नारळाच्या रसातल्या शिरवळ्या

Story: उदरभरण |
30th March, 10:49 pm
नारळाच्या रसातल्या शिरवळ्या

गोव्यामध्ये सणासुदीच्या दिवशी किंवा एखाद्या शुभ कार्याच्या वेळीस गोड पदार्थ आवर्जून केला जातो. गोव्याचे पारंपरिक गोड पदार्थ खूप आहेत. त्यातलाच एक म्हणजे नारळाच्या रसातल्या शिरवळया. तांदळाच्या पिठाची उकड काढून त्याच्या मऊसूत शेवया केल्या जातात. नारळाच्या दुधामध्ये गूळ विरघळून त्या गोडसर अशा दाट रसात या तांदळाच्या गरमागरम शेवया खाताना जी तृप्ती मिळते ती अवर्णनीय असते. लगेच झटपट होणारा हा प्रकार असून अनेक जणांच्या आवडीचा हा गोड पदार्थ आहे. चला तर मग करूया ना आज नारळाच्या रसातल्या शिरवळ्या!


साहित्य :

तांदळाचे पीठ दोन वाटी, गरम पाणी दोन वाटी, चिमुटभर मीठ, एक नारळ, चवीनुसार गूळ, अर्धा चमचा वेलची पावडर. 

कृती : 

दोन वाटी पाणी गरम करण्यास ठेवावे. एका परातीत किंवा ताटात तांदळाचे पीठ घेऊन चिमूट भर मीठ टाकावे. त्यात हे गरम पाणी हलके हलके घालून पिठाचा चांगला गोळा मळून घ्यावा. आता आपण चकली करतो त्या सोऱ्यामध्ये शेवेची चकती घालून त्यात या पिठाचा एक लांबट गोळा टाकून शेव पाडतो त्याप्रमाणे पिठाच्या शेवया पाडून घ्याव्यात. नारळ खोवून त्याचा दाट रस काढून घ्यावा. दाट रसामध्ये गूळ चिरून घालावा व त्यात वेलची पावडर घालावी हा रस दाटसरच ठेवावा. खायला देताना डिशमध्ये ज्या आपण शेवया केल्या होत्या, त्या थोड्या घालून त्यावर हा नारळाचा गोडसर दाट रस घालावा व खायला द्यावे.


कविता आमोणकर