गावठी कोवळ्या मुळ्याचे सलाड

Story: उदरभरण |
16th March, 10:44 pm
गावठी कोवळ्या मुळ्याचे सलाड

गावठी हिरवेगार कोवळे मुळे जेव्हा बाजारात येतात तेव्हा त्यांची हिरवीगार तजेलदार पाने आणि त्यांची थोडीशीच असलेली पांढरीशुभ्र मुळे पाहून ती विकत घेण्याचा मोह अस्सल खवय्यांना होतोच होतो. या गावठी कोवळया मुळ्याचे सलाड चवीला एकदम भारी लागते. तोंडाची चव गेली असेल तर हे सलाड जेवणासोबत खाल्ल्याने तोंडाला हमखास रुच येते. कारण या गावठी मुळ्यांना त्याचीच अशी खास चव असते.

हे सलाड करताना मुळा मात्र गावठी असावा आणि त्याला पाने भरपूर आणि त्याची मुळेही एकदम बारीक असावी. जर असले गावठी मुळे दिसले तर लगेच घेऊन या आणि झटपट हे सलाड बनवा. चला तर मग करूया ना गावठी कोवळ्या मुळ्याचे सलाड?


साहित्य 

गावठी मुळ्याची एक जुडी, दोन कांदे बारीक चिरून, एक वाटी किसलेले ओले खोबरे, दोन मोठ्या हिरव्या मिरच्या, अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार साखर आणि मीठ.

कृती 

मुळ्यांची पाने आणि त्याची बारीक मुळे वेगळी करून ती स्वच्छ धुवून घ्यावीत. सर्व पाणी काढून पाने कोरडी करावीत. पाने एकावर एक घेऊन बारीक चिरून घ्यावीत आणि मुळेही बारीक चिरून घ्यावीत. कांदा अगदी बारीक चिरून घ्यावा. हिरव्या मिरच्या उभ्या अर्ध्या चिराव्यात.

सलाड करण्याच्या वेळेस चिरलेले सर्व साहित्य, कांदा, ओले खोबरे, हिरव्या मिरच्या हे सर्व साहित्य एकत्रित करावे. त्यात चवीनुसार मीठ आणि साखर घालावी. वरून लिंबाचा रस मिसळावा आणि अगदी हलक्या हाताने सर्व एकजीव करावे. जास्त जोरात मिसळू नये कारण या सलाडला लगेच पाणी सुटते.

सर्व मिश्रण एकत्रित केल्यावर ताटात लगेच हे सलाड वाढावे. हिरव्या आणि पांढर्‍या रंगाचे हे सलाड दिसतेही छान आणि लागतेही छान!


कविता आमोणकर