कच्च्या केळ्याची कापां

Story: उदरभरण |
09th March, 10:41 pm
कच्च्या केळ्याची कापां

जेव्हा शाकाहारी जेवण घरी बनवले जाते, तेव्हा भात, वरण, भाजी, तोंडाक या सोबतच चवीसाठी काहीतरी चमचमीत असे तळलेले असेल, तर शाकाहारी जेवणाची लज्जत वाढतेच वाढते. बाजारात कच्ची केळी मुबलक प्रमाणात नेहमीच असतात. त्यामुळे जेव्हा शाकाहारी जेवणाचा बेत असतो, तेव्हा ही कच्च्या केळ्यांची रव्यात घोळवून चुरचुरीत तळलेली कापां पाहून दोन घास जास्त पोटात नक्की जातात.

करूया ना तर आज 

कच्च्या केळ्याची कापां!

साहित्य  

२ कच्ची केळी, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, रवा, तांदूळ पीठ, तेल.

कृती 

प्रथम कच्ची केळी सोलून त्याचे तिरके उभट लांबसर मध्यम आकाराच्या फोडी करून घ्याव्यात. त्यात चवीनुसार मीठ, मिरची पावडर, हळद पावडर घालून सर्व एकत्रित करावे. हा सर्व मीठ मसाला फोडींना व्यवस्थित सर्व बाजूने लागायला हवा. एका बशीत रवा घेऊन त्यात थोडे तांदळाचे पीठ  मिसळावे.

त्यानंतर गॅसवर फ्राय पॅन ठेवून त्यात थोडे तेल सगळीकडे पसरवून घ्यावे. तेल तापल्यावर त्यात एकेक फोड घेऊन ती रव्यात दोन्ही बाजूंनी घोळवून पॅनमध्ये घालावी. सर्व फोडी घालून झाल्यावर त्या सर्व फोडींवर पाण्याचा किंचित हबका मारावा आणि झाकून ठेवावे. थोड्या वेळाने पालटून दुसरी बाजू तळून घ्यावी. जेवताना गरमागरम खायला द्यावीत.


कविता आमोणकर