राज्यातील शाळा ४ जूनपासूनच भरणार

निवडणूक निकाल असला तरी बदल नाही : झिंगडे


30th April, 12:00 am
राज्यातील शाळा ४ जूनपासूनच भरणार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. त्याच दिवशी राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यावरून पालकांमध्ये संभ्रम पसरला आहे. परंतु, शाळा ४ जून रोजीच सुरू होतील, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सोमवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
शैक्षणिक वर्षातील किमान २२० दिवस शाळा भरवणे गरजेचे असते. त्यामुळे सरकारने शाळा ४ जूनपासूनच सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. सोमवार आणि मंगळवारच्या दोन दिवसांत निकाल जाहीर करण्याची मुभा शाळांना देण्यात आली होती. त्यानुसार काही शाळांनी सोमवारी निकाल जाहीर केले आहेत. उर्वरित शाळा मंगळवारी निकाल जाहीर करतील, असेही झिंगडे यांनी नमूद केले.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. शाळांचे नवे शैक्षणिक वर्ष ४ जूनपासूनच सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परंतु, निकालामुळे शाळा त्याच दिवशी सुरू होतील की त्यात बदल होईल, याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम पसरला होता. पण, अद्यापतरी नवे शैक्षणिक वर्ष ४ जूनपासूनच सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही, असेही झिंगडे यांनी स्पष्ट केले.             

हेही वाचा