उन्हाळ्यावर मात करण्यासाठी कैरीचे थंडगार पन्हे !

Story: उदरभरण |
14th April, 07:05 am
उन्हाळ्यावर मात करण्यासाठी कैरीचे थंडगार पन्हे !

हाय हाय ये गर्मी!! उफ्फ ये गर्मी!!.. 

एप्रिल-मे महिन्यात आपल्या गोव्यात असाच काहीसा माहौल असतो. आकाशातून पृथ्वीवर सूर्य अक्षरशः आग ओकत असतो. त्यामुळे अंगातून घामाच्या धारा निघत असतात. अशावेळी थंडगार काहीतरी प्यावे असे प्रत्येकाला वाटते.

बाजारातही यावेळेस कच्च्या कैऱ्या भरपूर प्रमाणात आलेल्या असतात. या कच्च्या कैऱ्यांपासून बनवलेले थंडगार पन्हे हे आरोग्यासाठी उत्साहवर्धक आणि शक्तिवर्धकही आहे.

तर आज आपण बघणार आहोत या कच्च्या कैऱ्यांपासून थंडगार पन्हे कसे बनवायचे. चला तर मग करूया ना, कैरीचे थंडगार पन्हे!!


साहित्य :  

पाच कैऱ्या, चवीनुसार साखर किंवा गूळ, थोडे मीठ, वेलचीची पावडर, पुदिन्याची ताजी पाने.

कृती : 

प्रथम कैऱ्या स्वच्छ धुऊन, एका भांड्यात पाणी घालून त्यात उकळत ठेवाव्या. कैरीच्या सालीचा रंग काळपट झाला की गॅस बंद करून झाकून ठेवाव्या व थंड झाल्यावर त्या कैऱ्यांची सालपाटं काढून आतला गर काढून घ्यावा. आता हा गर एका पातेल्यात घेऊन त्यात चवीनुसार साखर किंवा गुळ बारीक करून घालावा व ते पातेले गॅसवर ठेवावे. हे मिश्रण उलथन्याने सतत ढवळत राहावे. साखर किंवा गूळ विरघळत आल्यावर मिश्रण पातळ होईल. ते दाटसर होईपर्यंत ढवळत रहावे.

मिश्रण दाटसर होत आल्यावर त्यात अर्धा चमचा मीठ घालून गॅस बंद करावा व पातेले खाली उतरून घ्यावे त्यात वेलची पावडर घालावी. 

थंड झाल्यावर हे मिश्रण एका वाटीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे. 

जेव्हा पन्हे करायचे असेल तेव्हा या मिश्रणातील दोन ते तीन चमचे मिश्रण ग्लासमध्ये घेऊन पाणी घालावे. थंडगार बर्फ घालावा. दोन ताजी हिरवीगार पुदिन्याची पाने चिरडून टाकावी. पाहिजे असल्यास थोडी जिरेपूड टाकावी व हे थंडगार पन्हे प्यावयास द्यावे. ठंडा ठंडा कूल कूल!!


कविता आमोणकर