ऑडिट नसलेले स्मार्ट शहर

स्मार्ट सिटीची जी कामे पूर्ण झाली आहेत ती पाहता, पणजी नक्कीच सुविधांनी सज्ज होणार आहे. कामे सुरू असलेल्या ठिकाणी तयार करण्यात आलेली गटार व्यवस्था पाहिली तर ती वरवर चांगलीच दिसत आहे. हे चांगले दिसणे आणि प्रत्यक्षात पावसात त्या गटारांतून पाण्याचा निचरा होणे यात फरक आहे. पावसात पणजीतील गटार व्यवस्था कशा पद्धतीने काम करते, ते पहावे लागेल.

Story: संपादकीय |
25th April, 12:43 am
ऑडिट नसलेले स्मार्ट शहर

पणजी स्मार्ट सिटी प्रकल्प कामांतील हलगर्जीपणामुळे आधीच वादात सापडला आहे. परवा आलेल्या पावसाने स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामांमुळे पणजीत पावसात काय धुमाकूळ होऊ शकतो त्याचा अंदाज दिला आहे. स्मार्ट सिटीच्या कामांवरून वाद सुरू असताना गेल्या पाच वर्षांत स्मार्ट सिटीच्या कामांचे ऑडिटच झालेले नाही, असे समोर आले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पावर आतापर्यंत शेकडो कोटी रुपये खर्च झाले असले तरी २०१८ पासून स्मार्ट सिटीच्या कामांचे ऑडिट झालेले नाही. स्मार्ट सिटीसोबत सुमारे अकरा खाती, महामंडळे, सरकारी कंपन्या ज्यांनी आपले ऑडिट गेल्या काही वर्षांमध्ये केलेले नाही, त्यांच्या खाते प्रमुखांना सरकारने ऑडिट करण्यासाठी सुचवले आहे. इमेजीन पणजी कंपनीचाही त्यात समावेश आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प एकदा पूर्ण झाला की पणजी कात टाकणार आहे, पण त्यापूर्वी पणजीवासीयांना आणि पणजीत येणाऱ्या सर्वांनाच त्याची किंमतही मोजावी लागत आहे. एकदा स्मार्ट सिटीचे काम पूर्ण झाले की, पणजीचे चित्र अगदीच वेगळे दिसेल यात संशय नाही. 

सध्या स्मार्ट सिटीच्या कामावरून नागरिकांचे जे हाल होत आहेत, त्याला काही मर्यादा राहिलेल्या नाहीत. अपघात, धुळीचे प्रदूषण, वाहतुकीची कोंडी, वाहन चालकांची होत असलेली कसरत, स्थानिकांची होणाची गैरसोय, व्यावसायिकांचे होणारे नुकसान या सगळ्या गोष्टींमुळे स्मार्ट सिटी प्रकल्पाबद्दल प्रचंड नकारात्मकता निर्माण झाली आहे. कोविडच्या काळात काही व्यावसायिकांची जी स्थिती झाली होती, तीच वेळ आता स्मार्ट सिटीची कामे सुरू असल्यामुळे पणजीतील अनेक व्यावसायिकांवर आली आहे. कारण स्मार्ट सिटीच्या कामांचे नियोजन योग्य पद्धतीने झालेले नाही. ज्या भागात काम सुरू होणार तिथल्या व्यवसायांना पर्याय देणे, स्थानिकांसाठी ये-जा करण्यासाठी व्यवस्था करणे अशा गोष्टींचे काही नियोजन आवश्यक होते. पण ते न झाल्यामुळे पणजीतील व्यावसायिक नाराज आहेत. काहींना स्मार्ट सिटीच्या कामांचा मोठा फटका बसला. कारण काही परिसरांमध्ये वर्षभर कामेच सुरू आहेत.

३१ मे पर्यंत स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य असले तरी जूनच्या शेवटपर्यंत काही प्रमाणात ती पूर्णत्वास येऊ शकतात. काही कामे पावसानंतरही पुन्हा सुरू केली जाऊ शकतात. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पावसापूर्वी काही ठिकाणची कामे थांबवावी लागतील. त्यानंतर तात्पुरती डागडुजी करण्याची वेळ येऊ शकते. काही कामे अद्यापही प्राथमिक स्तरावर आहेत. ती पूर्ण होण्यासाठी एक दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागेल. काही कामे सुरू व्हायची आहेत. त्यामुळे पावसापूर्वी स्मार्ट सिटी प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यताच नाही. दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने प्रत्यक्षात पाऊस सुरू झाल्यानंतर पणजीची परिस्थिती काय होऊ शकते, त्याची जाणीव करून दिली आहे. जर तासभर पडलेल्या पावसाने पणजीत सर्वत्र पाणी साचू शकते आणि चिखलाचे साम्राज्य तयार होऊ शकते तर पावसात पणजीची दाणादाण उडू शकते. स्मार्ट सिटीची जी कामे पूर्ण झाली आहेत ती पाहता, पणजी नक्कीच सुविधांनी सज्ज होणार आहे. कामे सुरू असलेल्या ठिकाणी तयार करण्यात आलेली गटार व्यवस्था पाहिली तर ती वरवर चांगलीच दिसत आहे. हे चांगले दिसणे आणि प्रत्यक्षात पावसात त्या गटारांतून पाण्याचा निचरा होणे यात फरक आहे. पावसात पणजीतील गटार व्यवस्था कशा पद्धतीने काम करते, ते पहावे लागेल. जर नव्याने तयार करण्यात आलेल्या गटार व्यवस्थेत अडथळे आले तर परवाच्या पावसाने पणजीत जी स्थिती केली, त्यापेक्षा भयानक स्थिती पावसात निर्माण होऊ शकते. पणजीतील गटार व्यवस्था ही पोर्तुगीज काळातील होती. पाणी समुद्रात जाण्यासाठी योग्य पद्धतीने या गटारांची निर्मिती केली होती. पण ती साफ करण्याच्या कामाकडे महापालिकेने कधी लक्ष दिले नसल्यामुळे त्यात माती साचून अनेक ठिकाणी गटार उद्ध्वस्त झाले. आता स्मार्ट सिटीच्या कामातून या गटार व्यवस्थेचे नूतनीकरण करण्यावर भर देणे आवश्यक आहे, अन्यथा पणजीतील अनेक सखल भागांत दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पावसात पूर येऊ शकतो. पणजीतील मुख्य परिसरामध्ये पाणी साचण्याचे प्रकार दरवर्षी होत असतात. स्मार्ट सिटीच्या कामानंतर पणजीत ही तळी साचणे बंद होतील, अशी अपेक्षा आहे.