मनगणे

Story: उदरभरण |
02nd March, 10:30 pm
मनगणे

मणगणें हा गोव्यात खास करून शुभ प्रसंगी आणि सणासुदीला केला जाणारा गोड असा खिरीचा प्रकार आहे. चणाडाळ आणि साबुदाणा घालून केलेल्या या मणगणेंमध्ये काजू बियांचा सढळ हस्ते वापर केल्याने त्याला छान चव येते. साबुदाणा शिजल्यावर पारदर्शी होतो त्यामुळे दिसायलाही आकर्षक असा हा गोड पदार्थ आहे. गूळ आणि नारळाचे दूध यात घातल्याने या मिश्रणाची चव साबुदाणा आणि चणाडाळमध्ये सामावली जाते आणि एक चविष्ट असा गोड पदार्थ खायला मिळाल्याचे समाधान लाभते. थंड किंवा गरम… कसे ही खा, चव तर एकदम भारी!!

चला, तर मग करूया आज स्पेशल गोड पदार्थ मणगणें.

साहित्य

चणाडाळ १ वाटी, साबुदाणे अर्धी वाटी, काजू बिया आवडीनुसार, एका ओल्या नारळाचा किस, वेलची पूड, गूळ, मनुका.

कृती

प्रथम चणाडाळ आणि साबुदाणे धुवून घ्यावेत. एका पातेल्यात पाणी घालून त्यात चणाडाळ आणि साबुदाणे घालावेत. त्यातच काजू बिया, मनुका घालाव्यात. साबुदाणा पारदर्शी होईपर्यंत सर्व शिजवून घ्यावे. ओल्या नारळाच्या किसाचे दूध काढून घ्यावे. दाट रस आणि आपरस वेगवेगळा काढून ठेवावा.  चणाडाळ आणि साबुदाणे शिजत आल्यावर त्यात प्रथम आपरस घालावा आणि जितके गोड हवे, त्या प्रमाणात गूळ किसून घालावा. गूळ विरघल्यावर त्यात दाट रस घालावा आणि उकळी यायच्या जरा आधी चिमूटभर मीठ टाकून वेलची पूड घालावी आणि गॅस बंद करावा. पावसाळयात यात हळदीचे पान धुवून टाकल्यास मणगण्याला अप्रतिम अशी चव येते.


कविता आमोणकर