केळफुलाचे वडे

Story: उदरभरण |
10th February, 10:41 pm
केळफुलाचे वडे

केळफुलाची भाजी तर सर्वच जण करतात पण केळफुलाचे वडे हा चवीने खाणार्‍यांचा आवडीचा पदार्थ आहे. केळफूल साफ करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. केळफुलावरील आवरण काढून टाकल्यावर आतमध्ये असलेले कळ्यांचे गुच्छ हे वेगळे करू घ्यावेत. यातील प्रत्येक कळी मधील एक पारदर्शक पापुद्रा आणि आत एक उभा दांडा असतो, तो काढून टाकावा लागतो. या प्रमाणे सर्व कळ्या साफ करून घ्याव्या लागतात, या सर्व कळ्या साफ करून झाल्या की या कळ्या आणि आतील पांढरा दांडाही छानपैकी बारीक चिरून घ्यावा. मग एका पातेल्यात पाणी  घेऊन त्यात मीठ टाकून त्यात हे सर्व बारीक केलेले केळफूल त्यात टाकून ठेवतात. असे केल्याने त्यातील कडवटपणा निघून जातो.  केळफूल साफ करण्याची ही पद्धत जरा कटकटीची असली तरी चवीने खाणारे खवय्ये मात्र हे सर्व करायला तयार असतात. ही सर्व तयारी झाली की केळफुलाचे वडे पटकन तयार होतात. करायचे ना मग आज, केळफुलाचे वडे !..  चला तर मग...

साहित्य 

१ केळफूल,  अर्धी वाटी अख्खे मसूर, पाच हिरव्या मिरच्या,  २ मोठे चमचे चण्याचे पीठ    ( बेसन ), २ मोठे कांदे , २ चमचे मिरची पावडर, १ चमचा हळद , २ चमचे साखर, २ चमचे गरम मसाला, हिरवी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, वडे तळण्यासाठी तेल. 

कृती

वर सांगितल्याप्रमाणे केळफुलातील कळ्यांचे गुच्छ साफ करून बारीक चिरून मिठाच्या पाण्यात चांगले ५ ते ६ तास बुडवून ठेवावेत. त्यानंतर दोन तीनदा साफ पाण्याने धुवून घ्यावेत. नंतर मसूर धुवून घ्यावी आणि चिरलेले केळफूल आणि मसूर एकत्रित करून कुकर मध्ये शिजवून घ्यावी. मसूर भिजेल इतपतच पाणी घालावे. जास्त पाणी घालू नये.

त्यानंतर यात गरम मसाला, मिरची पावडर, बारीक चिरलेले कांदे, बेसन, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मिरची पावडर, साखर, कोथिंबीर घालून मिश्रण चांगले मळून त्याचा गोळा करावा. मिश्रण जर सैलसर झाले तर त्यात थोडे बेसन घालावे. नंतर थोडे थोडे मिश्रण घेऊन केळीच्या पानावर त्याचे वडे थापावेत आणि रवा लावून खमंग चुरचुरीत भाजून घ्यावेत. टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी घेऊन चवीने खावेत. नक्की करून बघा !..केळफुलाचे वडे

मिश्रण चांगले मळून त्याचा गोळा करावा. मिश्रण जर सैलसर झाले तर त्यात थोडे बेसन घालावे. नंतर थोडे थोडे मिश्रण घेऊन केळीच्या पानावर त्याचे वडे थापावेत आणि रवा लावून खमंग चुरचुरीत भाजून घ्यावेत. टोमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी घेऊन चवीने खावेत. नक्की करून बघा!


कविता आमोणकर