रेहबरच्या खून प्रकरणी विकास यादवला अटक

आतापर्यंत सहा जणांवर अटकेची कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th April, 12:09 am
रेहबरच्या खून प्रकरणी विकास यादवला अटक

म्हापसा : पिळर्ण येथे रेहबर खुर्शिद अली खान (२२, मूळ उत्तर प्रदेश) याच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी विकास यादव (२२, रा. कांदोळी) याला पर्वरी पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी गेले चार दिवस फरार होता. आतापर्यंत या प्रकरणात सहा जणांना अटक झाली आहे.

हा खुनाचा प्रकार मंगळवार, दि. १६ एप्रिल रोजी उत्तर रात्री घडला होता. पिळर्ण पर्वरी येथील ऑडिट भवनजवळ रेहबरचा मृतदेह पोलिसांना रस्त्यावर सापडला होता. पोलिसांना चौकशीवेळी प्रेयशीचा छळ चालवल्याच्या रागातून प्रियकर विकास यादव याने आपल्या १२ ते १५ साथीदारांच्या सहाय्याने खून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी बुधवार, १७ रोजी संशयित आरोपी खतेश कांदोळकर, सुमन बरिक, सचिन सहानी, तनय कांदोळकर व सचिन सिंग (सर्व रा. कांदोळी) यांना अटक केली होती. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. तर इतरांसह संशयित आरोपी विकास यादव हा फरार होता. पोलिसांनी शुक्रवारी दुपारी विकासला पकडून ताब्यात घेतले व अटक केली.

दरम्यान, रेहबर हा त्याच्या सलून शेजारी असलेल्या मिनी सुपरमार्केटच्या मालकिणीवर एकतर्फी प्रेम करत होता.त्यातून तो तिच्याशी जवळीक साधण्यासह नग्न फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचा छळ करत होता.

या युवतीसोबत संशयित आरोपी विकास यादव याचे प्रेम प्रकरण सुरू होते. हा छळवणुकीचा प्रकार त्या युवतीने विकासच्या कानी घातला. पण धमकी देऊनही रेहबर ऐकत नव्हता. संशयित विकास याच्या सांगण्यावरून त्या प्रेयसीने रेहबर याला रात्री भेटायला बोलावले. यानंतर त्याला मारहाण करण्यात आली व त्यातच रेहबरचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दितेंद्र नाईक वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

अपहरण करुन झाली होती मारहाण

सोमवार, दि. १५ रोजी रात्री १० वा. सुमारास रेहबर युवतीने सांगितलेल्या जागी भेटायला आला. त्यावेळी संशयित आरोपी तिथे आले व त्यांनी रेहबरचे अपहरण करुन त्याला गाडीतच मारहाण केली. जखमी अवस्थेत त्याला तिथेच टाकून ते पसार झाले. घटनेचे ठिकाण निर्जन असल्यामुळे त्याला कोणताही वैद्यकीय उपचार मिळाला नाही. त्यामुळे रक्तस्त्राव होऊन तिथेच त्याचा मृत्यू झाला होता.