आसगावमधील नाईट क्लबचा परवाना रद्द करून बांधकाम जमीनदोस्त करा!

पंचायतीला निवेदन : आसगाव नागरिक कृती समिती आक्रमक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th April, 11:58 pm
आसगावमधील नाईट क्लबचा परवाना रद्द करून बांधकाम जमीनदोस्त करा!

म्हापसा : आसगाव-बादे नागरिक कृती समितीने गावात येणाऱ्या नियोजित नाईट क्लबला विरोध करणारे निवेदन पंचायतीला सादर केले. परवाना रद्द करून चालणार नाही, तर संबंधित बांधकाम पाडावे, अशी मागणी यावेळी या कृती समितीने केली.
सोमवारी सकाळी आसगाव बादे नागरिक कृती समितीच्या मार्फत ३०-३५ ग्रामस्थांनी आसगाव पंचायतीला भेट दिली व गावातील नियोजित नाईट क्लबला विरोध करणारे निवेदन सरपंच हनुमंत नाईक यांच्याकडे सादर केले.
मुनांगवाडा येथील सर्वे क्र. २२४/२ मध्ये नाईट क्लब, डिस्को क्लब, पबचा व्यवसाय थाटला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. हे दाट लोकवस्ती असलेल्या क्षेत्र आहे. जर क्लबला परवानगी दिल्यास गावातील शांतता भंग होईल आणि संपूर्ण परिसरात उपद्रव होईल. मद्यधुंद ग्राहक स्थानिकांशी गैरवर्तन करून मारामारी करतील, तसेच वेश्या व्यवसाय रॅकेट सारखे अनैतिक व्यवसाय चालतील. तसेच लहान मुले आणि आजारी लोकांवर याचा गंभीर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करीत समितीने सदर आस्थापनाला बार अॅण्ड रेस्टॉरन्टसाठी दिलेला परवाना पंचायत मंडळाने मागे घ्यावा, असे आवाहन करीत बार अॅण्ड रेस्टॉरन्टच्या नावाखाली नाईट क्लब चालवण्याचा हा संबंधितांचा छुपा अजेंडा आहे, असा दावा समितीने केला.
यावेळी सुरेंद्र गाड म्हणाले, सरपंचांनी पंचायत मंडळाच्या मासिक बैठकीत आमचा प्रतिनिधी उपस्थित राहण्यास अनुमती दिली आहे. त्यानंतर ग्रामस्थांसोबतही या विषयावर बैठक घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

आम्ही डिस्को क्लब विरोधात एकत्र आलो आहोत. यासंबंधी पंचायतीला निवेदन दिले असून सरपंचांनी परवाना रद्द करण्याची हमी दिली आहे. पण, आम्हाला सदर आस्थापनाचे बांधकाम पूर्णता जमीनदोस्त केलेले हवे आहे. जे बांधकाम केले आहे. त्यावरून ते बार अॅण्ड रेस्टॉरन्ट नव्हे, तर डान्स बारचेच असल्याचे दिसून येते. _ मनोज सावंत, समितीचे पदाधिकारी 

हेही वाचा