ओपन द विंडो

खिडकी, गवाक्ष, वातायन किती तरी नावांनी आपण तिला ओळखतो. बाहेरच्या जगाशी आपलं नातं जोडणारं ते एक माध्यम. घराला खिडकीशिवाय शोभा नाही. नुसतं दिसणंच नाही, तर उपयोगातही ती अग्रेसर आहे.

Story: मनातलं |
12th April, 10:11 pm
ओपन द विंडो

हल्लीच दाबोळी एअरपोर्टवर जाण्याचा योग आला. तिथे गेल्यावर सुशोभिकरणासाठी वापरल्या गेलेल्या चित्रांनी लक्ष वेधून घेतले. त्यात एक थीम होती. ‘खिडक्या’. खिडक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या, वेगवेगळ्या काळातल्या, वेगवेगळ्या रूपातल्या यांची चित्रे तिथे पहायला मिळाली. खिडकी जी आपल्या प्रवासात बाहेरच्या जगाशी संपर्क आणि संबंध जोडून देते.                       

खिडकी, गवाक्ष, वातायन किती तरी नावांनी आपण तिला ओळखतो. बाहेरच्या जगाशी आपलं नातं जोडणारं ते एक माध्यम. घराला खिडकीशिवाय शोभा नाही. नुसतं दिसणंच नाही, तर उपयोगातही ती अग्रेसर आहे. शुद्ध हवेला आत येऊ देणं अशुद्ध बाहेर घालवणं या सारखं महत्त्वाचं कामही ती करत असतेच. पण हवेबरोबरच घराला प्रकाशाचं वरदान देणारी ही गोष्ट. कुठलीही वास्तू हिच्या अस्तित्वाशिवाय अधुरी रहाते.


युरोप टूरच्या वेळी स्कॉटलँडला जाण्याचा योग आला. तिथल्या एडिनबरोमध्ये पाहण्यात आलेली गोष्ट म्हणजे तिथल्या जुन्या घरांना खिडक्याचा आभास व्हावा अशा फ्रेम व काचा लावलेल्या, प्रत्यक्षात खिडक्या नव्हत्याच. मनात आलं इथे खूप कडाक्याची थंडी असते म्हणून खिडक्या बंद स्वरूपातच असतील. त्यातून कमीतकमी उजेड तरी येईल, पण गार वाऱ्याचा मारा तरी होणार नाही, असा विचार त्यामागे असावा. चौकशी करता असे समजले की दारे नसलेल्या खिडक्या करण्यामागे एक कारण होतं. काही शतकांपूर्वी तिथल्या एका राजाने म्हणे खिडक्यांवर कर लादला होता. का? ते ठाऊक नाही. जितक्या जास्त खिडक्या, तितका जास्त कर! कदाचित त्या खिडकीतून आत येणारा अनमोल असा सूर्यप्रकाश, त्यासाठी त्याने कर लावला असावा. पण लोकही तेवढेच वस्ताद. त्यांनी खिडक्या तर बनवल्या पण त्याला उघड बंद करता येण्यासाठी दारांची रचना केली नाही व दार नाही ती खिडकीच नाही असा आपला युक्तिवाद मांडून करापासून सुटका करून घेतली. माझ्या घराच्या खिडकीतून पौर्णिमेचं टिपूरलं चांदणं ठिबकतं. तर कधी चंद्रमा कोरीतून खिडकीशी झुकतो. दिवसभर लख्ख उजेडाच्या किरणांनी घर झळाळून जातं. मग तिथे वाईट, अमंगळ किंवा किडे-किटाणू यांना प्रवेश नसतो. त्या किरण वर्षावातून सारं घरच न्हाऊन निघतं, पवित्र होऊन जातं. खिडकीतून दिसणाऱ्या निळ्याशार आभाळाचं नि ढगांच्या कापूस पिंजल्या नक्षीचे दर्शन अवीटच. पलीकडे दूरवर बहरलेला गुलमोहर डोळ्यांचे पारणे फेडत असतो. एखाद्या चित्रकाराच्या चित्र फ्रेममधून पाहणं तसं माझ्या खिडकीच्या फ्रेममधून ते नवनूतन आकार घेत समोर येत असतं. कधी दिवसाचं, कधी तिन्हीसांजेचं, कधी रात्रीचं. तिन्हीसांजेला गडद होत जाणाऱ्या सावल्या मन उदास करतात. झाकोळल्या आकाशातला तो दूर अस्तंगत होत जाणारा केशरी गोळा, नि हळूहळू क्षितीजरेषा पार करत नाहीसं होणारं त्याचं सुवर्ण दर्शन. सारेच अद्वितीय! रात्रीच्या काळ्या पदरावर चांदण्यांची कशिदाकारी केलेली शाल पांघरून निजलेलं आकाश खिडकीतून डोकावत असतं. तर कधी दुपारची उन्हे कलती होवून, सूर्य संध्येला भेटायला जाताना ‘बाय’ करत चाललेला दिसतो. 

