अतिशय सोपी आणि रुचकर अशी फरसबीची भाजी

Story: उदरभरण |
03rd February, 10:16 pm
अतिशय सोपी आणि रुचकर अशी फरसबीची भाजी

गांवठी भाज्यांची चव ही अप्रतिम असते कारण या भाज्यांचे पीक घेताना त्यात नैसर्गिक खतांचा वापर केलेला असतो. आपण भाज्या करताना मसाले टाकल्याने या भाज्यांच्या चवीत काही बदल होतो. गांवठी फरसबीची भाजी पुढील पद्धतीने केल्यास त्यातील नैसर्गिक चव टिकून रहाते आणि छान चवही येते. या भाजीत फोडणी नसल्याने ही भाजी करायला अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे. मसाले तर नसल्याने या भाजीची नैसर्गिक चव चाखायला मिळते. चला तर मग, पटकन बनवूया फरसबीची चवदार अशी भाजी!

साहित्य  

फरसबीच्या शेंगा पाव किलो, ४ ते ५ कांदे , २ ते ३ हिरव्या मिरच्या, खोबरेल तेल, खोवलेले ताजे ओले खोबरे, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर.

कृती 

फरसबी प्रथम चांगली धुवून ती बारीक कापून घ्यावी. फरसबीच्या शेंगाच्या दोन्ही बाजूकडील टोके काढून टाकावीत. हिरव्या मिरच्या मधोमध चिरून घ्याव्या. एका जाड बुडाच्या पातेल्यात चिरलेली भाजी, कांदे, मिरच्या घालून दोन चमचे खोबरेल तेल पसरवून टाकावे. सर्व मिसळून घ्यावे आणि हे पातेले गॅसवर ठेवावे. गॅसची आंच मंद ठेवावी. वर झाकण ठेवावे. एक वाफ आल्यावर त्यात मीठ घालावे आणि चांगले ढवळून घ्यावे. जास्त वेळ न घेता पातेल्यावर लगेच झाकण ठेवावे. कारण ही भाजी आपण फक्त वाफेवर शिजवणार आहोत. परत एक वाफ आल्यावर त्यात ओले खोबरे घालावे. भाजी शिजत आल्यावर छान सुगंध दरवळतो तेव्हा लगेच साखर घालावी व एक मिनिटाने गॅस बंद करावा.

ही भाजी आपण पाण्याचा अजिबात वापर न करता वाफेवर शिजवतो. त्यामुळे ओले खोबरे आणि मीठ घालताना भाजी  पटकन ढवळून पातेल्यावरील झाकण लगेच बंद करावे. म्हणजे वाफ आतच राहून त्यावर भाजी छान शिजते. जास्त शिजवू नये, हिरवट रंग असतानाच गॅस बंद करावा. काळपट होऊ देऊ नये. खूप चविष्ट लागते ही भाजी. करून पहाच.


कविता आमोणकर