, दालचिनीचा तुकडा, २ लवंगा, १ चमचा तूप, वेलची पावडर. 


कृती  

प्रथम कैर्‍या स्वच्छ धुवून पुसून त्यावरच्या सालं काढून टाकून त्या किसून घ्याव्यात. एका पातेल्यात तूप गरम करायला ठेवावे आणि त्यात दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंगा घालून त्यावर कैरीचा किसलेला कीस टाकून तो परतून घ्यावा. त्यात साखर घालून मिश्रण ढवळत राहावे. मिश्रण दाटसर होत आल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालावे आणि सर्वात शेवटी वेलची पावडर टाकून गॅस बंद करावा. मिश्रण थंड झाल्यावर एका काचेच्या बाटलीत भरून ठेवावे.


कविता आमोणकर