बेकायदेशीरपणाची परिसीमा

Story: भवताल |
14th April, 05:08 am
बेकायदेशीरपणाची परिसीमा

अपेक्षेपेक्षा जास्त संपत्ती कमावण्याच्या नादात आपण आज माणूसपणा, निसर्ग, संवेदना, आपुलकी, प्रेम, माया संपूर्ण विसरलेला आहोत. आपल्याला फक्त पैसे हे सर्वस्व वाटत आहे. अशा प्रकारची चुकीची संकल्पना भुरळ घालू लागली आहे. या भुरळ घालण्याच्या नादामध्ये कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार न करता त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपण फक्त पैशाच्या नादात वावरू लागलो आहोत. अमाप संपत्ती कमवावी व त्यातून ऐषआरामी जीवन जगावे अशा प्रकारचे विचार आपल्या भोवती घुटमळू लागलेले आहेत. पैसे कमवावेत याबद्दल अजिबात दुमत नाही.

असे म्हणतात की, चुकीच्या मार्गाने कमावलेली संपत्ती ही प्रेतावरची फुले असतात ती हसूही देत नाहीत व रडूही देत नाहीत. आपण जेव्हा धनसंपत्ती कमवतो त्याचा दुसऱ्याला त्रास होऊ नये. ज्या मार्गातून आपण संपत्ती कमवतो त्याचे दुष्परिणाम जनतेवर, निसर्गावर होणार नाहीत याची सुद्धा दखल घेणे अत्यंत गरजेचे असते. मात्र आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. विचित्र परिस्थितीच्या माध्यमातून आपण मार्गक्रमण करीत आहोत. प्रत्येक गोष्ट ही पैशानेच होऊ शकते अशा प्रकारचा खोटा समज आपल्यासमोर निर्माण होऊ लागलेला आहे. यातून बेकायदेशीर कृत्याला उजाळा मिळू लागलेला आहे. सत्तरी तालुक्यामध्ये सध्या गाजणारे स्फोट प्रकरण हा याचाच एक महत्त्वाचा भाग आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. ज्या इसमांकडून ही गोष्ट घडून आली तो अशाच प्रवृत्तीचा आहे. एकेकाळी वाळपई भागामध्ये मोबाईलची सिम कार्ड विकण्यापासून त्यानंतर केश कर्तन व्यवसाय करणारा हा इसम एकाएकी धनाढ्य झाला. पैशाच्या गादीवर लोळू लागला. याचे गमक सहजासहजी कुणाला समजले नाही. मात्र ज्यावेळी अनसोळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्फोट झाला व त्यामागचा खरा सूत्रधार हाच आहे असे जेव्हा सिद्ध झाले त्यावेळी सर्वसाधारण नागरिकांच्या चर्चेला ऊत आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात धनसंपत्ती कमविणारा एकाएकी धनाढ्य कसा झाला अशा प्रकारचे संशोधन नागरिकांनी सुरू केले व त्यामध्ये अनेक गोष्टी प्रकर्षाने बाहेर येऊ लागल्या. आज या इसमाच्या सत्तरी तालुक्यात जवळपास पंधरा पेक्षा जास्त चिरेखाणी आहेत. दगड काढून तो बांधकामासाठी विकत आहे. ट्रक, मशिनरी आहेत. बेकायदेशीरपणे चिरे काढणे, त्याची वाहतूक करणे त्याचे चालू आहे. निसर्गावर आघात करून हे प्रकार सुरू आहेत. पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी करण्यात येत आहे. उघड्या डोळ्याने डोंगर फोडले जात आहेत. मिळेल त्या ठिकाणी चिरे उत्खनन सुरू आहे. अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा जेव्हा तोकडी पडते. त्यांचे हात जेव्हा कमी पडतात. अनेक वर्षे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या व्यवसाय व त्यातून समाजाला, पर्यावरणाला, निसर्गाला होणारी हानी याचा गांभीर्याने विचार करून नियतीने शेवटी त्याच्या हातून हा मोठा गुन्हा घडविला व शेवटी सरकारी यंत्रणेला मनात नसतानाही कठोर कारवाई करावी लागली हे नाकारता येण्यासारखे नाही. या स्फोटातून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची, जंगल संपत्तीची हानी झाली. त्याचबरोबर या स्फोटाच्या तीव्रतेने सभोवतालच्या घरांवर मोठ्या प्रमाणात आघात झाले. घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मानवी व जैवविविधतेवर त्याचे मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिणाम झाले हे सुद्धा लक्षात घेण्यासारखे आहे. 

