अंधश्रद्धांना बळी पडणारा वनमानव

काळ्या मांजरीने रस्ता ओलांडल्यास अपशकुन होतो असा समज आपल्या समाजामध्ये आहे. पण हा असा समज बाळगण्यामागचे अचूक कारण अजूनपर्यंत स्पष्टपणे कुणी सांगू शकले नाही. का? कारण हा समज-गैरसमज नसून ही निव्वळ अंधश्रद्धा आहे.

Story: साद निसर्गाची |
14th April, 05:00 am
अंधश्रद्धांना बळी पडणारा वनमानव

कोणतीही गोष्ट रुढी, परंपरा यांच्या मागचे वैज्ञानिकदृष्टया, तार्किकदृष्टया कारण समजून न घेता ते आंधळेपणाने स्वीकारणे याला अंधश्रद्धा असे म्हणतात. बेडकाचे लग्न लावल्यावर पाऊस पडतो, खवल्या मांजरीच्या खवल्यांची अंगठी बोटात घातल्यास वाईट शक्तींपासून आपले रक्षण होते, घोरपडीचे जननेंद्रिय जवळ ठेवल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, वाघाची नखे, दात घरात ठेवल्यास नशीब उजळते यासारख्या अंधश्रद्धांमुळे वर्षाकाठी कितीतरी मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो. लाजवंती दिसल्यानंतर तिला पूजा न करता सोडून दिल्यास काही तरी वाईट घडेल किंवा लाजवंतीला पाहिले तर काहीतरी विपरीत घडेल अशी भीती मनात बाळगणे ही सुद्धा अंधश्रद्धाच आहे. 


भारतात दोन प्रकारच्या लाजवंती आढळतात; मंद लाजवंती आणि सडपातळ लाजवंती. लाजवंती हे भारतात आढळणारे एकमेव निशाचर माकड आहे. सगळ्यात लहान आकाराचे हे माकड फक्त पूर्व आणि पश्चिम घाटातच आढळते. आपल्या पश्चिम घाटात आढळणाऱ्या लाजवंतीला सडपातळ लाजवंती/वनमानव/वनमाणूस असे म्हणतात. 

सडपातळ लाजवंतीची लांबी बहुधा २० ते २५ सेंटीमीटर इतकी असते. त्याची शेपूट अवशेषांगाच्या स्वरूपात असून ती त्याच्या शरीरावरील दाट केसांत दडलेली असते. मोठे डोळे, डोळ्यांभोवती गर्द तपकिरी रंगाची वर्तुळे आणि त्रिकोणी आकाराचे डोके असलेला हा प्राणी दिसायला जरी भयानक असला तरी एकदम भित्रा आणि लाजाळू असतो. माकड कुळातील हा दुर्मिळ प्राणी भारतासह श्रीलंकेच्या घनदाट जंगलात सापडतो. श्रीलंकेतील पश्चिम घाटात आढळणाऱ्या लाजवंतीला 'लाल वनमानव' तर भारतातील पश्चिम घाटात आढळून येणाऱ्या लाजवंतीला 'राखाडी वनमानव' असे म्हणतात. 

हा प्राणी दिवसा आपले डोके हातापायांत खुपसून, शरीराचा चेंडू करून, झाडाची फांदी घट्ट पकडून झोपून राहतो आणि रात्र होताच शिकार करायला बाहेर पडतो. वनमानव फांदीला पकडून एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाऊ शकतो पण तो कधी उड्या मारत नाही. नाजूक आणि दुर्मिळ असा हा सस्तन प्राणी सहसा झाडांच्या पोकळीत, गुहेत किंवा झाडांच्या दाट फांद्यामध्ये राहतो. वनमानवाच्या मादीचा गर्भावधी सहा महिन्यांचा असतो. ती माणसा प्रमाणे एका खेपेला एका किंवा जुळ्या पिलांना जन्म देऊ शकते. आकाराने खूप लहान असल्यामुळे शिकारी जनावरांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे माकड नेहमी आडोशाची मदत घेत असते. ते कीटक, सरपटणारे प्राणी, वनस्पतींचे कोंब आणि रानटी फळे खाऊन आपला उदरनिर्वाह करतात. कांडेचोर, घुबड यांसारख्या रानटी जनावरांपासून त्याच्या जिवाला धोका असतो. 

विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात केलेली जंगलतोड, राज्य, शहर, गावाच्या सीमा रेखांकित करण्यासाठी विभागलेले जंगलक्षेत्र वनमानवाचा अधिवास नष्ट करते. इतकेच नव्हे तर दुर्दैवाने माणसाने उरी बाळगलेली अंधश्रद्धाही वर्षाकाठी कितीतरी दुर्मिळ लाजवंतीचा बळी घेत असते. 

काही प्रदेशांत वनमानवाच्या शरीराच्या प्रत्येक भागात औषधी किंवा जादुई शक्ती असते असा समज असल्यामुळे जादूटोणा करण्यासाठी वनमानवाचा वापर करण्यात येतो. काही ठिकाणी वनमानव दिसताच त्याला वनातून घरी आणून त्याची पूजा केली जाते. असे न केल्यास काहीतरी वाईट घडेल असा समज आहे. पूजा केल्यानंतर वनमानवाला वनात सोडून देतात. वनमानवाला परत वनात सोडून देतात हे जरी खरे असले तरी वास्तविक यामुळेही त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पूजा करण्याच्या हेतूने वनमानवाला त्याच्या अधिवासापासून कितीतरी किलोमीटर दूर आणतात. परंतू पूजा आटोपल्यानंतर त्याला त्याच्या अधिवासात न सोडता कुठेतरी जवळच सोडून देतात. अशा परिस्थितीत त्याच्या भक्षकांना चुकवून सुखरूपपणे आपल्या अधिवासात जाणे या लहानशा निशाचर प्राण्याला सहज शक्य होईल का? या आणि अशा कितीतरी कारणांमुळे जगभरातील वनमानवाची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. 

वनमाणूस नामशेष झाल्यास किटकांची संख्या वाढेल आणि त्याचा विपरीत परिणाम थेट कृषी क्षेत्रावर होईल. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने, भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या अंतर्गत वनमानवाला 'धोक्यात असलेली प्रजाती' म्हणून लाल यादीत सूचीबद्ध केलेले आहे.


स्त्रिग्धरा नाईक