मुगा गाठी

Story: उदरभरण |
06th April, 11:38 pm
मुगा गाठी

गोव्याच्या पारंपरिक अन्न पदार्थात मुगा गाठी हा प्रकार अग्रेसर आहे. खास गोमंतकीय पद्धतीने बनवलेल्या या मुगा गाठीने जेवणाची लज्जत वाढते. भरपूर काजू बिया घालून आणि शंकर छाप हिंगाची चुरचुरीत फोडणी दिल्यावर याचा सुटणारा सुगंध हा जाणकार मंडळींना आधीच्या अनेक उत्सवात ओरपून खाल्लेल्या मुगा गाठीची आठवण करून देतो. करूया ना आज, गोव्याची पारंपरिक अशी मुगा गाठी...


साहित्य : 

मोड आलेले मूग पाव किलो, एक नारळाच्या वाटीची सोय, चार-पाच हिरव्या मिरच्या, दोन चमचे धणे, सात-आठ काळी मिरी, चार लवंगा, लहान दालचिनी तुकडा, थोडी चिंच, चवीनुसार मीठ, थोडासा गूळ.

कृती :

मोड आलेले मूग चांगले धुऊन घ्यावेत. हे मूग एका चाळणीत घालून नळाच्या खाली ठेवावे म्हणजे त्याच्या सर्व साली वर येतात. त्या साली काढून टाकाव्यात. एका टोपात हे मूग घालून त्यात भरपूर पाणी घालून गॅसवर ठेवावे. उकळी आली की उरलेल्या साली सुद्धा वर येतात. त्या काढून टाकाव्यात. 

थोडे धणे, थोडी मिरी, थोडी लवंग, सुक्या लाल मिरच्या आणि दालचिनीचा तुकडा हे सगळे एका तव्यावर कोरडेच भाजून घ्यावेत. नारळाची सोय भाजू नये. 

त्यानंतर मिक्सरमध्ये नारळाची सोय, हळद पावडर, थोडी चिंच आणि भाजून घेतलेला हा मसाला थोडे पाणी घालून चांगले गुळगुळीत वाटून घ्यावे.

मूग शिजत आल्यावर त्यामध्ये हे वाटण घालावे. त्यात एक चमचा गूळ आणि चवीनुसार मीठ घालावे.

नंतर फोडणी द्यायच्या भांड्यामध्ये तेल घालून फोडणी करावी. शंकर छाप हिंग, राई जिऱ्याची आणि कढीपत्त्याची पाने घालून केलेली ही गरमागरम चुरचुरीत फोडणी त्या मुगाच्या गाठीत घालावी आणि त्या भांड्यावर झाकण ठेवावे. म्हणजे फोडणीचा वास त्याच्यात मुरतो. 

फोडणी देताना त्यात जर शंकर हिंग वापरला तर त्याचा खूप छान सुगंध येतो. 

गरमागरम मुगाच्या गाठी तयार आहेत. चपाती किंवा पावासोबत खाताना मस्त लागतात.


कविता आमोणकर