जिलेटिनचा वापर किंवा स्वतः बाळगणे हा मोठा गुन्हा आहे. त्यासाठी आवश्यक स्तरावर परवानगी घ्यावी लागते. परवानगी घेतल्यानंतर या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करावी लागते. विशेष खबरदारी घ्यावी लागते. मात्र याबाबतची प्रक्रिया अजिबात या इसमाने केली नाही. आपल्या जमिनीमध्ये असलेल्या विहिरीच्या बाजूलाच जमिनीमध्ये पुरून हा जिलेटीनचा साठा ठेवला होता. त्याचा अचानकपणे स्फोट झाला. वाळपई भाग पूर्णपणे शिगमोत्सवात बुडून गेला होता. आनंदाला उधाण आले होते. वाळपई शहरामध्ये माणसांची गर्दी फुलली होती. अशा वेळी सुद्धा या स्फोटाचा आवाज येणे म्हणजे हा स्फोट किती प्रचंड प्रमाणात होता याची कल्पना येऊ शकते. 

सध्या पोलीस यंत्रणेचे काम सुरू आहे. तपासाची चक्रे गतीने फिरत आहेत. सरकारची संबंधित यंत्रणा आपल्यापरीने कारवाई करताना दिसत आहे. मात्र सरकारचे हात सुद्धा या प्रकरणी कमी पडत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारवाईची प्रक्रिया अत्यंत गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.आज प्रत्येक ठिकाणी पर्यावरणाची व जंगल संपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी होताना दिसत आहे. गोवा हे समुद्र किनाऱ्याने नटले असले तरीसुद्धा जंगल संपत्ती हा सुद्धा गोव्याच्या सौंदर्याचा महत्त्वाचा घटक आहे हे आपण विसरून चालणार नाही. या ठिकाणी समतोल प्रमाणात होणारी पर्जन्यवृष्टी यातून अनेक प्रकारच्या घटकांना आधार मिळतो व जगण्याचा मंत्र मिळतो. आपण जर जंगल संपत्ती नष्ट केली. पर्यावरणा संदर्भात विशेष लक्ष दिले नाही. गांभीर्यता दाखवली नाही तर येणाऱ्या काळात त्याचा पर्जन्यवृष्टीवर मोठ्या प्रमाणात प्रतिकूल परिणाम होऊ शकतो व त्यातून आपणाला व आपल्या भावी पिढीला काळानुरूप समस्या गांभीर्याने भोगाव्या लागतील हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्याची सुरुवात आता झालेली आहे. अवेळी पडणारा पाऊस, सातत्याने बदलणारे हवामान ही याची सुरुवात आहे. याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. जोपर्यंत आपण कायदेशीर व बेकायदेशीर याचा फरक ओळखून त्या दृष्टीने मार्गक्रमण करत नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या गोष्टी होतच राहणार आहेत. यामुळे प्रत्येकाने याबाबतीत गांभीर्याने विचार करून त्यामागचा फरक व येणारे संभाव्य परिणाम या संदर्भात सुद्धा विशेष लक्ष देणे ही काळाची गरज आहे. अनसोळे येथील स्फोट याचा सारासार विचार करून येणाऱ्या काळात सत्तरी तालुक्यातील चिरेखाणी बाबतीत सरकारने गंभीर होणे काळाची गरज आहे. या प्रकरणाने सरकारी यंत्रणेला कारवाई करण्याची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन संधीचे सोने कसे करावे हे सरकारी यंत्रणेच्या हातात आहे. विषय या इसमाचा नाही मात्र ज्या पद्धतीची प्रवृत्ती समाजामध्ये जन्माला येऊ लागलेली आहे. त्यासाठी निष्काळजीपणा न करता विशेष लक्ष देऊन अशा प्रकारची प्रवृत्ती आताच नष्ट करून येणाऱ्या भावी पिढीचे जीवन उज्ज्वल व्हावे त्यांना निरोगी आयुष्य जगता यावे यासाठी आताच डोळे उघडणे गरजेचे आहे. 

अशा बेकायदेशीर प्रकरणासंदर्भात अनेक वेळा राजकारणी नाक खुपसत असतात. कारवाई होऊ नये यासाठी प्रयत्न करीत असतात. मात्र प्रत्येकाने आपल्या भावी पिढीचा सातत्याने विचार करणे गरजेचे आहे. कारण ती काळाची गरज आहे. येणारी पिढीला सुसह्यपणे जीवन जगण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आतापासूनच आपण थोडी कळ सोसून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालावा यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचेच आहे.


उदय सावंत, वाळपई