सिझेरियन प्रसूतीबद्दल समज - गैरसमज...

प्रसूतीनंतर जेमतेम आठवडा उलटलेला. अजून डिस्चार्जही भेटला नव्हता. एवढ्यात भेटीस येऊ नका या विनंतीस न जुमानता नात्यातल्या एक एक बायका हजर. त्यातल्या एका काकूंनी आल्या आल्या टोमणा मारलाच... "अगं तू तर फिजिओथेरपिस्ट, व्यायामाचं वगैरे सगळ्यांना ऐकवतेस.. तुझं सिझर कसं काय झालं..." नी मी कपाळावर हात टेकवला.

Story: आरोग्य |
12th April, 10:14 pm
सिझेरियन प्रसूतीबद्दल समज - गैरसमज...

आजच्या तरूण महिलावर्गाला प्रसूती दरम्यानचे अडथळे, नैसर्गिक व सिझेरियन प्रसूती पध्दतीबद्दल जाण असली तरी याबाबत मध्यम ते प्रौढ महिलावर्गात मात्र अजूनही पाहिजे तितकी प्रगती झालेली नाही. त्यांच्या मते प्रसवाच्या असह्य वेदना सहन करत, 'नॉर्मल' प्रसूतीद्वारे बाळाला जन्म देणे हेच 'खरे बाळंतपण'. याचसोबत, शस्त्रक्रिया तंत्रात व सिझेरियन पध्दतीमधे बरीच प्रगती झाली असली तरी सामान्य लोकांमध्ये भीती अजूनही कायम आहे. सिझेरियन प्रसूतीबद्दलची ही भीती मिटविण्यासाठी व जागरूकता वाढविण्यासाठी एप्रिल हा सिझेरियन जागरूकता महिना म्हणून पाळला जातो.


स्त्रीरोग तज्ञ शक्य तेवढे नैसर्गिक प्रसूती करण्यास प्राधान्य देतात. पण आईला किंवा बाळाला काही त्रास किंवा गुंतागुंत असल्यास नैसर्गिक जन्म होऊ शकत नाही, अशा वेळेस सिझेरियन प्रसूती करतात. मोठे बाळ, सेफॅलो-पेल्विक असमानता, आधीचे दोन किंवा अधिक सिझेरियन जन्म, याआधी प्लेसेंटा प्रिव्हिया असणे, बाळाची असामान्य स्थिती, बाळाच्या मानेभोवती नाळ गुंडाळलेली असणे, बाळाच्या हृदयाच्या गतीमध्ये चढ-उतार होत असणे किंवा जास्त जोखीम असलेली गर्भधारणा असणे या सारख्या स्थितीत आधीच ठरवून किंवा अचानक आपत्कालीन स्थितीत सिझेरियन प्रसूतीचा पर्याय निवडला जातो. 

अँटिबायोटिक्स, नवीन शस्त्रक्रिया पद्धती आणि सुरक्षित अॅनेस्थासिया पद्धती यामुळे सिझेरियन प्रसूती अगदीच सुरक्षित शस्त्रक्रिया आहे. रक्तस्त्राव होण्याचा धोका दोन्ही प्रकारच्या प्रसूतींमध्ये असतो व अगदी क्वचित प्रसंगी, मूत्राशय किंवा आतड्यांच्या आसपासच्या अवयवांना इजा होण्याचा धोका असतो. लोकांचा असा समज असतो की, सिझेरियन प्रसूती  म्हणजे सोपा, कमी वेदनादायक मार्ग. पण दोन्हीही प्रकारांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्रास हे असतातच. यातही ऍनेस्थेसियाचा प्रभाव जसा कमी होतो, तशा त्रासदायक वेदना जाणवू लागतात व तेव्हाच खरी काळजी घेणे महत्त्वाचे असते. 

सिझेरियन प्रसूतीनंतर आपले वजन वाढेल असा एक समज असतो पण वजन वाढणे हे सिझेरियनमुळे होत नसून जास्त कॅलरी घेतल्याने आणि व्यायाम न केल्यामुळे होते. सिझेरियन दरम्यानच्या ऍनेस्थेसियामुळे पाठदुखी होईल असाही समज असतो. पण पाठदुखी ऍनेस्थेसियामुळे होत नसून हार्मोनल असंतुलनामुळे हाडे  शिथिल झाल्यामुळे, कोर व पाठीचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे होते. 

सिझेरियन नंतर स्तनपान करू शकणार नाही, व्यायाम करू शकणार नाही असेही महिलांना वाटते. तसे नसून आठ दिवसांनी आपण चालण्यासह सगळी सामान्य कामे सुरू करू शकतो आणि शस्त्रक्रियेनंतर सहा ते आठ आठवड्यांनी पोटाचा व्यायाम करू शकतो. सिझेरियन प्रसूतीदरम्यान स्तनातून दूध तयार होण्यास काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. पण सतत प्रयत्न करत राहिल्याने, बाळाचे लॅचींग नीट ठेवल्याने स्तनपान अगदी दोन तीन दिवसांत नीट होऊ शकते. पाठीला सपोर्ट देऊन योग्य पोझिशन मध्ये स्तनपान केल्याने, सुरूवातीच्या दिवसांत उठताना व झोपताना सपोर्ट घेतल्याने स्टीचीसच्या वेदना आटोक्यात राहू शकतात.

सिझेरियन पद्धतीने जन्मलेली बाळं कमकुवत असतात असाही गैरसमज असतो. सिझेरियन प्री-टर्म असेल तर बाळाचे वजन कमी असू शकते पण जशी बाळाची वाढ होत जाते तसे बाळ सुदृढ होऊ लागते. प्रसूतीच्या प्रकारांमध्ये तुलना करण्याऐवजी आई व बाळाच्या जीवनशैलीतील बदलांसारख्या घटकांवर लक्ष केंद्रीत करणे महत्त्वाचे आहे.

एकदा सिझेरियन झाल्यास, पुढची सिझेरियनच करावी लागते असे नसते. सिझेरियननंतर योनीमार्गातून बाळाचा जन्म शक्य असतो, याला वी.बी.ए.सी. म्हणतात. जर मागील सिझेरियनचा कट कमी आडवा असल्यास, गर्भधारणेमध्ये कोणतीही गुंतागुंत नसल्यास, दोन्ही प्रसूतींमध्ये किमान १८ महिन्यांचे अंतर ठेवण्याची शिफारस केली जाते व यामध्ये वी.बी.ए.सी साठी प्रयत्न केला जातो. 

प्रसूतीमार्ग सिझेरियन असो वा नॉर्मल, प्रत्येक गरोदरपणात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम, पौष्टिक आहार, नियमित प्रसूतीपूर्व तपासणी आणि गर्भधारणापूर्व समुपदेशनासह निरोगी दिनचर्या पाळणे. प्रसूतीबद्दलचे समज- गैरसमज दूर ठेऊन आईला त्यावेळेस गरज असलेले समर्थन द्यावे आणि आई-बाळाचे आरोग्य सांभाळावे.

डॉ. श्वेता राऊत मुळगावकर