कधी कधी माझा मलाच हेवा वाटतो देवाने दिलेल्या ह्या अनमोल खिडकीचा, ज्यातून मला दृग्गोचर होत असतात निसर्गातली अगणित चित्रे! कधी ती मला न्हाऊ घालते श्रावण सरींनी, तर त्या पावसाचा धिंगाणा आणि रपरपत होणारा त्याचा पदरव हा नयनांबरोबर कानांनाही सुखावत असतो. घरात पाणी येईल अशा कद्रू विचारांनी मी मात्र माझी लाडकी खिडकी बंद करत नाही. भिजू दे भिजलं तर, असं त्या पाऊस सरींचं खिडकीत स्वागत करते. रस्त्याने जाणारी गणवेशातली मुले असो, की बागेतली फुले असो, ह्या खिडकीद्वारेच मला दर्शन होतं.  पक्ष्यांचं आकाशी पंख पसरवून मुक्त विहंगणे, कोकिळेचं गोड आवाजात कुहूकुहू करणे, नि मधेच घरघरत जाणाऱ्या विमानाचं माझ्या खिडकीत डोकावणे, हे सारे मला माझ्या खिडकीनेच तर दिले आहे.


लहानपणी मला आठवतंय घराच्या खिडकीतून दिसणारी, रस्त्यावरून जाणारी लग्नाची वरात, मिरवणूक, मोर्चा इत्यादी. अशांचा सुगावा लागला की आम्ही सारे खिडकीकडे धावायचो पाहायला. कधीकधी मयत यात्रेचंही दर्शन घडे. चांगल्या गोष्टींबरोबर कधी कधी वाईट गोष्टी पण डोळे उघडून पहायला शिकवणारी ही खिडकी. बाबांना बाहेरून यायला उशीर झाला की आम्ही मुले खिडकीशी जाऊन त्यांची वाट पहात बसायचो, समोरून येणाऱ्या बाबांचं मनोरम चित्र ही खिडकीच तर दाखवत होती! लग्नानंतर ऑफिसहून येणारे ‘हे’ आणि त्यानंतर शाळा-कॉलेजमधून येणारी मुले या खिडकीतूनच दिसायची. तेव्हाही नि आताही ही खिडकी माझ्या जीवनाचा एक भाग बनून गेली. 

एखादी हलकीशी येणारी वाऱ्याची झुळूक बरोबर घेवून येत असते मंद फुलांचा गंध. अंगण, परसात  फुलणाऱ्या जाई, जुइंचा! तर कधी रातराणीचा. कधी समोरच्या घरात शिजत असलेल्या पक्वान्नांचा दरवळ भूक प्रज्वलित करतो. आकाशमोगरीची ती अंगणभर शुभ्र रांगोळी, नि श्वासात भरून रहाणारा तो सुगंध मन प्रसन्न करून जाते. तर तुळशीपुढे लावलेली अगरबत्ती मंद जळत सुगंध पसरवित असते. तो खिडकीतून आत शिरतो. खिडकीत कधीकधी लाल चोचीचा बुलबुल शिळ घालत आपल्या सखीला पुकारत असतो, कधी आपल्या पिल्लांसाठी घर बनवायला जागेची ‘पाहणी’ करत असतो. पण पाच वाजले की डास महाशयांनाही "या घर आपलेच आहे" असं ही खिडकीच आमंत्रण देत बोलावत असते. म्हणून मग जाळीने त्यांना थोपवावे लागते. नाईलाजास्तव खिडकीला ठेवावे लागते बुरख्यात!  

