निर्णयक्षमता वाढविण्याची गरज

अनेक वेळा मुलं छोटे मोठे निर्णय घ्यायला घाबरतात. त्यांना सेल्फ डिपेंडंट बनवण्यासाठी पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

Story: पालकत्व |
12th April, 10:21 pm
निर्णयक्षमता वाढविण्याची गरज

मुलांनी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय योग्य तर्‍हेने समजून, उमजून घेतले पाहिजे, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. स्वतःचे बरे-वाईट समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात असली पाहिजे. मात्र मुलांमधील हा गुण सुधारण्यात आणि बिघडवण्यात पालकांचा मोठा हात आहे. अनेक पालक मुलांवर जबाबदारी देण्याऐवजी त्यांची सर्व कामे स्वतः करू लागतात. त्यांना असे वाटते की, त्यांच्या मदतीशिवाय त्यांचे मूल एखादे काम चांगले करू शकणार नाही. यामुळे ते भविष्यात स्वावलंबी होण्याऐवजी इतरांवर अवलंबून राहतात आणि त्यांना जीवनात खूप त्रास सहन करावा लागतो. मुलाने स्वतःचे निर्णय स्वतः योग्य प्रकारे घ्यावे असे प्रत्येक पालकांना वाटत असते.

तुम्हाला घरात कोणतेही नवीन काम करायचे असेल किंवा पार्टीची तयारी करायची असेल, तुमच्या मुलाचे त्याबद्दलचे विचार नक्कीच विचारा. मुलाला त्याबद्दल काय वाटते किंवा त्याची विशेष इच्छा असेल तर त्याला नक्कीच महत्त्व द्या. त्यांच्यासोबत बोला. त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. मुलांच्या मताला महत्त्व दिले पाहिजे.

जर मुलाने चूक केली तर ती स्वाभाविक रुपाने घ्या. त्यांना रागवण्यापेक्षा थोडे संयमाने घ्या. चूक केली म्हणून सरळ रागवणे, मारणे हा उपाय नाही. तर त्यांना प्रेमाने समजावून सांगा.

आपल्या मुलाने परीक्षेत नेहमी जास्त गुण मिळवावेत, प्रत्येक गोष्टीत पुढे राहावे असे अनेक पालकांना वाटते. पण जेव्हा ते शक्य होत नाही तेव्हा ते दुःखी होऊन आपल्या नशिबाला दोष देऊ लागतात. ज्यामुळे मुलांचे मनोबल खचते. त्यामुळे स्वत: नेहमी सकारात्मक राहण्यासोबतच मुलांना पराभव स्वीकारून आयुष्यात पुढे जायला शिकवा.

आजच्या स्पर्धेच्या युगात आपला पाल्य स्पर्धेत टिकेल की नाही, या भीतीने पालकांकडून अपेक्षांचे ओझे लादले जाते. परिसरातील हुशार मुलांकडे पाहून आपल्याही मुलाने अभ्यासात पुढे असावे, असे पालकांना वाटते. यासाठी घरातील वातावरण दबावाचे नसावे. मुलांना मत मांडण्याचे स्वातंत्र्य असावे. अनेकदा पालक स्वतःच नवनवीन व्यवसाय, क्षेत्रामुळे प्रभावित होतात आणि मुलांमध्ये धरसोडवृत्ती निर्माण होते. ‘घोका आणि ओका’ हेच आपल्या शिक्षण पद्धतीचे सध्याचे सूत्र आहे. त्यामुळे पालकांनी आपला मुलगा दहावीपर्यंत जेवढे विषय शिकला, त्यांना आवडलेले विषय आणि अजिबात न आवडलेले विषय, अशी विभागणी करून अजिबात न आवडलेले विषय बाद करावेत.

मुलांना दहावीपर्यंत विषय निवडण्याचा पर्याय नव्हता. मात्र, पुढील शिक्षणात न झेपणारे विषय बाद करणे शक्य असते, मला एखादा विषय झेपत नाही, हे मुलांनी पालकांना मोकळेपणाने सांगितले तरच भावी काळातील अभ्यासक्रमांची निवड करणे सोयीचे होईल.


साधना पांडुरंग आरोंदेकर, डिचोली गोवा.