भाकप, भाजप, बसपमुळे राहुल गांधींची लागणार कसोटी

Story: राज्यरंग |
26th April, 12:38 am
भाकप, भाजप, बसपमुळे राहुल गांधींची लागणार कसोटी

देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांत मतदान होत आहे. पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी पार पडले. आता २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून रोजी मतदान होईल. निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. केरळमधील सर्व २० लोकसभा मतदारसंघांत एकाच दिवशी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. वायनाड मतदारसंघाच्या निकालाकडे देशाचे लक्ष राहणार आहे. मागील निवडणुकीत विजय संपादन केलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी याही वेळी याच मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. त्यांना राज्यातील सत्ताधारी भाकपचे नेते डी. राजा यांच्या पत्नी अॅनी राजा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन, बसपचे पी. आर. कृष्णनकुट्टी यांच्यासह पाच अपक्षांशी दोन हात करावे लागणार आहेत.

राहुल गांधी यांच्या उमेदवारीमुळे मागील लोकसभा निवडणुकीपासूनच ‘हाय प्रोफाईल’ झालेल्या वायनाडमधील लढत यावेळी चुरशीची होण्याची शक्यता आहे. राज्यात अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी आणि माकपच्या नेतृत्वाखालील डावी लोकशाही आघाडी यांचेच वर्चस्व आहे. दक्षिणेतील राज्यांमध्ये अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपने केरळमधील राजकारणात मुसंडी मारण्याचा निश्‍चय केल्याचे के. सुरेंद्रन यांना दिलेल्या उमेदवारीमुळे स्पष्ट होत आहे. मतदानाला काहीच दिवस उरलेले असताना काँग्रेसचे जिल्हा समितीचे महासचिव पी. एम. सुधाकरन पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झाले. हा काँग्रेस, राहुल गांधींसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

वायनाड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. २००९ मध्ये हा मतदारसंघ बनला. तेव्हापासून सलग तीन वेळा येथून काँग्रेसचे उमेदवारच विजयी झाले आहेत. मागील निवडणुकीत अमेठीतून पराभवाचा धक्का बसलेल्या राहुल गांधी यांना वायनाडने साथ दिल्याने ते लोकसभेत पोहोचू शकले होते. मागील निवडणुकीत त्यांनी या मतदारसंघातून तब्बल ४,३१,७७० मतांची आघाडी मिळवली होती. यावेळी मात्र भाकप आणि भाजप यांनी तगडा उमेदवार दिल्याने आणि बसपही रिंगणात असल्याने राहुल गांधी यांची कसोटी लागणार आहे. विशेष म्हणजे भाकप ‘इंडिया’चा घटक पक्ष आहे. यावेळी बसपनेही आपला उमेदवार उतरवल्यामुळे काँग्रेसच्या मतांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. वायनाडमध्ये हिंदू आणि मुस्लिम प्रत्येकी ४० टक्के, तर ख्रिस्ती २० टक्के मतदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ राहुल गांधी यांना सुरक्षित मानला जातो.

के. सुरेंद्रन भाजपचा आक्रमक चेहरा मानले जातात. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते. २००९ मध्ये त्यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आले. मागील चार वर्षांपासून ते भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळत आहेत. काही वर्षांपूर्वी शबरीमला येथील मंदिरात महिलांच्या प्रवेशाला विरोध करणाऱ्या आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले होते. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पतनमतित्त या मतदारसंघातून आणि नंतर पोटनिवडणुकीतही कोन्नी मतदारसंघातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यंदा मात्र भाजपने त्यांना थेट राहुल यांच्याविरोधातच रिंगणात उतरवून मोठा विश्वास दाखवला आहे. या मतदारसंघातील निकालाकडे देशाचे लक्ष लागून रहाणार, हे निश्चित.


प्रदीप जोशी, 

(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उप वृत्तसंपादक आहेत)