गोवा कदं‌बांचे राजचिन्ह

अकराव्या शतकातल्या जय‌केशी (पहिला), बाराव्या शतकातील शिवचित्त पेरमाडीदेव आणि तेराव्या शतकातल्या सोयोदेवानी जी सोन्याची नाणी पाडली, त्यावर गोवा कदंबाचे राजचिन्ह पहायला मिळते. सोन्याच्या नाण्यावर उजवा पाय उभारलेल्या सिंहाला एका बाजूला दाखवण्यात आलेले आहे. निर्भयी सिंह आणि त्याचे वैशिष्ट्य असणारी आयाळ या चिन्हात प्रकर्षाने दिसत असून, त्यावरून गोवा कदंबाच्या राज्याची समृध्दी आणि सामर्थ्य कळते.


17th April, 12:53 am
गोवा कदं‌बांचे राजचिन्ह

गोवा सरकारने १९८० साली जेव्हा सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी कदंब राज्य परिवहन मह‌ामंडळाची स्थाप‌ना केली, तेव्हा बस सेवेवर गोवा कदंब राज्य सत्तेच्या सिंहलांछनाचा स्वीकार करण्यात आला. पार्तु‌गीज सत्ता गोव्यावर प्रस्थापित होण्यापूर्वी ज्या वेगवेगळ्या राजघराण्यांनी आपली सत्ता स्थापन केली होती, त्यात गोवा कदंब राज‌घराण्याची सत्ता महत्त्वाची होती. इसवी सनाच्या दहाव्या ते चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या दशकापर्यंत गोवा कद‌बांनी पश्चिम किनारपट्टीवरील गोवा, कोकण प्रांतापासून कर्नाटकातल्या घाटमाथ्यावरच्या काही प्रदेशांवर आपली सत्ता स्थापन केली होती. प्राचीन काळापासून पश्चिम किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या माथ्यावरच्या प्रदेशांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून गोवा बंदराची प्रामुख्याने ओळख निर्माण झाली होती. सोळाव्या शतकात पोर्तुगीज सत्ता गोव्यावर आपली सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरली, त्याला त्यांच्याकडे असलेले नौद‌लाचे सामर्थ्य कारणीभूत ठरले होते. पश्चिम किनारपट्टीवरील सागरी आणि त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत अशा जल‌मार्गांवर आपली पकड प्रस्थापित करण्यासाठी नौदल किती महत्त्वपूर्ण आहे, याची जाणिव गोवा कद‌ंबांना होती आणि त्यासाठी दूरचा सागरी प्रवास करू शकणारी गलबते बांधण्याबरोबर शस्त्रसज्ज, निर्भयी सैन्याच्या ताब्यात इथले जलमार्ग ठेवण्यात ते यशस्वी झाले होते. त्यामुळे सुख, समृद्धी, शेती, बागायती, उद्योग, व्यवसाय आणि कला, संस्कृतीला राजाश्रय देणाऱ्या गोवा कदंब राज्यकर्त्यांना गोवा आणि कोकणच्या इतिहासात उल्लेखनीय स्थान प्राप्त झाले होते, याची प्रचिती देणारे शिलालेख, वीरगळ, नाणी आणि त्यांच्या राजवटीत भरभराटीला आलेल्या शिष्पकलेची संचिते आढळलेली आहेत. हा वारसा पोर्तुगीजांच्या आसुरी धर्मांधतेमुळे आणि मूर्तीभंजनाच्या प्रवृत्तीमुळे ठिकठिकाणी नामशेष झालेला पहायला मिळतो. गुलामगिरीतून गोव्याची मुक्तता झाल्यानंतर इथल्या स्वराज्यातही गोवा कदंबाच्या कारकिर्दीतल्या असंख्य खाणाखुणा जत‌न करून ठेवण्याच्या दृष्टीने असलेल्या प्रचंड अनास्थेपायी यांचे मूल्यांकन आणि संवर्धन करण्यात आम्ही यशस्वी झालेलो नाही. त्यामुळे गोवा कदंबाच्या विखुरलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संचितांचा अभ्यास आणि संशोधन महत्त्वाचे ठरलेले आहे. १९६४ साली पणजी - मडगाव मार्गावर असलेल्या पिलार येथे फादर आग्नेल विद्यालयासाठी पायाभरणी करताना खोदकाम झाले, त्यावेळी वालुकामय खडकाला कोरलेले गोवा कदंबाचे राज्यचिन्ह आढळ‌ले होते. भग्नावशेष अत्यंत विकल स्थितीत जमिनीत गाडले गेले होते आणि त्यामुळे खोद‌कामातून प्राप्त झालेल्या या कदंब राजचिन्हातला सिंह गोवापुरीच्या इतिहासाचा वारसा सांगत आहे.

