केळ्याचे बन्स

Story: उदरभरण |
24th February, 10:23 pm
केळ्याचे बन्स

केळ्याचे बन्स हा चवीने आणि आवडीने खाल्ला जाणारा पावाचाच एक पारंपरिक प्रकार आहे. गरमागरम चण्याचे तोंडाक किंवा मशरूम सागुती बरोबर हा बन्स खाल्यास त्या पदार्थांची चव द्विगुणित होते. काही हॉटेलमध्ये पुरी ऐवजी या बन्सला प्राधान्य देणारे अनेक खवय्ये दिसतात. जिरे आणि पिकलेल्या केळ्याची चव यात असल्याने या मिश्रणाची चव अप्रतिम लागते. काही जणांना तर हे बन्स नुसतेच खायला आवडतात. त्यातली मीही एक आहे आणि तुम्ही? चला तर मग करूया ना आज केळ्याचे बन्स. 


साहित्य  

२ चांगली पिकून मऊ झालेली केळी, ३ कप गव्हाचे पीठ किंवा मैदा, ४ चमचे साखर, १ कप दही, १ चमचा जिरे, अर्धा चमचा बेकिंग सोडा, तेल.

कृती

प्रथम एका मोठ्या खोलगट पातेल्यात पिकलेली केळी सोलून ती चांगली कुसकरून घ्यावीत. त्यात जिरे, दही, मैदा किंवा गव्हाचे पीठ, साखर, बेकिंग सोडा घालून पीठ चांगले मळून घ्यावे. या गोळ्याला वरुन तेल लावून सुमारे अर्धा तास झाकून ठेवावे. त्यानंतर कढईत तेल गरम करण्यास ठेवावे आणि मिश्रणाचे गोळे करून पुरीच्या आकारात किंवा त्याहून किंचित मोठे असे जाडसर लाटून हे बन्स तळून घ्यावेत.


कविता आमोणकर