पूनाखा झोंगची पहिली झलक

आतापर्यंत पाहिलेलं भूतान आणि आता पाहत असलेलं भूतान ह्यात फरक होता. इथल्या हवेत जादू होती. आतापर्यंत फक्त शांत प्रदेश, स्वच्छ प्रदेश म्हणता म्हणता भूतानने आपल्या विशेषणात भर घालून घेतली होती; रहस्यमय नि जादुई ह्या दोन शब्दांची.

Story: प्रवास |
14th April, 05:03 am
पूनाखा झोंगची पहिली झलक

थिंपु ते पारो ह्या प्रवासामध्ये वाटेत पूनाखा नावाचं एक गाव लागतं. आमचा मुक्काम तिथेच होता. हे गाव पो चू आणि मो चू नद्यांच्या संगमावर असलेल्या सतराव्या शतकात बांधल्या गेलेल्या पुनाखा झोंगसाठी ओळखलं जातं. झोंग म्हणजे महाल. पण ह्या महालात मठ देखील आहे. दोन हिश्श्यात विभागला गेलेला हा महाल अर्धा सरकारी कामकाज नि अर्धा धार्मिक विधी संपन्न करण्यासाठी वापरला जातो. ह्या देशातला सर्वात जुना, सर्वात मोठा आणि सर्वात लक्षवेधी मठ म्हणून हा खास ओळखला जातो. इथे बुद्धाचा एक महत्त्वपूर्ण अवशेष (रेलिक) आहे ज्यामुळे भूतानी लोक ह्या जागेला अत्यंत पवित्र मानतात. 


भूतानच्या शांत लँडस्केपमध्ये वसलेलं पुनाखा, त्याच्या मोहक दृश्य आणि समृद्ध इतिहासामुळे प्रसिद्ध आहे. आम्ही या नयनरम्य ठिकाणाला जाताना, इथल्या डोंगराळ दऱ्याखोऱ्यांतून प्रवास करत असताना, आमच्या लक्षात आलं की हा प्रदेश किती सुंदर आहे. म्हणजे आतापर्यंत पाहिलेलं भूतान आणि आता पाहत असलेलं भूतान ह्यात फरक होता. इथल्या हवेत जादू होती. आतापर्यंत फक्त शांत प्रदेश, स्वच्छ प्रदेश म्हणता म्हणता भूतानने आपल्या विशेषणात भर घालून घेतली होती रहस्यमय नि जादुई ह्या दोन शब्दांची. 

हळूहळू गगनचुंबी डोंगराळ भागातून आम्ही उतरू लागलो. दरी उतरता उतरता दूरवर एक आलिशान महाल नदीच्या विस्तीर्ण प्रवाहात मधोमध विसावलेला दिसला. खरंतर तो दोन नद्यांच्या मध्ये असलेल्या जमिनीवर बांधला होता. पण भास असा होई की जणू हा आताच नदीत डुबकी घेऊन बाहेर आला आहे. अशी ह्या पूनाखा झोंगची पहिली झलक पाहून आम्ही थक्क झालो.

हळूहळू झोंग जवळ आला. गेटमधून पुढे पारंपरिक लाकडी पूल ओलांडून, आम्ही झोंगच्या अंगणात प्रवेश केला, आणि एक पवित्र वातावरण अनुभवलं. आश्चर्य म्हणजे वाऱ्याबरोबर फडकणाऱ्या प्रार्थना ध्वजांचा आवाज देखील शांती देत होता. जणू हा आवाज म्हणजे एक मंगल प्रार्थना गायली जात होती. आतमध्ये डोकावून पाहिलं, तर दिसलं एक सुंदर पटांगण आणि त्याच्या अवतीभोवती धवल रंगाने रंगवलेले कक्ष. त्यातल्या एका कक्षातून ताशीने आम्हाला गोंधळात टाकणाऱ्या चक्रव्यूहासारख्या वाटांनी आत नेलं, इथे प्रार्थना कक्ष होता. बौद्ध भिक्षुक शिस्तीने येत जात होते. प्रार्थना करत होते. काही पूजाविधी करण्यात व्यस्त होते. 


अश्या ह्या पवित्र हॉलमध्ये आत जात असताना मलाच काहीसं अस्वस्थ वाटलं. जणू इथे प्रवाश्यांच्या आत जाण्यावर बंदी असली पाहिजे होती. पण आम्हाला आत नेणारा ताशी आपल्या संस्कृती आणि परंपरेबद्दल फार गर्वाने सांगत होता. त्यामुळे आम्ही निमूटपणे त्याच्या पाठोपाठ गेलो. प्रार्थना कक्षात असलेल्या भिंतीवर पूर्वी लढलेल्या लढायांच्या कथा आणि प्रार्थना चितारलेल्या होत्या. आमच्यासारखे अनेक प्रवासी इथे आत आले होते. आपापल्या वाटाड्यांबरोबर ते ह्या भवनाची नि भूतानी इतिहासाची माहिती मिळवत होते. पूजा करणारे लाल वस्त्रातले बौद्ध भिक्षुक अजिबात कशाचा व्यत्यय करून न घेता त्यांचा मंत्रोच्चार करतच राहिले. त्यांचा आवाज प्राचीन भिंतींवर प्रतिध्वनित होऊन घुमत होता. आतल्या गाभाऱ्यात पाऊल टाकल्यावर इथल्या शांततेने एक शब्दांच्या पलीकडची भावना अनुभवली. आम्ही ह्या अत्यंत धार्मिक भावनेने वेढून गेलो. लखलखणारे लोण्यांचे दिवे आणि उदबत्तीचा सुगंध हवेत भरून गेला होता आणि आमच्या मनात आदराची तीव्र भावना जागृत झाली. बाहेर आल्यावर परत प्रांगण लागलं. इथल्या बोधी वृक्षाच्या छायेत काही क्षण आम्ही बसलो. अद्वैत सगळीकडे लुटूलुटू धावत होता. त्यालाही इथलं वातावरण फार आवडलेलं दिसत होतं. निघताना परत एकदा प्रत्येक कोपरा डोळे भरून पहिला. आम्ही पूनाखा झोंगला निरोप दिला खरा, पण त्याचं सौंदर्य आणि मांगल्य आमच्या आठवणींमध्ये कोरलं गेलं होतं, आम्हाला जाणीव झाली की आमची ही भेट, भेट नसून ती भूतानच्या हृदयाची आणि आत्म्याची तीर्थयात्रा होती.

क्रमशः


भक्ती सरदेसाई