पोटासाठी काम, मुखी भगवंताचे नाम : सेबेस्तियान फर्नांडिस

गोवेकर आणि पाव यांचा घनिष्ट संबंध आहे. सकाळी चहा सोबत, अळसांद्यांच्या तोणाकासोबत किंवा चिकन शागुतीसोबत कधीही पावाची साथ ही असतेच. पोर्तुगीजांची राजवट गोव्यात होती त्यामुळे गोव्यातील खाद्यसंस्कृतीवर विदेशी संस्कृतीचाही परिणाम झाला. पाव ही देणगी पोर्तुगीजांची आहे असे काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे खाद्यसंस्कृतीत पाव हा खूप आधीपासून गोव्यात प्रचलित आहे. पाव बनवण्याच्या लहान मोठ्या बेकर्‍याही गोव्यात ठिकठिकाणी पाहावयास मिळतात.

Story: तू चाल पुढं |
12th April, 10:18 pm
पोटासाठी काम, मुखी भगवंताचे नाम : सेबेस्तियान फर्नांडिस

मडगाव येथील मध्यवर्ती असलेल्या ग्रेस चर्चच्या पायर्‍यांशी पाव, बिस्किटे, कटलेट आदीची विक्री करण्यासाठी बसणारी शांत चेहर्‍याची एक स्त्री येणार्‍या-जाणार्‍यांचे लक्ष नेहमीच वेधून घेते. फातोर्डा येथे राहणारी ही सेबेस्तियान डायस नामक स्त्री ग्रेस चर्चच्या पायर्‍यांवर आपल्या समोरच्या टोपल्यांतील जरी पाव, बिस्किटं, कटलेट आदीची विक्री करत असली, तरी तिच्या एका हातात नेहमी जपमाळ असते हे तिचे खास वैशिष्ट्य आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी चर्चच्या पायर्‍यांवर बसून पावाची विक्री करताना देवाचे नाव नेहमीच तिच्या ओठांवर असते. ग्राहकांशी पावाची विक्री करताना ही तिच्या तोंडातील नामस्मरण तसेच जपमाळ ओढण्याची क्रियाही थांबत नाही कारण या देवानेच आपल्याला तारले आहे, असा तिचा ठाम विश्वास आहे.

फातोर्डा येथे राहणार्‍या सेबेस्तियानची फातोर्डा येथे जुजे डायस नावाची स्वत:ची बेकरी आहे. तिथे ती रात्री पाव, बिस्किटे, विविध प्रकारचे केक स्वत: बनवते आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ते सर्व घेऊन मडगाव येथील ग्रेस चर्चच्या पायर्‍यावर येऊन विक्रीसाठी बसते. गेली चाळीस वर्षे ती आपल्या बेकरीमध्ये बनवलेल्या या खाण्याच्या वस्तू विकत असून गेली अठरा वर्षे ती इथे विक्री करत आहे. त्या आधी मडगावाच्या मासळी बाजारात बसून ती खाद्यपदार्थांची विक्री करत असे.  

सेबेस्तियानचे ग्राहक ठरलेले असले, तरी रस्त्याने ये-जा करणारे बरेचसे पादचारीही तिच्याकडील वस्तू खरेदी करतात. चर्चमध्ये येणारे भाविक हे तिचे नेहमीचे ग्राहक आहेत. त्यामुळे तिने बनवलेले सर्व खाद्यपदार्थ त्याच दिवशी संपतात. फ्रूटी केक, कप केक, साधा केक, वनिला केक अशा विविध प्रकारचे केक सेबेस्तियान स्वत: बनवते. यासाठी तिने खास असे प्रशिक्षण घेतले नाही. नाताळ, नवीन वर्ष आदी प्रसंगी घरातील ज्येष्ठ व्यक्ती घरात केक, बिस्किटे तयार करत असत. ते पाहून सेबेस्तियान सर्व पदार्थ तयार करायला शिकली.

पुढे लग्न झाल्यावर संसार सुखाचा चालू असताच तिच्या पतीवर काळाने झडप घातली. पदरात पाच मुले असली तरी तिने हिंमत न हारता बेकरीचा हा व्यवसाय स्वत: पुढे चालू ठेवला. फक्त पाव न करता त्याच्या जोडीला बेकरीचे इतर पदार्थ तयार करण्याचा सपाटा तिने लावला आणि त्याची विक्री सुरू केली.

फातोर्ड्याहून मडगावला रोज सकाळी येणे हे सुरुवातीला काहीसे कष्टप्रद असले तरी तिने त्यात खंड पडू दिला नाही. सुरुवातीला ती हे सर्व खाद्यपदार्थ घेऊन मडगाव येथील बाजारात विक्रीसाठी बसत असे. परंतु तिथे काही वर्षे विक्री केल्यावर तिने मडगाव येथील ग्रेस चर्चच्या पायर्‍यांवर बसून आपल्या बेकरीतील खाद्य पदार्थ्यांची विक्री सुरू केली.

संध्याकाळी घरी गेल्यावर सेबेस्तियान स्वस्थ न बसता बेकरीमध्ये विविध प्रकारचे केक व बिस्किटे बनवण्याच्या तयारीला लागते. पावाचे मिश्रण तयार करण्यासाठी तयारी करते. उन्हाळा असो वा पावसाळा ...तिच्या या कामात आजपावेतो कधीच खंड पडलेला नाही.

कष्ट करून कमावलेल्या पैशातून तिने आपल्या मुलांना योग्य ते शिक्षण दिले. त्यांची लग्ने करून दिली. आज घरी सुबत्ता असली तरी तिने आपला पारंपरिक व्यवसाय सोडला नाही. चर्चच्या पायथ्याशी बसून आपल्याला आपले काम करायला मिळते आहे यासाठी ती आपल्या देवाचे मनोमन आभार मानते आणि त्यासाठी तिच्या हातात असलेल्या जपमाळेचे मणी मोजत मुखातून देवाचे नाव घेत ती आपला दिवस समाधानाने व्यतीत करत आहे.


कविता प्रणीत आमोणकर