 खिडकी ही त्या घराचं प्रतिबिंब दर्शवते. आमच्या घरापलीकडे राहाणारे एक कुटुंब कधीच खिडकी उघडी ठेवत नाहीत. अशी माणसं मला संकुचित वृत्तीची वाटतात. पडदे बंद करून नि घराचं थिएटर करून सिनेमा पाहण्यापेक्षा पडदे उघडून, परमेश्वराने निर्माण केलेला निसर्ग, जो चित्रपट दाखवतोय तो डोळे भरून पाहता आला पाहिजे. आतलं बाहेर नि बाहेरचं आतून पाहता येण्याची पारदर्शकता खिडकीत असते. आता तर कॉमप्युटरमधल्या विंडोमुळे, इन्टरनेटमुळे सगळे जगच दिसते. त्यात सहज डोकावता येऊ लागलंय. बाहेरच्या जगाचा परिचय होतोय. आता आपली क्षितिजरेषा रुंदावत चाललीय. 

अशी ही खिडकी. बसमधून, ट्रेनमधून, विमानातून प्रवास करताना ही हवीहवीशी वाटते. ट्रेनमधून प्रवास करताना, पळती झाडे, एकामागे एक येणारी स्टेशने, हिरवीगार शेते, ऐसपैस पाय पसरून बसलेले डोंगर, उगवतीची चंद्रकोर, मावळतीचा लोहगोल, सृष्टीचा नजारा, मंदिरे नि चबुतरे, घरे नि पाण्याचे झरे सारेच आपल्याला धावते दर्शन देत असतात. तर विमानातून धावपट्टीवरून विमानाने घेतलेली हवेतली भरारी, छोटी छोटी होत जाणारी घरे, गावे शहरे, नि हळूहळू तीही गायब होत जातात. ढगांच्या कळपात शिरलेले विमान शुभ्रज्यॊत्स्ना नभातून आपला मार्ग आक्रमत रहातं. हे सर्व पाहण्यासाठी, खिडकीशी जागा मिळवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. कारण त्यातून सारं काही नजरेच्या टप्प्यात येतं. नजरेत सामावून घेता येतं. पण आता शहरात मात्र नजरेचा टप्पा फारच सीमित झालेला दिसतोय. खिडकीतून डोकावून पाहिलं तर पलीकडच्या घरातली दृश्ये समोर येतात. कुणी आई आपल्या मुलीच्या वेण्या घालत असते, तर कुणी बाबा मुलाचा अभ्यास घेत असताना दिसतात. 

आभाळाची कक्षा तीन-चार फुटाच्या तुकड्यात सामावलेली दिसते. त्यातून काय नि किती पहायला मिळणार हा एक प्रश्नच आहे! तरीही आहे त्यात समाधान मानायची आपली वृत्ती असते. परवा मुंबईला एका मैत्रिणीकडे गेले तिची रूम सातव्या मजल्यावर. रूमला एक मोठ्ठी खिडकी मात्र होती. मी तिला विचारलं इतक्या वरती कशाला रूम घेतलीस? ती म्हणाली, "इकडे ये" तिने मला खिडकीशी नेले नि माझ्या डोळ्यांचे पारणेच फिटले कारण तिच्या खिडकीतून मला दूरवरच्या अथांग सागराचे उंचावरून खूपच मनोरम दर्शन झाले. ती म्हणाली “मला ही रूम आवडली ती केवळ या कारणामुळे, ही खिडकी माझी मैत्रीण झालीय. तुला तर माहीतच आहे, मला समुद्रावर फिरायला जायची खूपच आवड, पण कामाच्या व्यापात ते शक्य होत नाही. त्यामुळे मी हातात गरम गरम चहाचा वाफाळलेला कप घेऊन इथे, खिडकीत बसते. सकाळी सकाळी असं समुद्र दर्शन घेते.”  तिचे हे खिडकी प्रेम मला सुखावून गेले.


प्रतिभा कारंजकरस, फोंडा- गोवा.