गोव्यात प्राचीन ते मध्ययुगीन इतिहासाच्या काळात वेगवेगळ्या राजांनी राज्य केले होते. अशा राज‌घराण्यांपैकी राष्ट्र‌कुट राज्यकर्त्यांचे सुवर्ण गरुड राजचिन्ह होते. उडी मारण्याच्या पावित्र्यातला पट्टेरी वाघ चोलाचे राजचिन्ह होते. विजयनगर राजांनी वराहाला राजचिन्हाचा सन्मान दिला होता, तर गरुडाचे डोके आणि अर्धे मनुष्याचे शरीर हे भोजाचे राजचिन्ह होते. बदामी चालुक्याने जंगली डुक्कर आपले राजचिन्ह म्हणून स्वीकारले होते. दक्षिण भारतात सत्तास्थानी असलेल्या होयसळ राजांनी सिंहाला सन्मान दिला होता. भारतीय धर्म संस्कृतीने सिंहाला देवी दुर्गेचे वाहन म्हणूनच नव्हे तर एकदर जंगलात ताकदवान असणाऱ्या या प्राण्याला आदराचे स्थान प्रदान केलेले आहे. शक्ती, सार्वभौमत्व, पराक्रम, निर्भिडता आणि राजेशाही यांचे प्रतीक असणारा सिंह जंगलाचा सम्राट म्हणून परिचित आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीने न्यायनिवाडा करण्यासाठी बसणाऱ्या आपल्या राजाच्या आसनाला सिंहासन असे नाव दिलेले आहे. जंगलात सिंहाचे वास्तव्य त्याच्या अस्तित्वाचा दरारा निर्माण करत असते आणि त्यामुळे आशियाई सिंह भारतीय लोकमानसाने शौर्याचे प्रतीक मानलेला आहे.

कधीकाळी भारतात बिहारपर्यंत वावर असणारा आशियाई सिंह गुजरातमधील जुनागढ येथील गीरच्या जंगलापुरता मर्यादित राहिलेला आहे. उत्तर प्रदेशातल्या गंगा आणि वरुणा नदीच्या संगमस्थळी असलेल्या सारनाथ येथील अशोकस्तंभावर चार उभे आशि‌याई सिंह असून त्यातील तीन उजव्या व डाव्या बाजूला तर चौथा मागे पाहत असल्याचे दाखवले‌ले आहे. भारताच्या राजमुद्रेत सारनाथ येथील अशोकस्तंभावरच्या सिंहाचा स्वीकार भारतीय प्रजासत्ताकाने केलेला आहे. त्यामुळे गोव्यात सत्यास्थानी आलेल्या कदंब राजांनी आपल्या अस्मितेचा मानदंड म्हणून उजवा पाय उचलून चालण्याच्या स्थितीत असलेल्या सिंहाचा राजचिन्ह म्हणून गौरव केला आणि त्यासाठी त्यांनी जेथे मूर्तीची, मंदिरांची प्रतिष्ठापना केली तेथे हे सिंह लांछन कोरण्याला प्राधान्य दिले होते. गोवा कदंबाची सत्ता कंटकाचार्य म्हणजे षष्ठदेव प्रथम याने इसवी सनाच्या ९६० मध्ये स्थापन केल्याचे मानले जाते, तर १३१० साली कामदेवाच्या कारकिर्दीत तिचा अस्त झाला, असे मानले जाते. उजवा पाय वर उचलेल्या स्थितीतला सिंह गोवा कदंबांनी राजचिन्ह म्हणून स्वीकारला होता, त्याची प्रचिती सोन्याची नाणी आपल्या कारकिर्दीत पाडली त्याच्यावरून येते. अकराव्या शतकातल्या जय‌केशी (पहिला), बाराव्या शतकातील शिवचित्त पेरमाडीदेव आणि तेराव्या शतकातल्या सोयोदेवानी जी सोन्याची नाणी पाडली, त्यावर गोवा कदंबाचे राजचिन्ह पहायला मिळते. सोन्याच्या नाण्यावर उजवा पाय उभारलेल्या सिंहाला एका बाजूला दाखवण्यात आलेले आहे. निर्भयी सिंह आणि त्याचे वैशिष्ट्य असणारी आयाळ या चिन्हात प्रकर्षाने दिसत असून, त्यावरून गोवा कदंबांच्या राज्याची समृध्दी आणि सामर्थ्य कळते.

आज पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या तांबडीसुर्ला येथील रगाडो नदीच्या डाव्या किनाऱ्यावर काळ्या पाषाणात कोरलेले महादेवाचे मंदिर कदंब नृपत्तीशिवचित्त पेरमाडीदेवाने आपली पट्टराणी कमलादेवीच्या इच्छेखातर बांधल्याचे सांगण्यात येते. तांबडीसुर्लाहून जंगलमार्गे जाणारी राणीची पाज कर्नाटकातल्या घाटमाथ्यावरच्या हळशी राजधानीकडे जात होती. हळशीतल्या लक्ष्मीनृसिंह मंदिरात असणारा शिलालेख आणि तेथील मंदिरे या राजचिन्हाची प्रचिती देतात. सह्याद्रीच्या डोंगरांनी वेढलेल्या तिळारी धरणाच्या जलाशयात गेलेल्या पाटये गावातल्या मंदिराच्या प्रवेशाद्वारावर गोवा कदंबाचे सिंह लांछन कोरले होते. सत्तरीत पूर्वाश्रमीचा चोर्लाघाट ज्या गुळ्ळे गावातून जात होता तो सारा परिसर आज हणजुणे धरणाच्या जलाशयाखाली बुडालेला आहे. तेथे गजलक्ष्मीच्या ज्या दोन मूर्ती सापडल्या होत्या, त्यांच्यावर गोवा कदंबाचे सिंह लांछन कोरलेले पहायला मिळते. त्यातली एक मूर्ती गोवा राज्य पुराणवस्तू संग्रहालयात जमा झाली आहे, तर दुसरी मोले पुनर्वसन वसाहतीतील केळबायच्या मंदिरात पहायला मिळते. सिंह लांछन हे गोवा कदंब राज्यकर्त्याच्या पराक्रमाचे आणि निर्भयाचे प्रतीक असून, त्यासाठी गोवा राज्य सरकारने या चिन्हाला कदंब राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर स्थान देऊन गौरविलेले आहे.


प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.)

मो. ९४२१२४८५४५