भाजपविरोधात विरोधकांची अस्तित्वासाठी लढाई

Story: अंतरंग |
17th April, 10:40 pm
भाजपविरोधात विरोधकांची अस्तित्वासाठी लढाई

राजकारणात कधीच कुणी कुणाचा शत्रू नसतो व मित्रही नसतो, असे माजी मंत्री चर्चिल आलेमाव बहुतेकवेळा सांगतात. याचाच प्रत्यय सध्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या एकजुटीवरून दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देण्यासाठी विरोधी पक्षांनी आघाडी करत एकाच उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचे ठरवलेले आहे. भविष्यात पुन्हा हे पक्ष एकमेकांविरोधात उभे राहतील, पण सध्या ही धडपड पक्षांचे अस्तित्व वाचवण्यासाठी असल्याची तरीही दक्षिणेतील लोकांकडून याला प्रतिसाद मिळत आहे, हे महत्त्वाचे.

लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातील रिव्हॉल्युशनरी गोवन्स हा पक्ष सोडता काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, शिवसेना, तृणमूल काँग्रेस या पक्षांचे नेते एकत्र आलेले आहेत. राज्यात व देशात भाजपची ताकद वाढताना दिसते. यामुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व हळूहळू कमी होताना दिसत आहे. भाजपने संघटनाच्या व पक्षवाढीच्या नावाखाली अनेक काँग्रेसच्या आमदारांना पक्षात स्थान दिलेले आहे. केवळ प्रवेश नाही तर मंत्रीही केले आहे. राज्यातील काँग्रेसच्या आमदारांना दोनवेळा भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. काँग्रेस पक्ष पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी भाजपने हरतऱ्हेने प्रयत्न केल्याचे दिसते. एकदा बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली तर दुसऱ्यांदा दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या आमदारांनी भाजपला साथ दिलेली आहे. बाबू कवळेकर हे उपमुख्यमंत्री बनले होते तर आता आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिपद मिळालेले आहे. भाजपकडून पक्षात येणाऱ्यांचे स्वागत असल्याचे नेहमीच सांगण्यात आलेले आहे. गोव्यातच नाही तर देशातील इतर राज्यांतील काँग्रेस व प्रादेशिक पक्षांच्या आमदारांना भाजपने पक्षात घेत पक्ष वाढ केलेली आहे. याशिवाय भाजपकडून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्ससारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत भाजपमध्ये न येणाऱ्यांना त्रास दिला जात असल्याची टीकाही विरोधकांकडून केली जाते. काहीही असले तरी राज्यात व देशातील भाजपची स्थिती भक्कम झाल्याचे दिसते. इतकी वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या अनेक आमदार व खासदारांनी भाजपची वाट धरल्याने काँग्रेसची अवस्थाही इतर प्रादेशिक पक्षांपेक्षा वेगळी नाही. आमदारांसह राजकीय पक्ष म्हणून भाजपची आर्थिक देणग्यांची रक्कमही वाढलेली असून आर्थिक बाजूही मजबूत झालेली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता देशातील लोकशाहीला धोका असल्याची हाक देत राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसलाही प्रादेशिक पक्षांची मदत घ्यावी लागत आहे. देशभरासाठी इंडी नावाची आघाडी तयार करत आघाडीचा एकच उमेदवार देण्याचे व भाजपला विजयापासून दूर ठेवण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आलेले आहे. दक्षिण गोव्यातील एक जागा आपकडून मागून घेऊन राज्यातील दोन्ही जागा काँग्रेसने आपल्याकडे ठेवल्या. आता सर्व पक्षांतील नेते व कार्यकर्ते मिळून आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. चारवेळा खासदार राहिलेल्या सार्दिन यांनी नाराज असल्याने प्रचारात सहभाग घेणार नसल्याचे सांगितले. गोवा फॉरवर्डकडून त्यांना थेट विरोध करण्यात आला होता. गोवा फॉरवर्डने यापूर्वी भाजपला साथ देत सरकार स्थापन केलेले होते, पण सत्तेतून बाहेर केल्यावर पुन्हा भाजपविरोधात मांडीवर हात मारला आहे. विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने दगाफटका केल्याचे निवडणुकीनंतर सांगितलेल्या गोवा फॉरवर्डकडून वेळेची गरज ओळखून आघाडीत सहभाग घेतलेला दिसतो.

विरोधी पक्ष व त्यांचे नेते पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचा त्यांचा स्वार्थ असला तरीही सध्या लोकशाही टिकवण्याच्या नावाखाली एकत्र आले आहेत. लोकांकडून या आघाडीचे स्वागत होत आहे. भविष्यात पुन्हा हे पक्ष एकमेकांचे पाय ओढतील का, हा प्रश्न कायम राहील. पण आतातरी भाजपमुळे का होईना राज्यातील विरोधकांची एकी दक्षिण गोव्यातील लोकांना दिसलेली आहे.


अजय लाड, 

(लेखक दै. गोवन वाार्तचे दक्षिण गोवा ब्युरोचिफ  आहेत.)